Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पाठयपुस्तकातील क्यूआर कोडबाबत पालक-विद्यार्थी अनभिज्ञ

Share

नाशिक । अजित देसाई

राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामार्फ़त तयार करण्यात आलेल्या सातवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात कृतियुक्त शिक्षणपद्धतीवर भर देण्यात आला आहे. पाठयक्रमातील प्रत्येक पाठ विशिष्ट क्यूआर कोडच्या माध्यमातून थेट स्मार्टफोनवर उघडता येणे शक्य झाले असून त्यातून विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने अध्यापनाचा प्रयत्न केला जात आहे. ही पद्धती सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थी देखील सहज आत्मसात करू शकणार आहेत. असे असले तरी मुळात याबद्दल पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती होत नसल्याचे चित्र आहेे.

पाठ्यक्रमातील क्यूआर कोड व त्याला अनुसरून राज्यातील शिक्षकांच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेल्या दिक्षा या मोबाईल अप्लिकेशन बद्दल विद्यार्थ्यांसोबत पालक देखील अनभिज्ञ असल्याचे वास्तव आहे. आज प्रत्येक घरात स्मार्टफोन उपलब्ध असून लहान मुले देखील त्याचा सराईतपणे वापर करत असल्याचे आपण बघतो. मात्र शालेय प्रगतीत अनेकदा हि मुले मागे राहत असल्याचे चित्र आहे.ते बदलण्यासाठी पालकांमध्ये जागृती करण्याची गरज असून तसे झाले तरच शिक्षक व पालक एकत्र येउन कृतियुक्त शिक्षणपद्धतीला न्याय देऊ शकतील असे म्हणावेसे वाटते.

दीक्षा अप्लिकेशनसह क्यूआर कोडविषयी विद्यार्थी व पालकामध्ये आजघडीला कभी ख़ुशी कभी गम असेच वातावरण आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सुधारित अभ्यासक्रमात विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीचा अवलंब असून त्यात कृतियुक्त शिक्षणावर भर देण्यात आला आहे. केवळ शाळेत अध्यापन करणारे शिक्षकच यामुळे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक राहणार नसून पालकांची जबादारी वाढवण्यात आली आहे. मात्र पाठयपुस्तकातील प्रत्येक पाठाच्या सुरुवातीच्या पानावर असणारी क्यूआर कोडची भानगड पालकांच्या डोक्यात शिरत नसल्याने अडचणीची तर नाही ना असेच वाटू लागले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, हसत खेळत त्यांनी शिक्षण पूर्ण करावे या हेतूने कृतियुक्त शिक्षणावर भर देण्यात आला आहे. हे करून बघा, जरा डोके चालवा अशा सूचना पाठयक्रमात देण्यात आल्या असून त्याद्वारे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वाढावी हा उद्देश आहे. मात्र या पद्धतीविषयीच विद्यार्थी आणि पालक अनभिज्ञ राहणार असतील तर कृतियुक्त शिक्षण पद्धती यशस्वी कशी होणार हा प्रश्न आहे.

असे चालते काम
पाठयक्रमातील प्रत्येक पाठ क्यूआर कोड स्कॅन करून मोबाईलवर उघडता येतो. यासाठी मोबाइलफोन मध्ये कोड स्कॅनर किंवा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने विकसित केलेले दिक्षा हे अप्लिकेशन डाऊनलोड करावे लागते. कोड स्कॅन झाल्यावर संबंधित पाठ उघडला जाऊन चलचित्रे, पाठाला अनुरूप वस्तुरूप चित्रे, ऑडिओ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशा पद्धतीने सुटसुटीत मांडणी केलेली असते. पाठयक्रमाशी संबंधित प्रश्नावली देखील यात समाविष्ठ असून ती सोडवणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणारे गुणदान देखील साठवून ठेवता येते.

या पद्धतीचा वापर शिक्षकांनी शाळेत केल्यास वर्गातील एलईडी टीव्ही संचावर सहजपणे व विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत शिकवणे शक्य आहे. तर घरी देखील हीच पद्धत अवलंबिली तर शिक्षक आणि पालक यांच्यातील समन्वयातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधने सहज शक्य आहे. दिक्षा ऍपवर देखील याच पद्धतीने अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. पाठाशी संबंधित ऑडिओ आणि व्हिडीओची त्यात अधिक भर घालता येते. पालकांनी दीक्षा ऍप किंवा बारकोड स्कॅनर मोबाईलवर डाऊनलोड करून घेतल्यांस मुलांना घरी देखील हसत खेळत कृतियुक्त शिक्षणाचे धडे गिरवता येणार आहेत.

त्रुटी दूर केल्यास फायदा
सध्याची शिक्षणपद्धती विद्यार्थीकेंद्रित आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपूर व योग्य पद्धतींने वापर झाल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगिक विकास निश्चितच होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने आणलेली क्यूआर कोडची पद्धती किंवा दिक्षा ऍप नव्या शिक्षणपद्धतीला पूरक आहेत. प्रत्येक बाबीला चांगली व वाईट अशा दोन बाजू असतात. मुळात या उपक्रमाबद्दल पालकांना पुरेशी माहिती नाही.

त्यामुळे आधीच्या सारखे शाळेत शिक्षक शिकवतील त्यावर विद्यार्थी अवलंबून राहतात. शहरी भागातील मुलांसारख्या खाजगी शिकवणीच्या सुविधा ग्रामीण भागात नसल्याने तेथील विद्यार्थी मागे राहण्याची भीती आहे. शिक्षक आणि शिक्षण विभागाने या डिजिटल तंत्रविषयीची माहिती पालकांना देणे आवश्यक आहे. तरच कृतियुक्त शिक्षण पद्धती आत्मसात होऊन विद्यार्थ्यांचा फायदा होईल
– सुवर्णा काटे, पालक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!