परदेशातील आमचा गणपती : ऑस्ट्रेलियातील कडवेंचा गणेशोत्सव

0

नाशिक : गणेशोत्सवाच्या आठवणी नुसत्याच आठवणी न राहता त्यांना खऱ्या अर्थाने उजाळा देता यावा अन त्याच बरोबर येथे जन्मलेल्या मराठी कुटुंबातील बाल-गोपाळाना गणेशोत्सवाची माहिती अन महती पटावी, म्हणून ऑस्ट्रेलियातील विविध ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतो. महाराष्ट्राप्रमाणेच येथे देखील दीड दिवसाचा, ५ दिवसाचा आणि अनंत चतुर्दशी पर्यंतचा गणपती असतो.

मेलबर्न शहरातील Cranbourne -Dandenong (डंडेनाँग) परिसरातील जवळपास ७०-८० मराठी कुटुंबे जे गेल्या ७-१० वर्षात स्थलांतरीत झालेले आहेत, येथे विविध मराठी सण-वार साजरे करतात. त्यातील गणपती उत्सव हा सर्वात जास्त आनंददायी महोत्सव होय.

येथील सौ मानसी आणि श्री. सचिन कडवे मूळ गाव – नाशिक ह. मु. मेलबर्न, ऑस्ट्रेलिया यांच्या क्रेनबर्न (Cranbourne) येथील राहत्या घरी मागील ६ वर्षापासून हा सण साजरा होतो. जरी हा गणपती घरगुती असला तरी त्याला सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप देण्यात सौ मानसी आणि श्री. सचिन कडवे कुटुंब सफल झाले आहेत.

अगदी मखर – सजावटीपासून यांच्या घरी मराठी समुदायाचा राबता असतो. प्रत्येकाच्या डोक्यातील सुपीक कल्पनांनी, अनेक जर-तर वर विचार करून एकदाचे कशी सजावट करायाची याचा निर्णय होतो. त्यांची ऑस्ट्रेलियाला वाढलेली दोन्ही मुले चि. वेद आणि चि. नील उत्साहात आणि हिरिरीने सजावट करतात.

गणेश चतुर्थीच्या आदल्या साप्ताहिक सुट्यामध्ये (Weekends) ही सर्व तयारी करून ठेवले जाते. कारण एकदा का सोमवारी आठवडा सुरु झाला की जो तो आपापल्या उद्योग-धंद्यात गुंतून जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा होते. ज्यांना शक्य होईल तेवढी कुटुंबे स्थापनेच्या वेळी उपस्थित असतात. पण खरी मज्जा येते ती शुक्रवार-शनिवार आणि रविवारच्या आरत्यांना. २ दिवस असलेल्या साप्ताहिक सुट्टयामध्ये खरी धमाल येते.

हा गणपती अनंत चतुर्दशी पर्यंत असल्याने २ वेळा साप्ताहिक सुट्ट्या येतात. सदर दिवशी सांज- आरत्यांना मोठ्या आवाजात शक्य तेवढ्या वाद्य वाजनात, मोठया उपस्थित घेऊन नाशिकच्या- महाराष्ट्रतल्या गणेशोत्सवाचे स्वरूप देण्याचा पर्यंत श्री. व सौ. कडवे यांच्याकडून केला जातो.

सदर उत्सवाचे निमित्त साधून श्री. कडवे यांच्या घरी ‘सत्य नारायणा ‘ची पूजा सुद्धा आयोजित केलेली असते. तसेच आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. इतरही मराठी कुटुंबांकडे गौरी- गणपती असल्याने कोणाच्या घरी कोणत्या दिवशी कार्यक्रम हे आधीच ठरवून घेतलेले असते. सर्वांकडेच जवळजवळ सर्व मराठी समुदाय उपस्थित असतो.

भारतातून आणून ठेवलेले खास पारंपारिक पोशाख या दिवशी कपाटातून बाहेर पडतात. लहान-थोर सर्वच मोठ्या उत्साहाने पारंपारिक पोशाखात सदर कार्यक्रमाना उपस्थित राहतो. बर्याचदा आयोजकांनी तसे बजावून सांगितलेले असते. आरती , महाप्रसादानंतर करमणुकीचे कार्यक्रम होतात. प्रत्येकातील सुप्त गुण- दर्शन होते. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे येथे वाढणाऱ्या चिमुकल्यांना ‘गणेशोत्सव’ समजवण्याचा पर्यंत होतो.परंपरा जपण्याचा प्रयन्त होतो. आणि त्यात कडवे कुटुंबीयांसारखे संस्कृती जपण्याची धुरा निस्वार्थपणे वाहत असतात.

LEAVE A REPLY

*