Type to search

Breaking News गणेशोत्सव नाशिक मुख्य बातम्या

यंदाच्या गणेशोत्सवावर पावसामुळे महागाईचे सावट

Share

नाशिक । प्रतिनिधी
‘श्री’ आगमनाचे भक्तांना वेध लागले आहेत. मात्र यंदाच्या गणेशोत्सवावर पावसामुळे महागाईचे सावट असल्याने गणेशमूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे. कारखान्यांमध्ये अनेक सुबक गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने या मूर्ती सुकल्याच नाहीत. परिणामी या मूर्ती सुकवण्यासाठी मूर्तिकारांनी कोळसा पेटवून ऊब दिली. कोळशाच्या या अतिरिक्त खर्चामुळे व अन्य उत्पादन खर्चामुळे गणेशमूर्ती महागल्या आहेत.

गणेशमूर्ती बनवताना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे अर्थात मोल्ड तयार करण्यासाठी लागणारे लिक्वीड रबर महाग झाले आहे. तसेच प्लास्टरचा भाव वाढला असून रंगकामापूर्वी वापरले जाणारे इमल्शनही महाग झाले आहे. रंगकामासाठी लागणार्‍या एअर कॉम्प्रेसरची गनही महाग झाली आहे. त्यामुळे यंदा गणेशमूर्तीच्या किमतीत 20 ते 22 टक्के भाववाढ झाली आहे. पावसामुळे शाडूची माती कमी प्रमाणात मिळाल्याने मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे.

शहरात 10 इंच ते 7 किंवा 8 फुटांपर्यंतच्या मनमोहक मूर्ती 200 रुपयांपासून 6 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गणेशमूर्ती तयार झाल्यानंतर त्यावर धूळ बसू नये तसेच तिचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी तिला प्लॅस्टिकचे आवरण घातले जाते. तसेच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे प्लॅस्टिकशिवाय दुसर्‍या शहरामध्ये मूर्ती पाठवणेदेखील अवघड होते. यंदा मात्र प्लॅस्टिकबंदी असल्यामुळे सहजासहजी मूर्तीच्या आकाराप्रमाणे प्लॅस्टिकच्या पिशव्या उपलब्ध होत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.

मूर्ती घडवण्यासाठी दुर्मिळ होत असलेले कारागिर, त्यांची वाढलेली रोजंदारी आणि कच्च्या मालावरचा वस्तू व सेवाकर (जीएसटी)मुळेही गणेशमूर्तींच्या किमतींंमध्ये वाढ झाली आहे. गणपतीच्या मूर्तीसाठी लागणारे रंग, माती, ब्रश, जागा या सगळ्यांवर असलेल्या 18 टक्के वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) या साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. कुशल कारागिरांचे दर वाढले हेदेखील एक कारण दरवाढीमागे असून अनुभवी, कुशल कारागिर मिळतच नसल्याने आहे त्या कारागिरांची रोजंदारीही वाढली आहे.

मूर्ती साच्यातून काढणे, मूर्तीला हात जोडणे, मूर्ती सुकवणे, मूर्ती पॉलिश करणे, मूर्तीला पांढरा रंग देणे नंतर पुन्हा मूर्ती घासणे आणि नंतर मूर्तीवर रंगकाम करणे या सगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. त्यासाठी कुशल कामगार लागतात. मागणी जास्त आणि कुशल कामगार कमी यामुळे या कामगारांना 350 ते 400 रुपये रोज द्यावा लागतो.

गणेशाची नानाविध रुपे
रथावर, कमळावर, सिंहासन, मयुरासनावर आरूढलेला गणेश, बाल गणेश, वामन अवतार अशा गणरायांच्या विविध रूपांनी सजलेला गणेश बाजारपेठेत फेरफटका मारल्यावर पाहावयास मिळत आहेत. गणरायाची मूर्ती निश्चित करण्यापासून ते सजावटीचे साहित्य खरेदी करण्यापर्यंत भक्तांची गर्दी झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण, पेण, गुजरात यासह ग्रामीण भागातून गणेशमूर्ती शहरात दाखल झाल्या आहेत. डायमंड वर्क केलेले गणपती, लालबागचा राजा, सिद्धीविनायक, दागिना गणपती, सावकार बैठक, दगडूशेठ यासह कृष्ण आदी रूपात मूर्ती आहेत.

भाववाढ अटळ
पावसामुळे मूर्ती सुकवण्यासाठी कोळशाचा आधार घ्यावा लागत आहे. निम्मा माल आला असून निम्मा माल आणणे बाकी आहे.
– गणेश चौधरी, विक्रेते

तीन वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे गणेशमूर्तींची भाववाढ झाली आहे. कच्चा माल, पीओपी, रंग, इंधन, नैसर्गिक संकट, पूर यासह अन्य बाबींमुळे मूर्ती महाग होत गेल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी एक लहान मूर्ती 51 रुपयांंना मिळत होती. आता याच मूर्तीची किमत 200 रुपयांवर पोहोचली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!