Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

प्रबोधनाचं जागर मांडणारी पथनाट्य चळवळ ‘हरवतेय’!

Share

नाशिक । दि. १० गोकुळ पवार : पथनाट्य म्हटलं कि आपल्या एकाच वेश शभूषेत असलेले पाच सहा तरुण मंडळी रस्त्यावर कला सादर करतांना दिसतात. पण पथनाट्य हे रस्त्यावर किंवा गल्लीबोळात करत असले तरी लोकचळवळीचे प्रभावी माध्यम म्हणून पथनाट्याकडे पाहिले जाते. समाजाला भानावर आणणारे, वैचारिक भूमिका मांडणारे, तळागाळातील लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पथनाटय करीत असते. पण हीच प्रबोधनाच जागर मांडणारी चळवळ हरवतं चाललीय का?

एकेकाळी विशिष्ट सामाजिकविचार जनमानसात पोचवण्याचे काम पथनाट्य चळवळीने केले. आजही महाविद्यालयीन एनएसएस व काही सेवाभावी संस्था आपल्या उपक्रमशीलतेतून समाज प्रबोधनासाठी पथनाट्याचा वापर करतात. याद्वारे विविध विषयांना समाजासमोर मांडून त्यांना वाचा फोडण्यात येते. कारण पथनाट्य हि एक सामाजिक चळवळ असून विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा विचार पसरवण्याचे काम अशा पथनाट्याद्वारे करत असतात. रस्त्यावर चालणार्‍या मोर्चा, घेराव, जाहीर सभा यांपेक्षा पथनाट्य वेगळे आहे. यामध्ये स्त्रियांवरील अत्याचार, सरकारची अकार्यक्षमता, कामगारांची पिळवणूक, विद्यार्थ्यांच्या समस्या, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा प्रश्न आदी अनेक विषयांवर ही पथनाट्ये भाष्य करून रस्त्यावरील प्रेक्षकांमध्ये जागृतीचे काम करीत असतात. परंतु आता पथनाट्य चळवळीला ग्रहण लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या विषयांना डावलून पथनाट्य आता मार्केटिंगकडे वळू लागली आहेत. यामुळे पथनाट्याच्या दर्जासह पथनाट्यातील आपलेपण हरवत चालले आहे.

साधारण अमेरिकेत १९६३च्या दरम्यान काही कलावंतांनी मिळून पथनाट्य हि संकल्पना मांडली. त्यानंतर भारतात गेल्या काही दशकांपासून पथनाट्य चळवळ सुरु आहे. या चळवळीने आंबेडकरी चळवळ, स्त्री मुक्ती चळवळ, कामगार चळवळ या चळवळींना साथ देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. अलीकडच्या काळात कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी एकमेव साधन म्हणून पथनाट्य चळवळीकडे पाहिले गेले. तद्नंतर विद्यार्थ्यांनी खूप चांगल्याप्रकारे पथनाट्य चळवळीला दिशा देण्याचे काम केले. शाळा, महाविद्यालय, युवक युवती यांनी सामाजिक चळवळीचा कणा म्हणून चळवळीकडे पाहिले. त्यामुळे गेल्या काही वर्षांत पथनाट्य चळवळीला वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते.

पथनाट्य चळवळीने जोर धरल्यानंतर अलीकडच्या काळात पथनाट्य आणि मार्केटिंग असे समीकरण बनल्याचे दिसत आहे. एकेकाळी सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे पथनाट्य आज राजकीय नेत्यांच्या प्रचारात व्यस्त असतांना दिसते. कारण लोकचळवळीचे प्रभावी माध्यम आज लोकप्रतिनिधींचे प्रचार तंत्र म्हणून वापरले जात आहे. त्यामुळे कामगार, विद्यार्थी स्त्रीवर्ग यांचे प्रश्न व जनआंदोलनाचे माध्यम आज हरवत चालल्याचे दिसून येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!