Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : विषारी औषध प्राशन करीत शेतकऱ्याची आत्महत्या; अवकाळी पावसाने घेतला बळी

Share

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील शेतकऱ्याने अवकाळीने झालेल्या नुकसानीला कंटाळून न्युऑन नावाचे औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली. संजय भास्कर देशमुख असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

दरम्यान ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात जोर धरला असून त्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. विशेषतः द्राक्षबागांवर मोठे संकट कोसळले असून कर्जबाजारी होऊन द्राक्षबागा जगवण्याचे काम शेतकरी करीत आहे. अशा वेळी अचानक निसर्गाने ऐन दिवाळीत शेतकर्‍यांचे दिवाळ काढले. अवकाळीच्या फटक्यामुळे आणि होणाऱ्या नुकसानीमुळे तालुक्यातील मोहाडी येथील संजय भास्कर देशमुख (वय ४८) या शेतकऱ्याने न्युऑन नावाचे औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली.

या शेतकऱ्यावर मोहाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्ज असून इतरही काही बँकेचे कर्ज आहे का याविषयी चौकशी सुरू आहे. या शेतकऱ्याकडे दीड एकर द्राक्ष बाग होती. अवकाळीचा फटका द्राक्ष बागांना बसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीत कळते. गुरूवार (दि.३१) नोव्हेंबर रोजी रात्री जेवण झाल्यावर बाहेरच्या पडवीत संजय देशमुख हे झोपी गेले. घरात झोपलेल्या मुलांना सकाळी बाहेर आल्यानंतर पडवीत त्यांचे वडील तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत दिसले. त्यांच्या शेजारी न्युऑन नावाचे औषधाची बाटली पडली होती.

सदर घटनेची माहिती दिंडोरी पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. दुपारी अतिशय शोकाकुल वातावरणात मोहाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी परिसरातून शेतकरी आत्महत्या झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

शासनाने त्वरित याविषयी गांभीर्याने काहीतरी दखल घेऊन पाऊल उचलावे असे मागणी परिसरातून होत असून अधिक तपास दिंडोरी पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण आव्हाड ,एस पी जाधव, माळेकर, दिलीप पगार आदी दिंडोरी पोलीस करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!