Video…जेव्हा आदिवासी ‘लक्ष्युम्या’ गणपतीसाठी विकतात पत्री !

0

गोकुळ पवार | देशदूत डिजिटल
नाशिक, ता. १२ : गेल्या दोन दिवसांपासून फशाबाईं झोले यांचा मुक्काम दहीपुलाजवळच्या एका अरूंद जागेत आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पतीही येथे आलेले आहेत. नाशिककरांना गणपतीची यथासांग पूजा करता यावी म्हणून त्या पन्नास किलोमीटरवरून विविध फुले आणि पत्री घेऊन आल्या आहेत.

बुधवारी घरोघरी गणेशस्थापना होत आहे. त्यानंतर लवकरच गौरींचे आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागात विविध साहित्य घेण्यासाठी नाशिककर गर्दी करत आहेत. या गर्दीत बाजारपेठेत अगदीच कोपऱ्यात आदिवासी भागातून आलेल्या काही महिला आणि लहान मुले अरूंद जागेत अंग आखडून पत्री विकताना दिसतात.

इगतपुरी तालुक्यातील कोजुली गावच्या रहिवासी असलेल्या फशाबाई सांगतात, ’गावापासून दोन मैलांवरील वतवड किल्यावर पहाटे ५ वाजता चालत जाऊन ही पत्री गोळा केली. मुलांना घरी ठेऊन आम्ही नवराबायको शहरात हे विकण्यासाठी आलोय. दोन दिवसांपासून इथंच राहतोय. पण, परंतु एवढी मेहनत घेतल्यावर देखील चांगला मोबदला मिळत नाही. लोक दहा रुपयांसाठीसुद्धा घासाघिस करतात.’’

त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातून साधारणपणे ४० ते ५० किलोमीटर अंतरावरील गावांतून या सर्व महिला इथे पत्री घेऊन आल्या आहेत. तळेगाव, अंजनेरी, मेटघर किल्ला, मुळेगाव, सापगाव, काळमुस्ते, कोजुली यांसारखी त्यांची गावे.

गणेश चतुर्थीच्या आठ दिवस आधीच त्यांचे पत्री गोळा नियोजन करण्याचे झाले. परिसरातील जवळच्या डोंगरावरून या विविध पत्री यांनी दोन दिवस मेहनत करून गोळा केली आणि गौरी-गणपतीसाठी येथे घेऊन आल्या.

शहरातील गजबजाट असलेल्या दुकानाच्या एखाद्या कोपऱ्यात जुनाट चादरीचा आधार घेत त्यावर या फुलांची आरास मांडून सध्या या महिला फुले- पत्री विकत आहेत. यात आघाडा, दुर्वा, शिलांडी, घेवडा, केवडा, शमीपत्री, चाईचा मोहर, हरळी, निबांचे पाने, केळीचे पाने अशी विविध प्रकारची पत्री त्यांच्याकडे विक्रीला आहे.

फशाबाईंच्या शेजारीच त्यांच्याच् गावच्या मनाबाईही पत्री विक्रीसाठी आलेल्या आहेत. या महिला गटागटाने येथे राहिल्या आहेत. काही महिलांसोबत त्यांची लहान आणि शाळकरी मुलेही आलेली आहेत. आईवडिलांना विक्रीसाठी मदत करावी म्हणून शाळा बुडवून फुले विकत आहेत.

भात लावणी झाल्यानंतर आदिवासी भागात हाताला काम नसते. त्यात शेतमजूरी करणाऱ्या अनेकांच्या वाट्याला मग पोटासाठी अशी पत्री विक्रीसारखी कष्टाची कामे येतात.

रोजगार हमीची कामे पावसाळ्यात सुरू होत नाहीत आणि हाताला दुसरे काम नाही, त्यामुळे मुलाबाळांसह ही मंडळी शहराकडे रोजगारासाठी आली आहेत.

खरं तर, गणपती ही बुद्धीची देवता. विघ्ननाशक म्हणूनही त्याची ओळख आहे. या गणेशासोबतच संपत्तीची देवता असलेल्या महालक्ष्मुम्यांचेही आगमन होत आहे. असे असले तरी आजही आधुनिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरापासून अवघ्या ४० ते ५० किमी अंतरावरील आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या घरच्या या लक्ष्मुम्यांना मात्र मुलांसह पोटाच्या खळगीसाठी शहरात उघड्यावर वास्तव्य करावे लागत आहे.

LEAVE A REPLY

*