जिल्हा बँकेत राजीनामासत्र

कामकाजावर टीका करत संचालक हिरे बंधू पायउतार

0
नाशिक | दि. १२ प्रतिनिधी- जिल्हा बँकेची वाताहत झाल्यानंतर बँकेच्या अयोग्य कामकाजाचे कारण पुढे करीत आणि बँकेवर होणार्‍या संभाव्य कारवाईच्या धास्तीने जिल्हा बँकेत काढता पाय घेण्यासाठी जिल्हा बँकेत राजीनामा सत्राला सुरुवात झाली आहे.
जिल्हा बँकेचे अयोग्य कामकाज, नोंटबंदीनंतर योग्य भूमिकेचा अभाव, शिक्षकांना वेतन रकम देण्यात कुचराई, शेतकर्‍यांना पीककर्ज देण्यात असमर्थता आणि चुकीच्या व्यवहारांमुळे होत असलेली जिल्हा बँकेची बदनामी, असे कारणे देत जिल्हा बँकेचे संचालक आ. अपूर्व हिरे आणि डॉ. अद्वय हिरे यांनी संचालकपदाचे राजीनामे देत असल्याचे म्हटले आहे.

शेतकर्‍यांना पीककर्ज मिळत नसल्याने झालेले आंदोलन, शिक्षकांचे वेतनाचे रखडलेले पैसे महावितरण कंपनीचे पैसे परस्पर वापरणे, हे चुकीचे कामकाज जिल्हा बँकेच्या प्रशासनाने केले असल्याने जिल्हा बँकेची नाहक बदनामी होत आहे. महावितरण कंपनीने बँकेवर गुन्हा दाखल केलेला आहे तर, जिल्हा परिषदेनेही पैसे अडकले म्हणून बँकेवर कारवाई करण्याची तयारी केली आहे.

बूंकेचे आताचे जे कामकाज सुरु आहे ते अत्यंत असमाधानकारक आणि चुकीचे असून त्यामूळे बँकेच्या नावालौकीकाला तडा गेला आहे. बँकेच्या सभासदामध्ये त्यामूळे संताप व्यक्त होत आहे. कामकाज शेतकरी केंद्रबिंदू ठेवून सुरु नाही. त्याचबरोबर शेतकर्‍यांकडून जे कर्ज वसूल होते. ते इतर खात्यांवर वळवले जात असल्याने, बँकेच्या प्रशासकीय कामकाजाबदल नाराजी व्यक्त होत असून, हे योग्य नाही. त्यामूळे आम्ही दोन्ही हिरे बंधू संचालकपदाचा राजीनामा देत आहे, असे अपूर्व हिरे यांनी म्हटले आहे.
जिल्हा बँकेची आर्थिकस्थिती नीट होत नसल्याने संचालक मंडळातील काही मोजकेच पदाधिकारी पालकमंत्र्यांच्या मधस्थीने जिल्हा बँकेला शासनाकडून मदत मिळावी म्हणून पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करीत आहे.गत १५ दिवसांपासून जिल्हा बँकेच्या पदाधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्षात भेट झालेली नाही. त्यामूळे जिल्हा बँकेला शासन, नाबार्ड, शिखर बँकेकडून काय मदत मिळणारे याचे काही स्पष्ट झालेले नाही. आजही सहकार विभागच्या सचिवांसोबत जिल्हा बँकेच्या पदाधिकार्‍याची बैठक असल्याचे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात अशी काही बेठक झाली की नाही, याचे काही उघड झालेले नाही.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळातही दूफळी असल्याने एक गट आताच्या परिस्थितीला दूसर्‍या गटाला कारणीभूत ठरवतो. त्यामूळे होणार्‍या बैठकांमध्ये वादावादी झाल्याचेही चित्र जिल्हा बँकेत आहे. त्याचबरोबर नोटबंदी दरम्यान झालेल्या पैशांची आदलीबदली, थकीत कर्जाची अत्यल्प वसुली, प्रमाणापेक्षा अधिक कर्जाचे वाटप, बॅकेतील गैरप्रकाराची सहकार विभागाने चालवलेली चौकशी अशा अनेक प्रकरणात जिल्हा बँक अडकलेले आहे.
बँकेची पत घसरलेली असल्याने रिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवहारावर मर्यादा आणलेल्या आहे. तर एनपीएचे प्रमाण अतिप्रमाणात वाढलेले असल्याने जिल्हा बँकेला नाबार्ड, शिखर बँक अर्थसहाय्य करण्यास तयार नाही.बँकेने ठेवीवर कर्ज काढल्याने सुरक्षित भांडवलही अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संचालकमंडळ बरखास्त करून प्रशासक बसवण्याची मागणी गतवेळी झालेल्या शेतकरी आंदोलनात शेतकर्‍यांनी केली होती.

 

अध्यक्षाचाही राजीनामा
जिल्हा बँकेची ढासळलेली आर्थिकस्थिती हाताबाहेर गेल्याने विद्यमान अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनीही बर्‍याच दिवसांपुर्वी राजीनाम देऊन ठेवला आहे. मात्र संचालक मंडळ तो स्विकारत नाही. सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्षपदाची मुदत उलटून गेल्यावरही त्यांनी अध्यक्षपद टिकवण्यासाठी केलेले शर्यतीचे प्रयत्न आता मात्रा राजीनामा संचालक मंडळाने स्विकारावा, यासाठी होताना दिसत आहे. अध्यक्षांचा राजीनामा स्विकारला जात नसल्याने आणि या पदासाठी दूसरे कोणीही सध्या इच्छुक नसल्याने दराडे यांनाच अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेची सद्यस्थिती हाताळावी लागत आहे.

LEAVE A REPLY

*