Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

एक दिवसाचे वेतन संकटग्रस्त शेतकर्‍यांसाठी; जिल्हा प्रशासनाचे पाऊल

Share

नाशिक । प्रतिनिधी

आस्मानी संकटापुढे हतबल झालेल्या बळीराजाच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनातील कर्मचार्‍यांनी सरसावले आहेत. जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांच्या एक दिवसाचे वेतन पीडीत शेतकर्‍यांसाठी दिले आहे. हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा होईल. हा उपक्रम राबविणारा नाशिक राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

अधिकारी व कर्मचार्‍यांनी गुरुवारी (दि.7) जिल्हाधिकार्‍यांची भेट घेत त्यांना या निर्णयाची प्रत दिली. राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. या आस्मानी संकटामुळे शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. नाशिक जिल्ह्यातही या संकटाची तीव्रता अधिक आहे.

एकूण लागवडीपैकी 60 टक्के क्षेत्र बाधित झाले आहे. द्राक्ष, डाळिंब बागा उध्दवस्त झाल्या आहेत. तर, बाजरी, मका, सोयाबीन, तांदूळ ही पिके आडवी झाली आहेत. या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीचे कोटयवधीचे नूकसान झाले आहे. शासनाकडून नूकसानीचे त्वरीत पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

त्यानूसार प्रांत व तहसिलदार युध्दपातळीवर पंचनामे पूर्ण करण्याचे काम करत आहे. राज्यात व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, ही मागणी जोर धरत आहे. नूकसान भरपाई व अन्य मदतीसाठी मोठया प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे. केंद्र व राज्य सरकारकडून मदत उपलब्ध करुन दिली जाईल ही अपेक्षा आहे. मात्र, या संकटात बळीराजाच्या पाठिशी सर्वसामान्य देखील उभे राहिले आहेत.

जिल्हा प्रशासानकडून या संकटात मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी संघटना, तलाठी संघ यांनी एकत्र येत त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी देखील त्यांचे एक दिवसाचे वेतन या मदत निधीस देणार आहे. प्रशासनातील साधरणत: 1500 कर्मचार्‍यांनी या उपक्रमात सहभागी होऊन या संकटात खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठिशी असल्याचा संदेश दिला आहे.

या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी निलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी कुंदन सोनवणे, डॉ.अरविंद अतुर्लीकर, तहसिलदार अनिल दौंड आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!