Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशकात महिला असुरक्षित; वर्षभरात 171 विनयभंग, 52 अत्याचार

Share

नाशिक । खंडू जगताप
शहरात महिला व मुलींचे विनयभंग तसेच अत्याचार्‍याचे प्रमाण वाढत चालले असून सरासरी प्रतिदिनी एक घटना शहरात घडत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात मुली व महिला सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आयुक्तालयातील 13 पोलीस ठाण्यांंत नोव्हेंबरअखेरपर्यंत 171 विनयभंग व 52 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक बलात्काराचे गुन्हे ऑक्टोबरमध्ये 8 तर नोव्हेंबरमध्ये 10 दाखल झाले आहेत. बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण (पोस्को ) अंतर्गत 91 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मागील वर्षी ही संंख्या 61 होती. यामध्ये 30 ने वाढ झाली असून लैंगिक विकृतांची संख्या वाढत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. मागील वर्षी विनयभंगाची संख्या वर्षभरात 132 होती. यात 39 ने वाढ झाली आहे. बलात्कारांची संख्या 36 होती. यामध्ये 18 ने वाढ झाली आहे. याबरोबरच आता सायबर पोलीस ठाण्यांमधूनही ऑनलाईन विनयभंगाच्या तक्रारी दाखल होत आहेत.

युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणे, नंतर लग्नास नकार देणे अशाप्रकारे फसवणुकीतील बलात्काराच्या घटनांच्या सर्वाधिक नोंदी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होत आहेत.
नाशिक हे मुंंबई-पुण्यापेक्षा महिलांसाठी अधिक सुरक्षित शहर मानण्यात येत होते. रात्री 12 पर्यंतही महिला शहरातील रस्त्यांवरून सुरक्षितपणे वावरू शकत असल्याचे बोलले जात होते; परंतु सध्या वाढत असलेली विनयभंग व अत्याचारांची संख्या पाहता रात्र होताच मुली व महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल होत असल्याचे दिसत आहे.

मागील महिन्यात दोन अल्पवयीन मैत्रिणींना रस्त्यात अडवत पाच टवाळखोरांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार अशोकनगर बस स्टॉपवर घडला होता. घरात घुसून युवतीचा व तिच्या बहिणीचा विनयभंंग करण्यात आल्याचा प्रकार नवीन नाशिक परिसरात घडला होता. विद्यालयाच्या वर्गात जाऊन मुलींचा विनयभंग करण्यासह अडवणार्‍या शिक्षकांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. एक दिवसापुर्वीच मुलीच्या घरत घुसून चाकू दाखवत तीचा एकाने विनयभंग केला. वडिलांनी जाब विचारताच त्यांना चाकू दाखवून शिवीगाळ करण्यात आली. पोलिसांचा वचक नसल्याने टवाळखोर अधिक निर्ढावल्याची संतप्त चर्चा शहरात सुरु आहे.

शालेय व महाविद्यालयीन युवतींना अश्लील शेरेबाजीला दररोज तोंड द्यावे लागत असल्याचे वास्तव चित्र दिसत आहे. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्याच्या दुप्पट विनयभंगाच्या घटना घडतात, मात्र शाळा किंवा महाविद्यालय बंद होण्याच्या भीतीपोटी अथवा कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने अनेक मुली तक्रारीसाठी पुढे येत नसल्याने गुन्हे दाखल होत नाहीत. यामुळे पोलिसांनी महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

‘ऑनलाईन’ विनयभंग वाढले
सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन होणार्‍या विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये सोशल साईटवर पीडित महिला, मुलीच्या फोटोंमध्ये फेरबदल करून अश्लील फोटो तयार करून ते पाठवणे अथवा अश्लील चित्रफित, साहित्य फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवणे, काही दिवसांपूर्वी एकाने मुलींना व्हिडीओ कॉल करून नग्न होत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला होता. सोशल साईटवरून ओळख करून घेत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्याही घटना समोर येत आहेत.

घटना अशा

महिना                       विनयभंग              अत्याचार           एकूण
जानेवारी                     18                      0                  18
फेब्रुवारी                     15                      5                  20
मार्च                         19                      5                  24
एप्रिल                       17                      2                  19
मे                           17                      8                   25
जून                         22                      2                   24
जुलै                        11                      5                   16
ऑगस्ट                    15                       4                   19
सप्टेंबर                    17                       3                    20
ऑक्टोंबर                11                        8                   19
नोव्हेंबर                   9                       10                   19
एकूण                 171                        52                  223

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!