Type to search

Breaking News maharashtra नाशिक मार्केट बझ मुख्य बातम्या

नेटवर्क मार्केटिंग मधील साडे आठ हजार कोटींचा घोटाळा उघड होणार

Share

नाशिक । केबीसी, मैत्रेय, समृद्धीनंतर आता मल्टिलेव्हल मार्केटिंगमधील आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. फ्युचर मेकर असे या कंपनीचे नाव असून सुमारे साडेआठ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. हरियाणा राज्यातील हिसार येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयास टाळे ठोकण्यात आले आहे.

यामध्ये नाशिक जिल्ह्यासह विभागातील धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधीची रक्कम यामध्ये असून सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र या प्रकरणी नाशिक पोलिसांत अद्याप एकही तक्रार दाखल नसल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.

फ्युचर मेकर कंपनी स्थापन करून मुख्य व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम सुधार यांच्यासह इतर संचालकांनी या कंपनीची पाळेमुळे हरियाणा राज्यासह देशातील इतर राज्यांमध्येही पसरली आहेत. हिसारमधील फ्युचर मेकर लाईफ इन्शुरन्स कंपनीने देशभरात आठ हजार कोटींना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तेलंगणा पोलिसांनी हिसारमध्ये कंपनीचे कार्यालय सील केले. त्यापाठोपाठ हैदराबाद येथे कारवाई करत पोलिसांनी कंपनीच्या देशभरातील जाळे खणून काढणार असल्याचे व कंपनीच्या अधिकार्‍यांची मालमत्ता तपासली जाणार असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये नाशिकसह जळगाव, धुळे येथील शेकडो गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीमधून पथकाने हार्ड डिस्क, लॅपटॉप आदी महत्वाचे कागदपत्र जप्त केले आहे. याआधारे देशभरातील 40 ते 50 लाख नागरिकांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी तक्रारी आल्यानंतर कंपनीच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली. त्यात काही संशयितांना अटकही केली. त्यामुळे कंपनीचे आर्थिक व्यवहार बंद झाले आहेत. कंपनीचे संचालक राधेश्याम यांच्या पाच बँक खात्यात 218 करोड रुपये असल्याने ते सील करण्यात आले आहेत. देशभरात या कंपनीचे सुमारे दीड कोटी गुंतवणूकदार असून त्यांनी 8 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे.

नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांमधील गुंतवणूकदारांनीही यात गुंतवणूक केली आहे. मात्र अद्याप कोणीही पोलिसांकडे तक्रार केलेली नसल्याने पोलिसांनी कारवाई केलेली नाही. मात्र तेलंगणा पोलिसांच्या कारवाईने गुंतवणूकदारांची धाबे दणाणली असून त्यांची आयुष्याची जमापुंजी फ्यूचर मेकर कंपनीत अडकली आहेत. अनेकांनी कर्ज घेत गुंतवणूक केल्याचेही समोर येत आहे. या सर्वांनी ज्या एजंट व मध्यस्थामार्फत पैसे गुंतवले आहेत त्यांच्याकडे आपल्या रकमेसाठी तगादा लावल्याचे शहर व जिल्ह्यात चित्र आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!