Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आजपासून जनजागृती

Share

नाशिक । प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेने पूर्व तयारी सुरु केली असून सोमवार (दि.1) पासून जिल्ह्यात मतदान जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. वृक्षारोपण मोहीमचे औचित्य साधून मतदारांच्या मनामध्ये लोकशाही व मतदान याबाबत जागृतीचे बीजारोपण करण्यात येणार आहे. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, हा मोहीमेचा हेतू आहे.

निवडणूक उपजिल्हा अधिकारी अरुण आनंदकर यांनी संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेत निवडणूक तयारीचा आढावा घेतला.लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारी मध्ये काही प्रमाणात वाढ झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी,यासाठी जिल्हाभर जनजागृती करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर सर्वाधिक मतदान झाले तेथील बीएलओचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ज्या मतदान केंद्रांवर सर्वात कमी मतदान झाले होते,अशा ठिकाणी मतदान कमी का झाले, याचा अभ्यास केला जाणार आहे. शाळा,महाविद्यालयात विविध कार्यक्रमाद्वारे मतदारांमध्ये लोकशाही व मतदानाचे महत्त्व याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे व मतदान वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.

पथनाट्ये,रॅली द्वारे मतदार जागृती मोहिम घेण्यात येणार असून भारत निवडणूक आयोग,दिल्ली यांच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदारांच्या सोयी सुविधा याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी आपले नांव मतदार यादीत असल्याची खात्री करावी आणि याबाबत काही अडचण असल्यास आपल्या परिसरातील मतदान केंद्राच्या मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांचेकडे संपर्क साधावा.

जिल्ह्यातील मयत व दुबार मतदारांची नांवे मतदार यादीतून वगळण्याची मोहीम सध्या जिल्हाभर वेगाने सुरू असून नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी शुद्ध व दोष विरहित करण्याच्या नाशिक जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे,असे आवाहन निवडणूक शाखेकडून करण्यात आले आहे.

विभागाचे तहसिलदार प्रशांत पाटील, जि.प.शिक्षणाधिकारी(प्राथमिक) वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी(माध्यमिक) नितिन महाजन,मनपा शिक्षणाधिकारी देविदास महाजन आदींसह अधिकारी उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!