Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

भूजल पातळी… घटता-घटता घटे!; बागलाण, देवळा, सिन्नर तालुके धोकेदायक वळणावर

Share

नाशिक।  भारत पगारे
घटते पर्जन्यमान व बेसुमार पाणी उपसा यामुळे जिल्ह्याच्या भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यातील बागलाण, देवळा व सिन्नर या तिन्ही तालुक्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. तेथील भूजल पातळी पाच वर्षांच्या तुलनेत निचांकी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे हे तालुके धोकादायक क्षेत्रात (डेंजर झोन) जाऊन पोहोचले आहेत.

गेल्या पाच वर्षांच्या सरासरी भूजल पातळीत यंदाही मोठी घट झाली आहे. सिन्नर (-2.41), मालेगाव (-2.37) व सटाणा (-2.17) या तीन तालुक्याची भूजल पातळी अडीच मीटरने कमी झाली आहे. तीन मीटरपेक्षा भूजलपातळी घटल्यास संबंधित तालुका ‘डेंजर झोन’मध्ये मोडला जातो. त्यामुळे पुढील दीड ते दोन महिने सिन्नर, मालेगाव व सटाणा तालुक्यांची भिस्त टँकरवरच राहणार आहे. सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहायला मिळत असून दुष्काळाचा दाह आणखी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेन हार्वेस्टिंग आणि पाण्याचा जपून व योग्य वापर करणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या 15 तालुक्यांतील सरासरी स्थिर भूजल पातळी दिवसेंदिवस घटत आहे.

जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांत पर्जन्यमान अल्प आहे. त्यातच जेथे पाणी आहे तेथून पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे. पावसाचे प्रमाण सर्वत्र अत्यल्प झाले आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरायला वावच मिळत नाही. एका वर्षात किमान चार वेळा भूजल पातळीची पाहणी केली जाते. ती करण्यासाठी जिल्ह्यातील विहिरी निश्चित करून भूजल पातळीची पाहणी करून तिची तुलना गेल्या पाच वर्षांच्या सरासरी भूजल पातळीशी करण्यात येते. त्यावरून कोणत्या तालुक्यातील गावांत कोणत्या महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू शकते? तालुक्यातील भूजल पातळीत किती घट किंवा वाढ झाली आहे? भविष्यात त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याचा अंदाज या विभागाकडून जिल्हा प्रशासनाला सांगण्यात येतो. भूजल पातळीची पाहणी करताना बहुतेक निरीक्षण विहिरी कोरड्या पडल्याचे आढळले आहे. त्यामुळे भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.

सर्वेक्षणासाठी 185 विहिरी
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने ऑक्टोबर, जानेवारी, मार्च आणि मे महिन्यात भूजल पातळी मोजली जाते. भूजल पातळी मोजण्यासाठी जिल्ह्यातील 185 विहिरी निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मार्चमध्ये दिंडोरीत 10, नाशिक 9, इगतपुरी 10, निफाड 20, सिन्नर 18, येवला 13, नांदगाव 23, सटाणा 18, चांदवड 6, मालेगाव 22, कळवण 6, देवळा 7, त्र्यंबकेशवर 12, पेठ 4, सुरगाणा 7 विहिरींचे भूजल पातळीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

तालुकानिहाय          भूजल पातळी (मीटरमध्ये)
दिंडोरी –                           0.90
नाशिक –                          0.62
इगतपुरी –                         0.39
निफाड –                          0.44
सिन्नर –                             2.41
येवला –                            1.95
नांदगाव –                         1.55
सटाणा –                           2.17
चांदवड –                          0.49
मालेगाव –                         2.37
कळवण –                        1.03
देवळा –                           0.50
त्र्यंबकेश्वर –                      0.90
पेठ –                             1.49
सुरगाणा –                      1.46

...तर भूजलपातळी साधारण
100 टक्के पाऊस झाला तर पाणी पातळी साधारण होते. पूर्वी सलग पाऊस सुरू रहायचा. आता अधून-मधून पाऊस पडतो, तोही काही तासच पडतो. जलस्तर पातळी एकंदरीत पावसावर अवलंबून आहे. नागरिकांनी रेन हार्वेस्टिंगवर अधिक भर देणे आवश्यक आहे. पाण्याचा जपून वापर केला पाहिजे.

बोअर खोदाई मोकाट
पाण्यासाठी बोअर घेताना त्याची कोणतीही परवानगी वा नोंदणी केली जात नाही. त्यामुळे शहर वा ग्रामीण भागात मनमानी पद्धतीने बोअर घेतले जात आहेत. याबाबत कठोर नियमावली आवश्यक आहे.

पाणीटंचाई संकट गहिरे!
मार्चअखेर गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत नीचांकी भूजल पातळी नोंदवली गेली आहे. सिन्नर, सटाणा, मालेगाव तालुका धोकादायक क्षेत्राच्या (डेंजर झोन) कक्षेत आले आहे. भूजल पातळी खालवल्याने जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट अधिकच गहिरे झाले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!