Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिवाळी २०१९ : ‘कलाकुसर’ पणत्यांनी उजळणार शहर

Share

नाशिक । अवघ्या काही दिवसांवर आलेली दिवाळी पाहता शहरातील मेनरोडवर खरेदीची लगबग वाढली आहे. दिवाळीत विशेषत: महिला वर्गाचा कल अधिकाधिक कलाकुसर, विविधता असलेल्या नवीन आकर्षक वस्तूंच्या खरेदी करण्याकडे असतो.

यंदा कलाकुसर आणि तितक्याच आकर्षक पणत्या कारागिरांनी बाजारात दाखल केल्या आहेत. कारागिरांनी यंदाच्या दिवाळीसाठी पणत्यांना वेगळी रंगसंगती आणि आकार देऊन कलेचे अनोखे रूप सादर केले आहे. या पणत्यांच्या गर्दीने मेनरोड आणि रविवार कारंजा परिसर सजून गेला आहे.

माती, चिनीमातीपासून बनलेल्या आणि शंख, कोयरी, मोर, मासा, पान, तुळशी वृंदावन तर काही झाडांची प्रतिकृती आणि त्यावर पक्षी अशा विविध आकारांच्या व रंगांच्या लहान-मोठ्या पणत्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय कासवाच्या आकाराच्या पणत्या, काही फुलांच्या आकाराच्या पणत्याही ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. पूर्वीपेक्षा बाजारात पणत्यांमध्ये अनेक आकर्षक विविधता असल्याने ग्राहक खरेदीच्या संभ्रमात आहेत.

केशरी-हिरवा, पिवळा-लाल अशा विविध रंगसंगतीच्या पणत्या, त्यावर चमकीने केलेली नक्षी, टिकल्यांनी केलेली सजावट अशा कलाकुसरीने घडविलेल्या पणत्या लक्ष वेधून घेत आहेत. अलीकडे मातीच्या पणत्यांच्या जोडीला रंगीबेरंगी चायना पणत्याही बाजारात आल्या आहेत. पंचवटीतील कोणार्कनगर येथे पणती कारागीरांकडे 70 पेक्षा अधिकच्या डिझाईन असलेल्या पंणत्या उपलब्ध आहेत. दिवाळीसाठी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथून प्लेन पणत्या, राजकोट येथून डिझाईन पणत्या आणल्या जातात.

तर, नाशिकमध्ये बोळके तयार केले जातात. या पणत्या व बोळके बनविण्यासाठी अ‍ॅक्रेलिक पल, गोल्डन कलर व ऑइल पेंट असे तीन रंग वापरले जातात. यमुना, स्वस्तिक, चमची, कमळ आणि ओम यासह अन्य साठहून आधिक डिझाईन तयार करण्यात आले आहेत. मेनरोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, वि. दा. सावरकर उड्डाणपूल यासह अन्य उपनगरांत पणती विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. सध्या पणत्या 30 ते 40 रुपये डझन, रंगीबेरंगी पणत्या 60 रुपये डझनाने विक्रीस उपलब्ध आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!