Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यातील सतरा धरणे ओव्हरफ्लो; 20 धरणांतून विसर्ग

Share
यंदा पाणीटंचाई होणार नाही अजून १२ टीएमसी पाणी शिल्लक latest-news-nashik-twelve-tmc-water-in-the-district-dam

नाशिक । जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणे तुडुंब भरली. सप्टेंबरच्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 24 पैकी 17 धरणे शंभर टक्के भरली आहेत, तर 20 धरणांमधून विसर्ग केला जात असल्याने नद्यांना पूर आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील धरणांत 97 टक्के साठा आहे. गतवेळी हे प्रमाण 79 टक्के इतके होते. दरम्यान, समाधानकारक जलसाठ्यामुळे पुढील एक वर्षाची जिल्ह्याची तहान सहज भागली जाणार आहे.

जिल्ह्याने मार्च ते जून या महिन्यात दुष्काळाचे भीषण चटके सहन केले. जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने ‘पाणीबाणी’ निर्माण झाली होती. मात्र जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत पावसाने जिल्ह्यात जोरदार बॅटिंग केली. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांना तर पावसाने अक्षरश: झोडपून काढले. धरण पाणलोट क्षेत्रातही तुफान पाऊस झाला.

परिणामी गंगापूर, दारणा, मुकणे, भावली ही मोठ्या क्षमतेची धरणे शंभर टक्के भरली. तसेच मध्यम व लघु क्षमतेची धरणेदेखील समाधानकार भरली. त्यातच गंगापूर धरणातून विसर्गामुळे गोदावरीला तब्बल 59 वर्षांनंतर महापूर आला. गोदावरी व दारणेच्या पाण्यामुळे मराठवाड्याची तहान भागवणार्‍या जायकवाडीत मोठ्या प्रमाणात पाणी पोहोचले.

जायकवाडीत सद्यस्थितीत 99 टक्के इतका साठा आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाचे सप्टेंबरच्या पंधरवड्यात पुन्हा आगमन झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 24 पैकी 17 धरणे शंभर टक्के भरली आहेत. 20 धरणांतून कमी-अधिक प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास विसर्ग कायम राहण्याची शक्यता आहे.

गिरणा 95 टक्के भरले
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेले गिरणा 95 टक्के भरले आहे. धरणाची क्षमता 18 टीएमसी इतकी आहे. मागील पन्नास वर्षांत हे धरण फक्त आठवेळा शंभर टक्के भरले आहे. पावसाची सुरू असलेली संततधार बघात यंदा धरण शंभर टक्के भरण्याची चिन्हे आहेत.

धरणसाठा (टक्के)
गंगापूर – 100
कश्यपी – 100
गौतमी गोदावरी – 100
आळंदी – 100
पालखेड – 98
करंजवण – 100
वाघाड – 100
ओझरखेड – 100
पुणेगाव – 98
तीसगाव – 100
दारणा – 100
भावली – 100
मुकणे – 98
वालदेवी – 100
कडवा – 100
नांदूरमध्यमेश्वर – 91
भोजापूर – 100
चणकापूर – 94
हरणबारी – 100
केळझर – 100
गिरणा – 95
पुनद – 96

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!