Type to search

Featured गणेशोत्सव

ग्रामीण पोलिसांकडून सुविधा गणेश मंडळांना ‘ऑनलाईन’ परवाने

Share

नाशिक । जिल्हाभरात गणेश मंडळांना पोलिसांकडून मिळणार्‍या परवान्यांसाठी पोलीस स्टेशनमध्ये चकरा मारण्याची आणि रांगेत उभे राहण्याची आता गरज राहिलेली नाही. नाशिक ग्रामीण पोलिसांनी यातून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची सुटका करत जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना प्रथमच ऑनलाईन पद्धतीने परवाना देण्याची सुविधा सुरू केली असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली.

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे जिल्हाभरात गणेश मंडळांची आणि कार्यकर्त्यांची पूर्वतयारी सुरू आहे. यामध्ये सर्वप्रथम वेगवेगळे परवाने घेण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. यापूर्वी अशा परवान्यांसाठी वारंवार चकरा माराव्या लागत. त्यात बराच वेळही जातो. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी यंदा प्रथमच ऑनलाईन पद्धतीने परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे घरबसल्या आपल्या मोबाईलवरून किंवा घरातील लॅपटॉप, संगणकावरून नोंदणी करून पोलीस परवाना मिळवता येणार आहे.

परवान्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर गणेश मंडळांची नोंदणी हे ऑप्शन दिसेल. त्यावर किंवा थेट सिटीझन पोर्टलवर जाऊन लॉग-इन आयडी व पासवर्ड तयार करायचा. त्यानंतर मंडळाची माहिती विचारणारा फॉर्म समोर येईल. त्यात मंडळाच्या स्थापनेपासून विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनापर्यंतची माहिती भरायची आहे. महापालिका, महावितरण यांच्यासह इतर आवश्यक परवाने घेतले असल्यास ते लगेच अपलोड करायचे आहेत. त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे. त्यानुसार तो त्या-त्या भागातील पोलीस स्टेशनमधील अधिकार्‍यांना पाहायला मिळेल. ऑनलाईन पद्धतीने मिळालेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पोलिसांकडून लगेचच कार्यकर्त्याच्या इ-मेलवर परवाना पाठवला जाणार आहे. त्यामुळे सदर परवाना यंदा पेपरलेस झाला आहे.

पोलीस अधिकारी व सेवकांना सिटीझन पोर्टलचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे काही अडचणी आल्यास त्या तात्काळ दूर केल्या जाणार आहेत. नाशिक जिल्ह्यात गतवर्षात एक गाव एक गणपती बसवलेल्या अधिकृत गणेश मंडळांची एकूण संख्या 2 हजार 985 इतकी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मंडळांनी आपापले ऑनलाईन परवाने लवकरात लवकर काढून घ्यावे, असे आवाहन दराडे यांनी केले आहे.

पोलीस करणार मदत
पोलीस प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारून परवाने देण्याचा निर्णय घेतला असल्याने यंदा एकाही मंडळाचा लेखी, ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. ज्यांना अर्ज भरता येणार नाही अशा कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये जायचे आहे. तेथेही ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरायचा आहे. तो अर्ज कसा भरायचा याचे मार्गदर्शन पोलीस अधिकारी, सेवक करणार आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!