जुने एटीएम झाले ब्लॉक झाल्यामुळे नवीन एटीएमसाठी ग्राहकांची गैरसोय

0
खामखेडा वार्ताहर : वैभव पवार
सर्वच राष्ट्रीयकृत बँकांनी जुने एटीएम कार्ड कालबाह्य ठरवून त्याऐवजी नवीन चिप असलेले एटीएम ग्राहकांना बंधनकारक केले आहे. चिप असलेले नवीन एटीएम कार्ड दिले जाणार आहे मात्र त्याच बराच विलंब लागत आहे. राष्ट्रीयकृत बँकाच्या हजारो ग्राहकांना नवे एटीएम मिळालेले नसल्यामुळे अनेकांचे दैनंदिन आर्थिक व्यवहार खोळबले आहेत. नवीन एटीएम कार्डसाठी बँकांमध्ये गर्दीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
रिझर्व्ह  बँकेच्या निर्देशनानुसार सर्वच बँकांनी ग्राहकाचे २०१६ पूर्वीचे जुने एटीएम कार्ड ३१ डिसेंम्बर अखेर ब्लॉक करून चिप असलेले नवीन एटीएम कार्ड देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कार्ड ब्लॉक झाल्यानंतर ग्राहकांनी बँकांशी संपर्क साधल्यासनंतर मुंबई येथील एटीएम कार्ड विभागाकडून पहिल्या टप्प्यात बँकांना पाठविण्यात आलेले चिप असलेले कार्ड ग्राहकांना वितरीत केले जात आहे. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात कार्ड विभागांकडून थेट ग्राहकांच्या घरच्या पत्त्यावर नवीन एटीएम कार्ड पाठविण्यात येत असल्याची माहिती बँक प्रशासनाकडून दिली जात आहे. तसेच आणखी काही दिवसांचा अवधी लागेन असेही सांगितले जात आहे. यामुळे एटीएम च्या माध्यमातून चालणारे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांची गैरसोय होत आहे.
अनेक ग्राहकांचे एटीएम कार्ड त्यांच्यापर्यंत पोहचले नाही. बँकांत चौकशी केली तर कुरिअर अथवा पोष्टाने पाठविल्याचे सांगीतले जात आहे. चालु वर्षात प्रत्येक एटीएम कार्डधारक नवीन एटीएमसाठी बँकेचे उंबरठे झिजवित आहे. परंतु या ग्राहकांना योग्य मार्गदर्शन केले जात नाही नवीन कार्ड आले नसल्याने अनेक ग्राहकांची आर्थिक कोंडी झाली आहे. उसनवार करून व्यवहार भागविले जात आहे.
एटीएम पिन चेंज प्रक्रियेत उडतोय गोंधळ !
मुंबई येथील बँकाच्या एटीएम कार्ड विभागातून पहिल्या टप्प्यात काही ग्राहकांचे नवीन एटीएम कार्ड त्या- त्या बँकांकडे सुपूर्द करण्यात आले. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील ग्राहकांना घरच्या पत्त्यावर पाठविले जात आहे. दरम्यान ज्या ग्राहकांना नवीन एटीएम कार्ड मिळाले त्यांना एटीएम सेंटरवर जाऊन स्वतःच त्यांचा पासवर्ड बदलावा (एटीएम पिन चेंज)लागत आहे या प्रक्रियेमुळे गोंधळ उडत असून चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया राबविल्या जात असल्याने अनेकांच्या हातात नवीन कार्ड असूनही ऍक्टिव्हेट होण्यास अडचणी येत आहेत.

LEAVE A REPLY

*