ऑनलाईन 445 गणेश मंडळांची नोंदणी

0

नाशिक । गणेश मंडळांच्या नोंदणीसाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन पद्धतीने आतापर्यंत एकुण 445 मंडळांनी नोंदणी केल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्याने विविध परवाने तसेच नोंदणीसाठी गणेश मंडळांची धावपळ सुरू आहे. ही धावपळ कमी करण्यासाठी यंदा पोलीसांनी संपुर्ण नोंदणी व परवाने व्यवस्था ऑनलाईन केली आहे.

यापूर्वी गणेशोत्सवासाठी पोलीस आणि महापालिकेकडून परवानगी घेण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना राबवली जात होती. अनेक वेळा कागदपत्रांची व्यवस्थित तपासणी करणेही शक्य होत नव्हते. गेल्या दोन वर्षापासून ऑनलाईन करण्याची पद्धत कार्यान्वित करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त कार्यकर्त्यांचे महापालिका आणि पोलिसांकडून परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

उच्च न्यायालयाने तयार केलेली नियमावली लक्षात घेऊन वाहतूक कोंडी होणार नाही खड्डे पडणार नाहीत, विजवितरण कंपनीचा परवाना यासह विविध कागदपत्रांची पुर्तता करून परवाने दिले जात आहेत. यासाठी 15 दिवसांपुर्वीपासून अर्ज केलेल्य मंडळांची प्रत्यक्ष पोलीस ठाणे, महापालिका, अग्निशामकदल, विजवितरण कंपनीचे अधिकारी अशांनी संयुक्त पाहणी दौरा केला होता. यानंतर परवाने देण्यात आले आहेत.

मंडळांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तो वाहतूक विभागाकडे जातो वाहतूक शाखेची परवानगी मिळाल्यानंतर तो अर्ज महापालिकेकडे जातो, महापालिकेने अर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी सर्व बाबी तपासून अर्ज मंजूर करून मंडळाला ऑनलाईन परवाना देत आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागत आहे.

संकेतस्थळावर लॉग इन करताना मोबाईल क्रमांकावर ओटीपी येतो तो ओटीपी टाकल्यानंतर अर्जावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकारी यांची नावे, ईमेल आयडी ,फोटो अपलोड करावे लागतात. धर्मादाय आयुक्तांचा नोंदणी क्रमांक, गेल्या वर्षाचे महापालिकेचा आणि पोलिसांचा परवाना क्रमांक, ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागत आहे. बहूतांश मंडळांची यासाठी अद्याप लगबग सुरू आहे. तर मानाच्या मोठ्या मंडळांनी काही दिवसांपुर्वीच कागदपत्रांची पुर्तता करून परवानग्या घेतल्या आहेत.

मागील वर्षी संपुर्ण शहरात एकुण 829 सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानग्या घेतल्या होत्या. यामध्ये 192 मोठी तर 598 लहान मंडळांचा सामावेश होता. तर यंदा आतापर्यंत 445 मंडळांनी नोंदणी केली असून 121 मंडळांची पुर्तता सुरू आहे. अशी माहिती विशेष शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शंकर पाटील व वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी दिली.

पोलीस विभागनिहाय नोंदणी अशी
परिमंडळ 1 –
विभाग 1- 115
विभाग 2 – 114
परिमंडह 2 –
विभाग 3- 167
विभाग 4 – 49
एकुण – 445

LEAVE A REPLY

*