गंगापूर येथे लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणी एकास सक्तमुजरी

0

नाशिक । प्रतिनिधी
9 लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणातील आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायधीश श्रीमती एस. एस. नायर यांनी 7 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रमोद राधाकिसन ठाकरे असे आरोपीचे नाव आहे. 20 नोव्हेंबर 2008 रोजी ही घटना घडली होती. आरोपीला गंगापूर पोलिसांनी अटक केली होती.

शहरात बनावट नोटा बनवल्या जात असल्याची खबर गंगापूर पोलिसांंना मिळाली होती. डिसूझा कॉलनीतील आदित्य सोसायटीतील गाळा क्र. 2 मध्ये असलेल्या मोबाईल वर्ल्ड या दुकानावर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला होता. त्यावेळी दुकानाच्या झडतीतून बनावट नोटा बनवण्याचे साहित्य जप्त केले, तर आरोपी प्रमोद ठाकरे याच्या मारुती झेन या कारमधून 9 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, दुकानाचा मालक संजय वर्मा, सुधाकर पांडे हे फरार झाले होते. या प्रकरणी प्रमोद ठाकरे यास अटक करून त्याच्याविरोधात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी तपास करीत दोषारोपपत्र सादर केले होते.

या प्रकरणाचा खटला अतिरिक्त सत्र न्यायधीश श्रीमती एस. एस. नायर यांच्यासमोर चालला होता. या खटल्यात 8 साक्षीदार तपासण्यात आले. यात सिक्युरिटी प्रेसच्या अधिकार्‍यांच्या पुराव्यातून जप्त करण्यात आलेल्या नोटा बनावट असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे खटल्यात आरोपी प्रमोद ठाकरे दोषी असल्याचे सिद्ध होऊन त्यास न्यायधीश श्रीमती नायर यांनी 7 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. पंकज चंद्रकोर यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

*