Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकचा रणसंग्राम : इतना सन्नाटा क्यू है भाई…

Share

नाशिक । विजय गिते
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. एकेकाळी सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मात्र अजूनही शांतता असल्यामुळे ‘इतना सन्नाटा क्यू है भाई’ अशी कुजबूज सुरू झाली आहे.

निवडणुकीचा बिगुल वाजताच ज्या जोशात भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरबैठका काढण्यास सुरुवात केली आहे त्या तुलनेत जिल्ह्यातील शहर व काँग्रेसच्या गोटात मात्र सन्नाटा आहे. पक्षाच्या पदाधिकारी आणि नेत्यांंना निवडणूक लढवायची आहे की नाही, असा प्रश्न जिल्ह्यातील काँग्रेस निष्ठावानांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकसभेत काँग्रेसला सपाटून मार खावा लागल्यानंतर काँग्रेसने महाराष्ट्रात काही बदल केले. यात थेट प्रदेशाध्यक्षपदी आमदार बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करत काँग्रेसअंतर्गत नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. थोरात यांची निवड झाल्यानंतर आठवडाभर काँग्रेसअंतर्गत उत्साहाचे वातावरण कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांमध्ये होते.

हा उत्साह मात्र फार काळ टिकला नाही. प्रारंभी काँग्रेसमध्ये एकीकडे मोठ्या प्रमाणात उत्साह तर इतर राजकीय पक्षांमध्ये मात्र शांतता होती. मात्र यामध्ये आता बदल झाला असून इतर राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण असून काँग्रेसमध्ये मात्र सन्नाटा पसरला आहे.

काँग्रेसचा समविचारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या गोटातही तशी शांतता होती. मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये मुक्काम ठोकत कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली. मात्र काँग्रेसला आचारसंहिता लागू झाली तरी अजूनही ऊर्जा मिळालेली नाही. मध्यंतरी काँग्रेसने विभागवार आढावा बैठकांंचा धडाका लावला. नाशिकमध्ये विभागीय पदाधिकारी मेळावाही घेण्यात आला. यामध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्याचवेळी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मात्र त्यांचा माहोल स्थानिकांना टिकवता आला नाही.

राज्यस्तरीय नेत्यांनी राज्याच्या विविध भागात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. नाशिकमध्येही अशा प्रकारच्या पक्षांतर्गत मुलाखती झाल्या. यामध्ये ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या त्यापैकी कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत सप्टेंबरमध्ये सूतोवाच करण्याचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी जाहीर केले.

मात्र ही घोषणा काँग्रेसकडून झालीच नाही. परिणामी प्रचारालाही व मतदारांपर्यंत जाण्याची संधीही इच्छुकांंना मिळाली नाही. दरम्यानच्या काळात आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आदींच्या भेटीगाठी घेत उमेदवारीचे साकडे घातले. मात्र त्यांचा उमेदवारी मिळण्यात किती लाभ मिळेल याकडेही इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

नेते नाशिकला फिरकलेच नाहीत
आघाडीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला ज्या जागा येणार आहेत त्यापैकी काँग्रेसकडून उमेदवारी मागणार्‍यांपैकी नाशिक मध्य मतदारसंघातून इच्छुकांची संख्या अधिक आहे, असे राज्यस्तरावरील नेत्यांनी मुलाखती घेतल्या त्यावेळी सांगितले होते. मात्र ज्यांनी ज्यांनी या मुलाखती घेतल्या त्यांनी मुलाखतीनंतर कुठलेही वक्तव्य केले नाही अन् हे नेते नाशिकला फिरकले नाही. त्यामुळे पक्षात नाराजी आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!