गणेशोत्सवाच्या तोंडावर महागाईच्या झळा

जीवनाश्यक वस्तू, पूजा साहित्य, भाजीपाल्याने खाल्ला ‘भाव’

0

नाशिक : इंधनाच्या वाढलेल्या किमती, त्यातून वाहतूक व अन्य खर्चात झालेली वाढ यामुळे बाजारपेठेतील सर्व वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे या महागाईच्या चक्रात ग्राहकच भरडला जात आहे. गेल्या आठवड्यापासून इंधनाचे दर दररोज नवी उंची गाठत आहेत. वाहतूक खर्च वाढत असल्याने त्याचा फटका भाज्या व इतर जीवनावश्यक वस्तूंना बसत आहे. बाजारात भाज्यांच्या दराच्या वाढ झाली आहे. गणेशोत्सवाच्या तयारीत असलेल्या शहरातील भक्तांना गणेशमूर्तींपासून पूजा साहित्यापर्यंत प्रत्येक खरेदीसाठी खिसा रिकामा करावा लागत आहे.

कापूर, कापसाच्या वाती, अगरबत्तींचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. कापराचे दर प्रति पाव किलोमागे दुप्पट झाले आहेत. पाव किलो कापरासाठी आता 400 रुपयांपर्यंत दर सांगितला जात आहे. कापूर ज्वलनशील असल्याने त्यावर 18 टक्के जीएसटी लागू होतो. त्यामुळे ही किंमत वाढली असल्याचे सांगण्यात येते. अगरबत्तीचे दरही 400 रुपयांपासून 1000 रुपये किलोदरम्यान आहेत. अगरबत्तीवरही 5 टक्के जीएसटी लागू होतो. गेल्यावर्षी 300 रुपयांना मिळणारा अगरबत्तीचा पुडा यंदा 500 ते 525 रुपयांवर पोहोचला आहे. पूजेचा संपूर्ण संचही 250 ते 300 रुपयांवरून 50 ते 100 रुपयांनी महागला आहे.

गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे. गणेश वस्त्रांच्या किमतीही वाढल्या आहेत. मूर्तीचा आकार, मूर्तीवरील कलाकुसर, मखर यामध्ये थोडीशी कपात करून खर्चावर नियंत्रण आणले तरी पूजेचे साहित्य ही प्राथमिक गरज आहे. त्याच्या खर्चात कपात कशी करायची, असा प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे.

बजेट कोलमडले
गणेशोत्सवाच्या तयारीत असलेल्या शहरातील भक्तांना गणेशमूर्ती, सजावट साहित्यासह पूजा साहित्य खरेदी करावे लागत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेशमूर्ती, सजावट साहित्य, किराणा, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे भक्तांचे बजेट कोलमडले आहे. त्या तुलनेत मासिक उत्पन्न कमी असल्याने भक्तांना खरेदी करताना काटकसर करावी लागत आहे.

भाज्यांचे दर वधारले

नाशिक शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने भाज्यांचे दर कमी होतील असे वाटत होते. ऑगस्टमध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर नियंत्रणात होते, मात्र गणेशोत्सवाची चाहूल लागताच भाज्यांचे दर वधारले आहेत. अतिरिक्त पाणी फ्लॉवर, कोबी, गाजर, वाटाणा, टोमॅटोसारख्या भाज्यांना लागले तर त्या खराब होतात. त्यामुळे घाऊक बाजारात येणार्‍या मालामध्ये चांगली गुणवत्ता असलेल्या भाज्यांचे प्रमाण कमी आहे. ज्या चांगल्या भाज्या किरकोळ विक्रीसाठी नेल्या जातात त्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेते त्या वाढीव दराने विकत आहेत. तसेच संपामुळेही भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
-अरुण काळे, सचिव, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कापराचे भाव दुप्पट झाले आहेत. गतवर्षी कापूर 600 रुपये किलो होता, तर यावर्षी 1200 रुपये किलो आहे. ग्राहक पाव किलोची मागणी जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे पाव किलो कापरासाठी आता 400 रुपयांपर्यंत दर आहेत. अगरबत्तीचे दरही 40 टक्क्याने वाढले आहेत. गेल्यावर्षी 300 रुपयांना मिळणारा अगरबत्तीचा पुडा यंदा 500 ते 525 रुपयांवर पोहोचला आहे. कापरावर 18 टक्के जीएसटी व अगरबत्तीवरही 5 टक्के जीएसटी आहे. त्यामुळे ही किंमत वाढली आहे. गणेशमूर्तीला कोणताही कर नाही, मात्र गणेशपूजेच्या साहित्यावर जीएसटी आहे. विनाकर पूजेचे साहित्य ग्राहकांना विकता आले पाहिजे.
– योगेश शहा, विक्रेते 

LEAVE A REPLY

*