Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : ‘देशदूत’ कृषी मार्गदर्शन शिबिर। आता डोक्याने शेती करण्याचे दिवस : कृृषीतज्ञ राजपुत

Share

नाशिक । एकदा दुष्काळ, दुसर्‍या वेळी ओला दुष्काळ, सतत बदलते हवामान या मुळे शेतीपुढे मोठी संकटे उभी राहिली आहेत. यावर मात करण्यासाठी आता शेतकर्‍यांनी एकत्र येत गटशेती तसेच एकात्मीक पिक पद्धतीवर भर देण्याची गरज आहे. नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी आता डोक्याने शेती करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे कृषीतज्ञ हेमराज राजपुत यांनी येथे केले.

देशदूत व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्तपणे परतीच्या पावसाने मोठे नुकसान सोसाव्या लागलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगावच्या विनायकनगर पाडा येथील शेतकर्‍यांसाठी कृषी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री राजपुत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले या होत्या.

कृषी तज्ञ राजपुत म्हणाले, आदिवासी शेतकर्‍यांनी वर्षभर केवळ भात पिकावरच अवलंबुन न राहता एकात्मीक पिकपद्धीचा उपयोग करावा. ज्यामध्ये ठरावीक क्षेत्रात त्या त्या हंगामानुसार विविध प्रकारची चार ते पाच पिके एकाच वेळी घेतली जातात. यामध्ये एका पिकाचे नुकसान झाले अगर एका पिकाला बाजारभाव मिळाला नाही तरी दुसर्‍या पिकातून हे नुकसान भरून निघू शकते.

आदिवासी शेतकर्‍यांनी आपली पारंपारीक भात, वरई, नागली या पिकांसोबत आर्थिक हातभार लावणार्‍या व भात काढणीनंतर शेतात असलेल्या ओलाव्याच्या अधारावर हरभरा, वाल, टोमॅटो, स्वीट कॉर्न मका या कमी कालावधीच्या पिकांचे उत्पादन घ्यावे. हरभर्‍याचे घाटे संक्रातीच्या कालावधीत चांगले उत्पादन देऊ शकतात. शेताच्या बांधावर चांगले कलम असणारी आंबा, चिक्कु, फणस, काजु, शिताफळ, पेरू, चांभुळ अशा उत्पन्न देणार्‍या फळझाडांची लागवड केल्यास आपणास शाश्वत उत्पन्न सुरू होऊ शकते.

सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या सर्वच पिकांना नाशिक शहरात मोठी मागणी आहे. या प्रकारची शेती केल्यास कमी खर्चात, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीत आपण चांगले पैसे मिळवू शकतो. यासह शेतीपुरक छोटे व्यावसाय हे फायदेशीर ठरतात. यामध्ये शेळी पालन, गावठी कोंबड्या पालन, गायी पालन, रोपवाटीका तयार करणे, महिला बचत गटांद्वारे लोणची, मसाल्याचे तसेच खाद्यपदार्थ बनवणे यासाठी शासनाचे अर्थसाह्य मिळते. आदिवासी भागातील शेतकर्‍यांनी आपल्या पारंपारीक शेतीतून बाहेर पडून तरूणांच्या साथीने आता शाश्वत शेती करण्यावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी गावच्या सरपंच रूक्मिणी नथु उदार, पोलीस पाटील देवचंद महाले तसेच ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशदूत शेतकरी चळवळीचा केंद्रबिदू
या मार्गदर्शन शिबिराचे प्रास्तविक करताना कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी सांगीतले, देशदूत हा शेतकरी चळवळीचा केंद्रबिंदू राहिला आहे. देशदूत, शेतकरी व त्यांच्या संघटना यांचे नाते खूप जूने आहे. संकटग्रस्त शेतकर्‍याच्या मदतीसाठी देशदूत कायम आग्रेसर राहिला आहे. देशदूने जिल्हाभरात ओल्या दुष्काळाचा दौरा केला. यामध्ये नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या व्यथा मांडून त्या सर्वांपर्यंत पोहचवल्या. या दौर्‍यातच या पाड्यावरील शेतकर्‍यांच्या व्यथा व त्यांना काहीतरी करण्याची तळमळ यातून आपण हा उपक्रम राबवत असून तो यापुढे अधिक व्यापक करू असे त्यांनी स्पष्ट केले.

तर नुकसान कमी करता आले असते
या भागातील शेतकर्‍यांनी भात पिकाची लागवड करताना कोकण कृषी विद्यापीठाणे विकसीत केलेल्या त्रिसुत्री भात लागवड पद्धतीचा वापर केल्यास यामध्ये अंतर जास्त असल्याने चांगले फुटवे फुटतात तसेच पिकात रोगप्रतिकारक तसेच बदलत्या हवामानाला तोंड देण्याची क्षमता विकसती होते. यामुळे आपण या पावसाळ्यात भातपिकाचे मोठे नुकसान टाळू शकलो असतो. असे हेमराज राजपुत यांनी शेतकर्‍यांना सांगत यापुढे या पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन केले.

कृषी विज्ञात कंद्राचा लाभ घ्या
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञा केंद्राच्या वतीने दहावी, बारावी पास नापास विद्यार्थ्यांसाठी शेती पुरक व्यावसायांचे विविध उपक्रम तसेच प्रशिक्षण शिबिरे राबवली जातात. थोड्या कालावधीच्या या प्रशिक्षणाद्वारे कृषी उत्पादने, सर्व प्रकारच्या रोपवाटीका तयार करून आपला उद्योग सुरू करता येईल तसेच द्राक्ष कलम करण्याचे प्रशिक्षण घेऊन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेला रोजगार आपण मिळवू शकतो याचा लाभ घ्यावा.
हेमराज राजपूत, कृषीतज्ञ

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!