Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

आदिवासींच्या उन्नतीबरोबरच पाणी, शेती प्रश्नाला प्राधान्य -खा. डॉ.भारती पवार

Share

नाशिक। प्रतिनिधी
दिंडोरी लोकसभा मतदार संघ तसा आदिवासी बहुल. त्यामुळे येथील आदिवासींच्या उन्नती बरोबरच पाणी प्रश्न सोडवत शेती उद्योगाला चालना देऊन पर्यटन विकास साधण्यावर आपला प्रामुख्याने भर राहणार आहे.असे मत नवनिर्वाचित खासदार डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले. यावेळी विकासाच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली.

– दिंडोरी-विंचूर औद्योगिक क्षेत्रासाठी काय उपाययोजना ?
औद्योगिक वसाहतीपेक्षा मतदार संघात पाणी प्रश्न गहन आहे. कृषिप्रधान असलेल्या या मतदारसंघात औद्योगिक क्षेत्र वाढावे हे तितकेच महत्त्वाचे आहे.मनमाड येथे औद्योगिक वसाहत मंजूर झालेली आहे.मात्र,ती केवळ पाण्यामुळे थांबललीे आहे.औद्योगिक क्षेत्र विकासामुळे मूलभूत गरजा निश्चितच मार्गी लागतात मात्र यासाठी सर्वप्रथम पाणी प्रश्न सोडवावा लागणार आहे आणि हा पाणीप्रश्न आपण केंद्र शासनाच्या माध्यमातून सोडविण्यावर प्रथम भर देणार आहोत.

– नार-पारबाबत भुमिका काय?
मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नार-पार योजना अत्यंत महत्त्वाची आहे.हा प्रश्न तातडीने मार्गी लागावा यासाठी आम्ही दोघेही खासदार प्रयत्न करणार आहोत.नारपार संदर्भात नुकतीच ना.गडकरी यांची आम्ही भेट दिली असून यापुढे पाठपुरावा सुरू आहे.मांजरपाडा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.पाणीप्रश्नावर अधिक काम करणे गरजेचे आहे,ते आम्ही करणार असून यातूनच मतदारसंघातील पाणी प्रश्न सुटेल.निवडणूक काळात नारपारचे पाणी गुजरातला जाणार असा अपप्रचार झाला.मात्र,ते पूर्ण चुकीचे असून हे पाणी आपल्यालाच मिळणार आहे.

-रखडलेला मनमाड-इंदूर रेल्वेचा प्रश्न कसा सोडविणार?
मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग हा जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.तो मार्गी लावण्यासाठी आपले निश्चितच प्रयत्न राहणार असून हे काम संथ गतीने सुरू असले तरी तोे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू.हा रेल्वेमार्ग झाल्यास शेती,उद्योग व्यवसायाला चालना मिळेल.प्रवाशांचीही संख्या पाहता या भागातील रहिवाशांना हा मार्ग अत्यंत किफायतशीर ठरणार आहे हा मार्ग झाल्यानंतर अंतरही कमी होणार आहे.

– आदिवासी विकास व पर्यटनाकडे कसे पाहता?

पर्यटन वाढले की,रोजगार वाढतो.विकासाला पर्यटन हा एक पर्याय आहे. जिल्ह्यातील सप्तशृंगी गड व परिसरातील हेमाडपंथी मंदिरे व मार्कंडेय गड अशा तिन्ही ठिकाणी विकास झाल्यास या भागात पर्यटन निश्चितच वाढणार आहे.पर्यटन वाढले की रोजगारही मिळतो.देवळीकराड,धोडंबे अशा विविध ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे असून हातगड,रामशेज,धोडप असे विविध किल्ले आहे. या मंदिर व गडांचा विकास केल्यास या ठिकाणी पर्यटनाला अधिक चालना मिळणार आहे.अगदी सापुतारासारखेच वातावरण दिंडोरी,कळवण, सुरगाणा,पेठ या तालुक्यांतही राहते.त्यादृष्टीने या ठिकाणी विकास झाल्यास या भागातही पर्यटन वाढण्यास निश्चितच मदत मिळेल.जिल्ह्यातील संस्कृती जतन करण्याबरोबरच हेमाडपंथी मंदिरे,किल्ल्यांबाबत पुढच्या पिढीसाठी हा साठा जपून ठेवणे महत्त्वाचे आहे.आणि त्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करणार आहे.

– महिलांच्या प्रश्नांकडे कसे बघाल?
जिल्ह्याची पहिली महिला खासदार म्हणून महिलांची मोठी जबाबदारी माझ्यावर आलेली आहे.त्यामुळे एक महिला खासदार म्हणून महिलांसाठी काहीतरी करण्याची मनस्वी इच्छा आहे.महिलांकरिता शासनाच्या अनेक योजना आहेत.त्या योजना शेवटाच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न राहिल. महिलांचे सक्षमीकरण व महिला सबलीकरणासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहे. कुपोषणाचे प्रमाण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून तेे कमी करणे गरजेचे आहे. आपण स्वतःच डॉक्टर असल्याने आपला मतदारसंघ आणि जिल्हाही सुदृढ राहण्यासाठी विशेष प्रयत्न राहिल. जिल्ह्यात कांदा व पाणी प्रश्नावर आपण प्रमुख्याने काम करणार आहे. मतदारांनी आपल्यावर जो विश्वास टाकला आहे तो साथर्र् करण्यावर आपला भर राहिल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!