जिल्ह्यात तहसीलदारांमार्फत होणार गणेश मंडळांची तपासणी

0

नाशिक । न्यायालयाने गणेश मंडळांकरिता नियमावली ठरवून दिली आहे. मात्र अनेक गणेश मंडळांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. मात्र जिल्हा प्रशासनाने तहसीलदार, उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत गणेश मंडळांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या गणेश मंडळांवर कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

सार्वजनिक उत्सवाच्या नावाखाली अनेक गणेश मंडळे शहरातील मध्यवस्तीतील महत्त्वाच्या रस्त्यांवरच गणेश मंडपाची उभारणी करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोच शिवाय मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून नागरिकांवर दबाव आणला जातो. अनेक मंडळे अग्निशमन व्यवस्था, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कुठल्याही उपाययोजन तेथे उपलब्ध करत नाहीत. त्यामुळे अनेकदा आपत्तीच्या घटना घडल्या आहेत. वारंवार सांगितल्यानंतरही मनपा, नगरपालिकांच्या वतीने, पोलिसांकडूनही अपेक्षित कारवाई केली जात नसल्याने थेट न्यायालयातच तक्रार दाखल झाली. न्यायालयाने गतवर्षी त्याबाबत मंडळांसाठी नियमावली जाहीर करत त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांवर दिली.

त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने तहसीलदार, त्या-त्या प्रांताधिकार्‍यांकडून मंडळांकडून या नियमावलीचे पालन केले जाते की नाही, याची तपासणी केली जात आहे. त्याच आधारावर महापालिकेकडून संबंधित मंडळांना मंडप उभारणीची परवानगी दिली जाणार आहे. जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव महापालिकेच्या हद्दीतील मंडळांची तपासणी आता तहसीलदारांकडून केली जात आहे. त्याचा अहवाल महापालिकेला दिला जाणार असून त्यानंतर मनपा त्यावर निर्णय घेईल. तसाच एक अहवाल शासनालाही दिला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

गुन्हेगार रडावर
सार्वजनिक उत्सवात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यादृष्टीने गुन्हेगारांची तडीपारी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने दोन दिवसांत बैठक घेऊन लागलीच संबंधित गुन्हेगारांची तडीपारी जारी केल्या जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच यापूर्वीच तडीपार केलेल्या गुंडांचीही तपासणी केली जाणार आहे. ते नियमित ठरवून दिलेल्या पोलीस ठाण्यात हजेरी लावतात की नाही याबाबतही खात्री केली जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांच्या वतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*