Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : धबधब्याखाली मनसोक्त चिंब व्हा…. पण जपून

Share

नाशिक । गोकुळ पवार: दरवर्षी प्रमाणे यंदाही नाशिक शहरासह मुंबई, पुणे येथील पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी दुगारवाडी धबधब्याला पसंती देत आहेत. अनेक पर्यटनवेडे मौजमजा करण्यासाठी या ठिकाणाची निवड करतात. परंतु पुरेशी सुरक्षा घेतली जात नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे दुगारवाडीसह इतर धबधब्यांचा मोह उत्साहवर्धक वाटत असला तरी दुसरीकडे धबधब्यांची असुरक्षितता वाढत चालली आहे.

दरम्यान पावसाळा सुरू झाला की त्र्यंबकेश्वर परिसरातील नद्या व छोटे छोटे धबधबे पर्यटकांना खुणावू लागतात. दूधसागर धबधबा, अशोका वॉटरफॉल, दाभोसा धबधबा, अंजनेरी धबधबा, दुगारवाडी धबधबा अशी धबधब्यांची यादी नाशिक जिल्ह्यात आहे. त्यापैकी दुगारवाडी धबधबा हा देखील विकेंडमध्ये पर्यटकांनी फुलून जात असतो.

वनविभागाने सूचनाफलक लावले असले, तरी दरवर्षी या ठिकाणी अपघात होतात. अनेक तरुणांसह कुटुंब देखील या धबधब्यावर गर्दी करत नदीमध्ये उतरतात. अशावेळी पाऊस वाढला की नदीचा प्रवाह अचानक वाढतो. पर्यटकांना पाण्याच्या वेगाचा अंदाज येत नसल्याने अनेकजण वाहून जातात. यामध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. बहुतांश अपघात पर्यटकांचा अतितायीपणा व सुरक्षेविषयीच्या निष्काळजीपणामुळे झाले असल्याचे उघड झाले आहे.

पावसाळी पर्यटन म्हटले कि, फिरणे, फोटो काढणे, पार्ट्या करणे हे जणू समीकरण झालं आहे. अशातच कौटुंबिक सहलीचे प्रमाण वाढले आहे. परंतु काही वर्षांमध्ये उपद्रवी तरुणांचा वावर या परिसरामध्ये वाढला आहे. नदी व धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करून गोंधळ घालत इतर पर्यटकांना त्रास देण्याचे काम ही मंडळी करत असते. आणि याच अवस्थेत धबधब्यात उतरणे, सुरक्षा न बाळगणे यामुळे वाहून जाण्याचे अपघात घडत आहेत. दरम्यान अशावेळी पोलिसांनी धोकादायक ठिकाणी बंदी घातली पाहिजे. तसेच वनविभागाने याबाबत वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. परंतु काही पर्यटक पोलिसांना न जुमानता धबधब्यात उतरतात आणि अपघात होण्याची चिन्हे वाढतात.

”धबधब्यापर्यंत पोचण्यासाठी दुगारवाडीच्या नदीतूनच प्रवेश करून जावे लागते. यात पाऊस नसल्यावर अनेकजण कुठलाही विचार न करता धबधब्याजवळ पोहचत पाण्यात उतरतात आणि पाण्याचा आनंद लुटतात. मात्र, पाण्याच्या वेगवान प्रवाहासोबत ते वाहून जाण्याच्या घटना घडत असल्याचे आढळून आले आहे.

… पण जरा जपून
पर्यटक धबधब्याखाली जाऊन भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतात. परंतु यावेळी धबधब्याखालील कुंडाकडे लक्ष ठेवावं. कधी कधी अधिक पाऊस झाला तर कुंडाच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवावं. कधी कधी मुसळधार पाऊस झाल्याने धबधब्याचं पाणी वाढून दगड पाण्याबरोबर येऊ शकतात. शिवाय अशावेळी ओढ्यातून बाहेर येण देखील कठीण होऊन बसते. त्यामुळे वेळीच धबधब्यापासून दूर जा. कारण अपघात झाल्यानंतर वेळीच प्रथमोपचार मिळणे आवश्यक असते. दुगार वाडी धबधबा हा अत्यंत उंचीवरून पडणारा धबधबा असून पर्यटकांना खोलवर नदीत उतरून जावे लागते. अशावेळी अपघात झाल्यानंतर वेळीच मदत मिळणे अवघड होऊन बसते.

नियमांचे पालन करा..
पर्यटकांनी धबधब्यावर आनंद घेण्याबरोबरच नियम आणि धोकादायक फलक लक्षात घेऊन वावरणे आवश्यक आहे. यामुळे पर्यावरणाला हानी पोहचत नाही आणि अपघातही होणार नाही. त्यामुळे पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी काही नियम स्वतःवर लादले तर अपघातांची संख्या कमी होऊन पर्यटनस्थळ बदनाम होणार नाही.
-प्रज्ञा दोंदे, विद्यार्थी पर्यटक

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!