Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

गंगापूर धरण 101 टक्के भरले; जिल्ह्यातील धरणांत 80 टक्के पाणी

Share

नाशिक । नाशिककरांची तृष्णा भागवणारे गंगापूर धरण 101 टक्के भरले असून गंगापूर समूहातील कश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी धरणात 100 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नाशिक शहरवासियांची पुढील वर्षीची पाण्याची चिंता मिटली आहे. जिल्ह्यातील 7 मोठे आणि 17 मध्यम अशा एकूण 24 प्रकल्पांत 53 हजार 431 दलघफू पाणीसाठा उपलब्ध आहे. आजमितीस जिल्ह्यातील धरणांत 80 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेत 5 टक्के पाणीसाठा कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

गेल्या काही दिवसांपासून बरसणार्‍या पावसामुळे जिल्ह्यातील 24 धरण प्रकल्पांपैकी 9 धरणे तुडुंब भरली आहेत. धरणांची पातळी राखण्याबरोबरच पुराचा धोका टाळण्यासाठी या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होत. मात्र आता हा विसर्ग काहीअंशी बंद करण्यात आला आहे. आतापर्यंत या धरणांतून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे मराठवाड्याला 22 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

अधूनमधून रिमझिम पडणार्‍या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी धरण क्षेत्रातील पावसामुळे धरणातून विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. आजमितीस जिल्ह्यातील लहान-मोठ्या 24 धरण प्रकल्पांत 80 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे नाशिककरांची तहान भागवणारे गंगापूर धरण 101 टक्के भरले आहे. गंगापूर धरणात नाशिक शहरासाठी 3900 दलघफू आरक्षण आहे, तर दारणातून सुमारे 400 दलघफू असे एकूण 4300 दलघफू आरक्षण आहे. मात्र यंदा जिल्हाधिकार्‍यांनी वस्तुस्थितीला अनुसरून पाण्याची मागणी करण्याचे महापालिकेला सूचित केल्याने यंदा मनपाच्या पाणी आरक्षणात कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गंगापूर समूहातील कश्यपी धरण 99 टक्के भरले आहे, तर गौतमी गोदावरी 98 टक्के, आळंदी 100 टक्के भरले आहे. पश्चिम पट्ट्यात जोरदार बरसणार्‍या पावसाने पूर्व भागाकडे पाठ फिरवल्याने आजही जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये 42 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दारणा समूहात 89 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पालखेड समूहात 95 टक्के तर गिरणा खोर्‍यात 71 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. अजून पावसाचे 30 दिवस शिल्लक असल्याने एकूणच धरणांची क्षमता पाहता पावसाची संततधार कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!