आता मंडळांना परवाने ऑनलाईन; गणेशोत्सवातील फरफट होणार कमी

0

नाशिक । दि. 4 प्रतिनिधी
शहरातील गणेश मंडळांना आता पोलिसांकडून ऑनलाईन परवाना देण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरापासून ही सुविधा सुरू होणार आहे.

नाशिक पोलिसांनी प्रथमच अशाप्रकारे गणेश मंडळांना परवाना देण्याची प्रणाली सुरू केल्यामुळे मंडळांना ही प्रक्रिया सुलभ, सोपी आणि गतिमान होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी ‘देशदूत’ला दिली.

गणेशोत्सवात पोलीस, महानगरपालिका आणि वाहतूक विभागाची परवानगी घेणे गणेश मंडळांसाठी डोकेदुखी असते. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही परवानगी घेणे अत्यावश्यक आहे.

नाशिक शहर व परिसरात दीड हजार नोंदणीकृत मंडळे आहेत. तर, एक हजार मंडळे नोंदणी न केलेली आहेत. दरवर्षी मंडळांची संख्या वाढत आहे. येत्या 25 ऑगस्टला लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे.

यासाठी गणेश मंडळांची लगबग सुरू झाली आहे. तत्पूर्वी उत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांना पोलीस, महानगरपालिका आणि वाहतूक विभागांकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, परवाना घेण्यासाठी मंडळांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी मंडळांकडून वेळोवेळी करण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी ऑनलाईन परवानग्या देण्याची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच सर्व कागदपत्रे देणार्‍या मंडळांना दोन दिवसात परवाना दिला जाईल, असे आयुक्तांनी जाहीर केले आहे.
गणेश मंडळांना नाशिक सीटी पोलीस डॉट कॉम. या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध होणार आहे.

या संकेस्थळावर गेल्यानंतर साईटवर गणेश मंडळ परवाना अशी टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यावर गणेश मंडळांनी क्लिक करून अर्ज ओपन करावा. त्यानंतर त्या अर्जावर मंडळाची पूर्ण माहिती भरायची आहे. या माहितीच्या आधारे परवाने दिले जाणार आहेत. ही सुविधा आठदिवसात सुरू होणार असून, 22 ऑगस्टपर्यंत ही सुविधा सुरू राहणार आहे. दरम्यान, ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी आल्या तरच दरवर्षीप्रमाणे ऑफलाईन परवाना देण्याची व्यवस्था करण्यात येणार आल्याचे सिंगल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*