Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यातील इंधनविक्री आली १० टक्क्यांवर

नाशिक जिल्ह्यातील इंधनविक्री आली १० टक्क्यांवर

नाशिक | प्रतिनिधी

‘लॉकडाऊन’ मध्ये शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या लाखाेंनी घटली आहे. त्यामुळे शहरी भागात
दिवसाकाठी एक लाख लिटर, तर ग्रामीण भागात वीस ते तीस हजार लिटर इंधनाचीच विक्री होत आहे.

- Advertisement -

‘करोना’च्या सावटामुळे पेट्रोलपंपांवरील मनुष्यबळातही घट झाली असून, लासलगावमध्ये नागरिक बाहेर निघणे बंद झाल्याने दहा पंप बंद झाले आहेत. राज्यात संचारबंदी लागू झाल्यावर पहिल्याच दिवशी चाळीस टक्के इंधनाची विक्री झाली होती. मात्र, पुढील टप्प्यात रस्त्यावर उतरणाऱ्यांवर कारवाई होऊ लागल्याने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहेत.

अत्यावश्यक सेवांसाठीची वाहने वगळता इतर वाहनांची संख्या अगदी तुरळक असते. त्याचा परिणाम इंधन खरेदीवर झाला असून, तीन ते चार दिवसांपासून अवघी दहा टक्के इंधनविक्री होत आहे.

त्यामुळे पेट्रोलपंपावरील गर्दी घटली असून, वाहनांच्या रांगाही दिसेनाशा झाल्या आहेत. शिवाय ‘करोना’च्या धोक्यामुळे पंपांवरील कर्मचाऱ्यांची संख्याही घटली असून, अनेक जण कामावर हजर होत नसल्याचे दिसते. त्यामुळे एक-दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने पंप सुरू ठेवले जात आहेत.

विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दुचाकीस्वारांना शंभर रुपयांचे आणि चारचाकीसाठी एक हजार रुपयांचे पेट्रोल दिले जात आहे. त्यामुळे काही दिवसांपासून अवघी दहा टक्के इंधनविक्री होत असल्याचे पेट्रोल डीलर्सनी सांगितले.

निर्णयाअभावी गोंधळ

जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत शंभर आणि हजार रुपयांचे इंधन देण्याबाबत पेट्रो डीलर्स असोसिएशनला सूचना केल्या होत्या. मात्र, एप्रिल महिना सुरू होऊनही पुढील सूचना आलेल्या नाहीत.

अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठीच पंप सुरू ठेवावा, या मागणीवरही अद्याप निर्णय आलेला नाही. ग्रामीण भागात ग्रामपंचायत व पोलिसांकडून पेट्रोलपंप बंद ठेवण्यास सांगितले जाते. शहरातही काही पोलिस ठाण्यांकडून पंप बंद ठेवण्याचे आवाहन केले जाते. मात्र, ठोस निर्णयाअभावी गोंधळ उडत असल्याचे नाशिक डिस्ट्रिक्ट पेट्रो डीलर्स वेल्फेअर असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या