Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

युतीतील बंडखोरांमुळे काँग्रेसला येणार अच्छे दिन !

Share

नाशिक । विजय गिते
वर्षानुवर्षे सत्तेच्या जोरावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व स्तरावर अनेक वर्ष सत्ता गाजवली. मात्र, गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये केंद्र व राज्यातील सत्ता काँग्रेसच्या हातून गेली. ही सत्ता आता भाजप-शिवसेना महायुतीच्या हाती आली आहे. यामुळे सत्तेच्या जोरावर युतीचा वारू सध्या सर्वत्र उधळत आहे.

यामुळे भाजप-शिवसेनेमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या इनकमिंग जोरात आहे. दरम्यान, सर्वच स्तरांवर गलितगात्र झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आयाळ गेलेल्या सिंहासारखी झाली आहे. अशाही परिस्थितीत काँग्रेसलाही जिल्ह्यात चांगले दिवस येणार असे काहीसे चित्र आहे.

निवडणूक तारीख जवळ येत आहे, तस-तशी शिवसेना-भाजपकडे इनकमिंग जोमात आहे. मात्र, ही इनकमिंग उमेदवारी वाटपापर्यंत सुरू राहणार आहे. एकदा उमेदवार्‍या जाहीर झाल्या की, बंडखोरींची लागण या दोन्हीही पक्षांना होणार असे चित्र आहे. जागा एक आणि इच्छुक डझनभर अशी अवस्था सध्या भाजपाचीच सर्वाधिक आहे. भाजपकडून उमेदवारी मागणार्‍यांंमध्ये मोठी संख्या असून अनेकजन महायुतीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.

दरम्यान, भाजपचे जिल्हा व राज्य पातळीवरील पदाधिकारी, नेते पक्षाकडे जो-जो इच्छुक उमेदवारी मागेल, त्या प्रत्येकाला होकार देत आहे. या होकारामुळे इच्छुकांचीही उमेदवारीबाबतची धडधड वाढलेली आहे. उमेदवारी एक आणि इच्छुक डझनभर अशा स्थितीत उमेदवारी द्यायची तरी कोणाला आणि उमेदवारी मिळणार तरी कोणाला अशी अवस्था नेते आणि इच्छुक या दोघांंचीही झाली आहे.

इच्छुकांचीही घालमेल यामुळे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळेलच याबाबत साशंकता असलेल्या इच्छुकांकडून इतर पक्षांकडेही भेटीगाठी सुरू आहेत.

इच्छुकांंचे- विरोधकांचे गुप्तगु
नाशिक शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघ भाजपलाच सुटणार अशी सद्यस्थिती असल्यामुळे इच्छुकांची संख्या या तीनही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळेलच याची खात्री नसलेल्या इच्छुकांंनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांशीही संपर्क ठेवत गुप्तगू सुरू ठेवले आहे. यातूनच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन येणार अशी चिन्हे आहेत.

नाशिक शहरातील पूर्व, पश्चिम व मध्य या तीन मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असून त्यांचेच तीनही विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळेल, असे चित्र असले तरी या तीनही मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मागणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे चित्र बदलू शकते.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी गुणधर्मानुसार नाशिक मध्य व पूर्व हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसच्या तर नाशिक पश्चिम मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येतो. त्यामुळे नाशिक मध्यमधून भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास काँग्रेसकडे उमेदवारी मागणार्‍यांची संख्या वाढणार आहे. अशीच परिस्थिती नाशिक पूर्व मतदारसंघातही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसला अच्छे दिन आल्यास नवल वाटायला नको.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!