Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

एक डिसेंबरपासून देशात ‘फास्टॅग’

Share

नवी दिल्ली : येत्या 1 डिसेंबरपासून देशातील वाहनांसाठी नवा नियम लागू होत आहे. या नियमानुसार देशभरातील टोलनाक्यांवर टोलचे पैसे ‘फास्टॅग’ पद्धतीद्वारे वसूल केले जाणार आहेत.

टोलनाक्यांवरील सर्व मार्गिका ‘फास्टॅग’ मार्गिकांमध्ये रूपांतरित करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास यापूर्वीच दिले आहेत. यासाठी 1 डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही रोखीने टोल देणार्‍यांकडून दंडापोटी दुप्पट टोल वसूल केला जाण्याची शक्यता आहे. ‘फास्टॅग’मुळे टोलनाक्यांवरील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची चिन्हे आहेत.

‘फास्टॅग’ ही एक इलेक्ट्रॉनिक पद्धती आहे. फास्टॅग वाहनांच्या दर्शनी भागास लावले जाणार आहेत. वाहनावर ‘फास्टॅग’ असल्यास देशातील टोलनाक्यांवर कोणत्याही प्रकारे रोख पैसे न देता वाहन पुढे नेता येईल. त्यात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन (आरएफआयडी) लावले जाते. टोलनाक्याजवळ वाहन पोहोचल्यावर तेथील सेन्सर कारच्या काचेवर लावलेला ‘फास्टॅग’ स्टिकर ओळखतो व संबंधित चालक-मालकाच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कापली जाते.

यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या संबंधित विभागात आवश्यक बदल करण्यात आला आहे. ‘वन नेशन वन फास्टॅग’ असे नामकरण करण्यात आले आहे. ही प्रणाली लागू झाल्यानंतर वाहनांना देशात कुठेही रोखरहित टोल अदा करता येणार आहे.

‘फास्टॅग’ कसे मिळवायचे?
केवायसीसाठी आवश्यक ओखळपत्र म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जमा केल्यावर गाडीमालकास ‘फास्टॅग’ अकाऊंट तयार करता येईल. यासाठी एक पासपोर्ट आकाराचे छायाचित्रही द्यावे लागेल. सर्व टोलनाक्यांवर किंवा बँकांकडून ‘फास्टॅग’ ऑनलाइन मिळू शकेल. वन टाइम टॅग डिपॉझिटची रक्कम भरल्यानंतर ‘फास्टॅग’ मिळवता येईल. कार, जीप आणि व्हॅनसाठी ही रक्कम 200 रुपये आहे. ट्रक आणि ट्रॅक्टरसाठी 500 रुपये शुल्क भरावे लागेल.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!