जिल्हा बँक पदाधिकार्‍यांच्या नशिबी प्रतीक्षाच!

मुख्यमंत्र्यांची भेट आज मिळणार

0
नाशिक, दि.२१ प्रतिनिधी- मुख्यमंत्र्यांच्या कार्यबाहुल्यामुळे नाशिक जिल्हा बँकेच्या पदाधिकार्‍यांना गेल्या चार दिवसांपासून मुंबईत तळ ठोकूनही मुख्यंमत्र्यांची अद्याप भेट होऊ शकली नाही. आज मुख्यमंत्र्यांची भेट मिळण्याची अपेक्षा असताना ती भेटही टळली. आता उद्या सोमवारी भेटीचे आश्‍वासन मिळाल्याने सर्वांचे लक्ष आता सोमवारवर खिळले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत तळ ठोकून बसलेल्या जिल्हा बँक पदाधिकार्‍यांची सहकारमंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्यासमवेत झाली. मात्र या बैठकीत कोणत्याही प्रकारचा महत्वाचा निर्णय होऊ शकला नाही. जिल्हा बँकेने सरकारकडे १७८ कोटींची मागणी केली.

परंतु सरकारने जिल्हा बॅक पदाधिकार्‍यांना राज्य बँकेकडे पाठवले. राज्य बॅकेने पैसे देण्यास स्पष्ट नकार देऊन १०० कोटींची कर्जवसुली करून त्यातून व्यवहार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाच भेटूनच या प्रश्‍नाचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्धार पदाधिकार्‍यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आजच्या भेटीचे अश्‍वासन दिले होते. त्यामुळे सर्व पदाधिकारी त्यांच्या प्रतीक्षेत बसून होते. परंतु दिवसभराच्या व्यस्ततेमुळे मुख्यमंत्री त्यांना भेटू शकले नाहीत. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने मुंबईवारी करणार्‍या पदाधिकार्‍यांची झोळी अद्यापही रिकामीच आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता सोमवारी बैठकीचे आश्‍वासन मिळाले आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्र्यांना भेटायचेच, असा निर्धार जिल्हा बँकेच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. उद्या होणार्‍या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्थिक डबघाईला आलेल्या जिल्हा बँकेचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळाने वारंवार राज्य सरकारकडे मदत मागितली.

मुख्यमंत्र्यांनाही साकडे घातले. परंतु मुख्यमंत्र्यांनीही त्याकडे पाठ फिरवली. व्यवहार काही प्रमाणात का सुरळीत रहावेत म्हणून सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना अध्यक्षांसह संचालक मंडळाने गळ घातली. राज्य शासनाकडून १७८ कोटी मिळावेत, यासाठी आग्रह धरला. शनिवारी सहकारमंत्रयांच्या दालनात झालेल्या बैठकीत यावर चर्चाही झाली.

परंतु त्यांनी जिल्हा बँकेच्या संचालकांना राज्य बँकेकडे पाठवले. राज्य बँकेकडे मदतीसाठी याचना केलेल्या पदाधिकार्‍याना तेथेही निराश व्हावे लागले. राज्य बँकेने मदत देण्यास स्पष्ट नकार दिल्याने संचालकांचे धाबे दणाणले आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या उद्याच्या बैठकीतून तरी काही तोडगा निघावा यासाठी जिल्हा बँकेचे पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून बसले आहेत.

LEAVE A REPLY

*