Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

राज्याच्या सत्तासंघर्षात बळीराजा दुर्लक्षित

Share

नाशिक : विजय गीते 

नोव्हेंबर महिना उजाडल्यानंतरही राज्यभर ठिकठिकाणी लांबलेला पाऊस पाठ सोडायचे नाव घेत नाहीये. या पावसाने अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते करून टाकले. अशा अडचणीच्या काळात मायबाप सरकारकडून पिकांंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन कोलमडलेल्या बळीराजाला उभारी देण्याची अपेक्षा केली जात आहे.

मात्र राज्यातील सत्तासंघर्षात काळजीवाहू सरकारमुळे आता बळीराजाच काळजीत पडला आहे. कारण काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने शेतकर्‍यांना मिळणार्‍या तत्काळ मदतीबाबत संभ्रम आहे. राज्यातील सत्तासंघर्ष तातडीने निवळावा व कोलमडून पडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे. यासाठी ‘इडा पिडा जावो, बळीचे राज्य येवो’ अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्यात तब्बल महिन्यापासून लांबलेल्या परतीच्या पावसामुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकीची धामधूम होती. या काळात केवळ प्रचार सभांमध्ये आम्ही शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे असल्याची आश्वासने नेत्यांनी भरभरून दिली. मात्र निकालानंतर जिल्ह्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे कधी नव्हे इतके नुकसान झाले. त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधींच्या ं पाहणी दौर्‍यांना चांगलाच जोर आला आहे. या दौर्‍यांवेळी शेतकर्‍यांची विचारपूस करत अश्रू पुसले जात आहेत. नवीन सरकार स्थापन होताच तत्काळ मदतीचे आश्वासही दिले जात आहे.

एकीकडे राज्यात विधानसभेचे निकाल लागून तब्बल पंधरा दिवसांचा कालावधी लोटला असला तरी सत्तेच्या सारीपाटावरील संघर्ष अजूनही सुरूच असून अजूनही नवीन सरकार आरूढ होऊ शकलेले नाही. सत्तास्थापनेकरिता कुणीही राजकीय पक्ष पुढे न आल्याने राज्यपालांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहेत. असे असले तरी त्यांना मात्र कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत अशी परिस्थिती आहे. लांबलेल्या परतीच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाचे तातडीने पंचनामे होऊन भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांंना मदत मिळणार तरी कशी? याबाबत शंका उपस्थित होत आहे. राज्यात नवीन शासनच अस्तित्वात आलेले नसल्याने त्यांचे नोकरशाहीवर नियंत्रण नाही. त्यामुळे पंचनाम्यांनाही उशीर होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे. राज्यात सरकारच अस्तित्वात आलेले नसल्याने शेतकर्‍यांचा आवाज ऐकणार का? अशी आर्त हाक राज्यातील शेतकरी देत आहेत. काळजीवाहू सरकारमुळे बळीराजा काळजीत पडला आहे. शेतकर्‍यांंना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. अन्यथा याचा फटका रब्बी हंगामालाही बसण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!