Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर

Share

नाशिक । प्रतिनिधी
जिल्ह्यातील चारा टंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून जनावरे जगविण्यासाठी बळीराजाला चारा छावण्यांचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यातील चारा छावण्यांची संख्या आता सातवर पोहचली आहे. शनिवारी (दि.15) नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे छावणी सुरु करण्यात आली. या छावणीत एक हजार 179 जनावरे दाखल आहेत.

जूनचा पंधरवडा उजाडला तरी जिल्ह्यात मान्सूनची प्रतिक्षा आहे. ग्रामीण भागात दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे. चारा व पाणी अभावी जनावरे जगवायची कशी असा प्रश्न त्यास सतावत आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. सदयस्थितीत जिल्ह्यात सात चारा छावण्या सुरु आहेत. त्यापैकी सिन्नर तालुक्यात गुळवंच, आडवाडी, खापराळे या तीन ठिकाणी छावण्या सुरु आहेत.

नांदगाव तालुक्यात नांदगाव, चांदोरे व साकोरे येथे छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. तर, येवला तालुक्यात अंदरसुल कृषी बाजार उत्पन्न समितीत छावणी सुरु आहेत. छावण्यांमध्ये प्रशासनाकडून चारा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, जनावरांचे उन्हापासून संरक्षण म्हणून सावलीसाठी शेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सात छावण्यांमध्ये 6 हजार 140 जनावरे आहेत. शेतकरी त्यांचे गाई, म्हशी, बैल यांसह छोटी जनावरे या ठिकाणी बांधत आहे. दरम्यान, पावसाचे आगमन लांबल्यास छावण्यातील जनावरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

सात लाख अनुदानाची प्रतिक्षा
चारा छावण्या अनुदानासाठी जिल्हा प्रशासनाने 25 लाख अनुदानाची मागणी शासनाकडे केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 17 लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. तहसिलदारांना ही रक्कम देऊन संबंधित छावण्याचालकांना त्यांचे देयके अदा केली जात आहे. दरम्यान, सात लाख अनुदानाची प्रतिक्षा असून ते लवकरच जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहे.

चारा छावण्या     जनावरे संख्या
गुळवंच                  504
आडवाडी              782
खापराळे               587
नांदगाव                791
चांदोरे                1684
साकोरे               1179
अंदरसूल             613
एकूण                6140

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!