आता अर्धा तासात जिल्हा होणार ‘सील’

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडेंची योजना

0

नाशिक । दि. 21 प्रतिनिधी
जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैध व्यवसायांचा फास आवळण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी अर्ध्या तासातच संपूर्ण जिल्हा सीलबंद करण्याची अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील चेकपोस्टसाठी अधिक कर्मचारी उपलब्ध करून नवे नाकाबंदी पॉईंट निर्माण करण्यात आले आहेत. याद्वारे जिल्ह्यात गुन्हेगारी तसेच काही घटना घडल्यास अधीक्षकांचे आदेश होताच अवघ्या अर्ध्या तासात जिल्ह्याच्या सीमांसह अंतर्गत भागात सर्व जिल्हा सील होणार आहे.

नाशिक जिल्ह्याला गुजरात राज्यातील जिल्ह्यांसह उत्तरेला धुळे, पूर्वेला जळगाव, अग्नेयेला औरंगाबाद, दक्षिणेला अहमदनगर, नैऋत्येला ठाणे, पालघर, पश्चिमेला नवसारी जिल्हा, वलसाड जिल्हा, वायव्येला डांग जिल्ह्यांच्या सीमा आहेत. नाशिक शहर तसेच जिल्हाभरात गुन्हेगारी, दरोडा टाकणारे इतर जिल्ह्यांतून नाशिकमध्ये येत असल्याचे समोर आले आहे.

यासह या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय, चंदन, दारू यासह विविध प्रकारची तस्करी सुरू असते. काही विघातक शक्तीही सीमावर्ती भागातून जिल्ह्यात सतर्क होत असतात. या सर्वांना आळा घालण्यासाठी तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्याचे अधीक्षक संजय दराडे यांनी पुढाकार घेतला आहे.

नाशिकच्या सीमावर्ती भागातील प्रामुख्याने महामार्गांवर ग्रामीण पोलिसांकडून तपासणी नाके (चेकपोस्ट) उभारण्यात आले आहेत. त्या त्या हद्दीतील पोलीस ठाण्यांकडून यासाठी कर्मचारी देण्यात येत होते. परंतु कर्मचार्‍यांची कमतरता, इतर कामांचा बोजा यामुळे अनेकदा चेकपोस्टसाठी पोलीस कर्मचारी उपलब्ध होत नव्हते.

याचा फायदा अवैध व्यवसाय करणारे व गुन्हेगार घेत होते. या सर्वांचा अभ्यास करून अधीक्षक संजय दराडे यांनी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व सर्व निरीक्षकांची बैठक घेऊन चेकपोस्टचा आढावा घेतला होता.

यानंतर त्यांनी तातडीने आदेश काढत प्रत्येक चेकपोस्टसाठी त्या त्या पोलीस ठाण्याचे 2 पोलीस कर्मचारी तसेच पोलीस मुख्यालयातील 2 कर्मचारी अशा सशस्त्र 4 पोलीस कर्मचार्‍यांची कायमस्वरुपी नेमणूक केली आहे. तर हे तापासणी नाके सायंकाळी 6 ते पहाटे 6 पर्यंत कार्यरत राहणार आहेत.

यासह जिल्ह्यात कोठेही काही घटना घडताच त्या त्या पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय अधिकारी तात्काळ सीमावर्ती भागातील चेकपोस्टवर धाव घेऊन ती पूर्णतः सील करणार आहेत. तसेच या ठिकाणांवरून जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करणार आहेत.

याबाबतची रंगीत तालीमही मागील आठवड्यात पार पडली. तर इतर वेळी उपस्थित कर्मचारी संशयास्पद वाहनांची कडक तपासणी करून गुन्हेगारी व अवैध व्यावसायांना प्रतिबंध करणार आहेत. यामुळे अगामी काळात जिल्ह्यात गुन्हेगारी कारवाया करून जिल्ह्याबाहेर पळून जाणे गुन्हेगारांना सोपे राहणार नाही. परिणामी गुन्हेगारी तसेच अवैध व्यवसायांना आळा बसणार आहे.

असे आहेत चेकपोस्ट

1) पेठ – धरमपूर रोड पिठुंदी नाका 2) जव्हार – मोखोडा रोड   अंबोली फाटा 3) बोरगाव – सापुतारा रोड   हतगड (बोरगाव)4) मुंबई – आग्रा महामार्ग   घोटी टोलनाका5 ) नांदगाव – चाळीसगाव न्यायडोंगरी 6) औरंगाबाद – नाशिक   खामगाव पाटी 7) औरंगाबाद – नांदगाव कासारी 8 ) मनमाड – मालेगाव   पिंपळगाव जलाल9 ) मालेगाव-मनमाड रोड   कानडगाव चोंडी 10) सिन्नर – शिर्डी रोड वावी 11) सिन्नर – संगमनेर रोड   वावी  12) कोळपेवाडी – भरवस लासलगाव

LEAVE A REPLY

*