Type to search

नाशिक

जखमी झालेल्या बिबट्याला उपचारामुळे मिळाली नवसंजीवनी

Share

इगतपुरी । प्रतिनिधी
घोटी सिन्नर महामार्गावर असणाऱ्या धामणगाव भागात अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा प्राण वन खात्याच्या अधिकाऱ्यांमुळे वाचला आहे. काल दि. १४ ला रात्री साडे दहाच्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने रस्त्यावर संचार करणाऱ्या बिबट्याला अपघातग्रस्त केल्याने बिबट्या गंभीर अवस्थेत महामार्गावर पडला. याबाबतची माहिती मिळताच वन परिमंडळ अधिकारी जी. आर. जाधव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बिबट्याचा जीव वाचवला. या वेळेत अत्यावश्यक उपचार मिळाल्याने बिबट्याचा जीव वाचला असल्याचे टाकेदच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री तळपाडे यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की घोटी सिन्नर महामार्गावर धामणगाव जवळ रात्रीच्या वेळी मुक्तसंचार करणारा बिबट्या फिरत होता. काल रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक अज्ञात वाहनाची धडक बिबट्याला बसली. यामध्ये तो मोठ्या प्रमाणात रक्तबंबाळ झाला. महामार्गावर तो निपचित पडून अखेरचा श्वास घेत होता. या घटनेबाबत ह्या भागाचे वन परिमंडळ अधिकारी जी. आर. जाधव यांनी माहिती समजली. त्यांनी तातडीने वन परिक्षेत्र अधिकारी आर. पी. ढोमसे यांचे मार्गदर्शन घेतले. वनरक्षक रेश्मा पाठक, संतोष बोडके, बबलू दिवे, भोराबाई खाडे, फैजअली सय्यद, दशरथ निरगुडे, श्रावण निरगुडे, रामदास बगड, मुरलीधर निरगुडे यांच्या मदतीने बिबट्याला स्वतःच्या वाहनात टाकले.

पिंजऱ्याची वाट न पाहता तातडीने अत्यावश्यक उपचार करण्यासाठी टाकेद बुद्रुक येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात सुरू केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री तळपाडे आणि वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी योग्य वेळेत उपचार सुरू केले. पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू असलेल्या उपचारांमुळे अखेरचा श्वास घेऊन मृत्यूघंटेला लागणाऱ्या बिबट्याचा प्राण वाचला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे बिबट्याचा जीव वाचला आहे. उशीर झाला असता तर बिबट्या जागीच गतप्राण होण्याची अधिक शक्यता होती. सध्या अशोक स्तंभावरील पशु वैद्यकीय दवाखान्यात बिबट्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

धामणगाव भागातच यापूर्वी विहिरीत बिबट्या पडला होता. त्यातच मच्छरदाणीतील बालकांसोबतही बिबट्या जाऊन झोपल्याची घटना घडली होती. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांनी वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे.

बिबट्या अपघातात ठार झाल्याचे आधी समजले होते. मात्र घटनास्थळी गेल्यावर बिबट्या जिवंत असल्याचे जाणवल्याने तात्काळ उपचाराचा निर्णय घेतला.
– जी. आर. जाधव, वन परिमंडळ अधिकारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!