Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

युतीचा ‘पोपट’ राहणार ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये

Share

नाशिक । कुंदन राजपूत
दोन वर्षांपूर्वी चित्रपट आला होता.‘ती’ सध्या काय करते? या प्रश्नाने अनेकांना वेड लावले होते. आता, युतीचे काय होणार हा प्रश्न महाराष्ट्राला सतावत आहे. युतीत ‘तो’ अथवा ‘ती’ कोण हा गंमतीचा भाग सोडून द्या. मागील पाच वर्षाचा अपवाद सोडला तर या दोन्ही पक्षांची 25 वर्षापासून युती होती. इतक्या वर्ष टिकतो तो संसार असतो. सहा महिने चालते त्याला ‘लफडे’म्हणतात. यांचे लफडे नव्हतेच. मात्र, आता ‘गरज सरो अन् युती मरो’ अशी दोन्ही पक्षाची भूमिका आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर युतीचा ‘पोपट’यापुढे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार आहे.

निवडणुकीचे ‘राफेल’ उडाले आहे. मागील दोन महिन्यांपासून शिवसेना व भाजप ‘आमंचं ठरलंयं’ असे ठासून सांगत होते. मात्र, अजूनही या दोन्ही पक्षात घडंलय बिघडलय पहायला मिळत आहे. घटस्थापनेला युतीची घोषणा होऊन दोन्ही पक्ष निवडणुकीत एकत्र दाडिया खेळतील, असे बोलले जात आहे. गत विधानसभा निवडणुकीत घटस्थापनेच्या मुहूर्तावर या दोन्ही पक्षांचा घटस्फोट झाला होता. नाथाभाऊंनी युतीचा पोपट मेला हे सांगण्याचे धाडस दाखवले होते.

त्यांनंतर निवडणुकांमध्ये शिवसेना व भाजपने प्रचारात ‘वस्त्रहरण’चा भन्नाट प्रयोग सादर केले. मात्र, दोघांनाही स्वबळावर सत्तेचा सोपान चढता आला नाही. पुढे नाईलाजाने दोन्ही पक्ष एकत्र आले. मात्र, पाच वर्ष दोन्ही पक्षात रुसवे फुगवे सुरुच होते. यांचे क्षणार्धात जुळलेले सूर आणि नंतर झालेले ब्रेकअप महाराष्ट्राने पाहिले. यंदा देखील परिस्थिती काहिशी अशीच आहे. जागा वाटपावरुन पुन्हा दोन्ही पक्षांचे फाटणार आणि युती तुटणार, असे बोलले जात आहे.

खरे तर मागील पाच वर्षाचा अपवाद सोडला तर पंचवीस वर्ष हिदुत्वाच्या मुद्यावर या दोन्ही पक्षांचे सूर जुळले होते. मात्र, आता दिल्लीपासून अगदी गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. तर, बाळासाहेबांच्या निधनानंतर सेनेच्या वाघोबाची दिल्लीपर्यंत जाणारी डरकाळी क्षीण झाली आहे. आता भाजपच्या मागे शिवसेनेची फरफट होत आहे. लोकसभेला देव, देश, धर्मासाठी या दोन्ही पक्षांनी तह केला होता. त्यावेळी भाजपने नमती भूमिका घेतली होती.

मात्र, विधानसभा निवडणुकीत परिस्थिती भिन्न असून राज्यात भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करु शकते, असे बोलले जात आहे. त्यामुळे सेनेला जागा वाटपात भाजपच्या कलेने जावे लागेल. त्यामुळे सध्यातरी या दोन्ही पक्षात ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’ चे रिलेशन असून गरज सरो अन् युती मरो, असे चित्र पहायला मिळत आहे.

शिकारी खुद यहा शिकार हो गया..
लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षातील संबंध ताणले गेले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सावज दमलयं. बंदुंकीची गरज नाही. शिकार मीच करणार’, अशी गर्जना केली होती. मात्र, त्यावेळी भाजपने नमते घेत तह केला होता. लांब उडी मारायची असेल तर दोन पावले मागे जावे लागेत. त्याची प्रचिती भाजपने विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात दाखवून दिली. त्यामुळे ‘शिकारी खुद यहा शिकार हो गया’, अशी चर्चा रंगली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!