नाशिक । आता ‘नासा’ दूर नाही : पवन कदम ( तंत्रज्ञान )

0

शेतकरी कुटुंबातला मुलगा घरच्या चरितार्थासाठी शहरात येतो आणि नाशिक जिल्ह्यातल्या कमी खर्चात टायर केलेल्या सर्वात मोठ्या दुर्बिणीचा शोधक, तंत्रज्ञ होतो. मुलांना अवकाशदर्शनाची गोडी लावणाऱ्या संस्थेचा एक भाग होतो. नाशिकमधील पवन यांची हि ओळख !

‘चाँदसा मुखडा’ ही सौंदर्याबद्दलची कल्पना करता येणार नाही. कारण मी इतकी मोठी दुर्बिण तयार केली आहे की, त्यातून चंद्रच काय, इतर ग्रह-तार्‍यांचेही स्पष्ट दर्शन होईल. भविष्यात मुलांना आकाशदर्शनाची ओढ लागेल आणि त्यातून नाशिकचा एखादा खगोलशास्त्रज्ञही होईल. वेगळे संशोधन करेल. गावच्या मातीत शिकलेला गावठाण पलीकडचे विश्व फारसे माहिती नसलेला मी एवढे मोठे काम करू शकलो, याबद्दल समाधान वाटते.

मी शेतकरी कुटुंबातला. बालपण ओझरला मळ्यात गेले. वडिलांचे छत्र मी दोन वर्षांचा असतानाच हरपले. तीन भावंडांमध्ये सर्वांत लहान असल्यामुळे सुरुवातीचे चटके मला जाणवले नाही. भावांनी घरची शेती सांभाळायचे ठरवले; पण शेती बेभरवशाची असल्याने कुटुंबाला आणखी आधार मिळणे गरजेचे होते. म्हणून मी बाहेर पडायचे ठरवले. आयटीआयचा कोर्स केला. एचएएल कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करू लागलो. बारावी पूर्ण केल्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी मला एचएएलला नोकरीही मिळाली होती. इंजिनिअरिंग करत असताना आम्ही चार जणांच्या गु्रपने मोठी दुर्बिण तयार करण्याचा प्रकल्प निवडला. यापूर्वी मी वैयक्तिक पातळीवर 7 इंचाची दुर्बिण तयार केली होती. पण हा टेलिस्कोप (दुर्बिण) आमच्यासाठी आव्हानच होते. चांदोरकर सरांनी त्याचे तंत्र सांगितले होते.

कमी खर्चात हा टेलिस्कोप कसा तयार करायचा, हा प्रश्न होता. विचार करून स्थानिक पातळीवरच त्यासाठीचे साहित्य शोधले. इंटरनेट आणि के. के. वाघ महाविद्यालयातील जयदीप शाह सर यांच्या मार्गदर्शनाने दुर्बिण निर्मितीची तयारी सुरू झाली. प्राथमिक माहिती गोळा केली. डायमीटर मोठे करण्यासाठी जास्त जाडीची काच आवश्यक होती. ती मिळत नव्हती. काचवाल्याकडे जाऊन त्याच्याकडून गोल काचा कापून घेतल्या. एकमेकांवर दोन काचा ठेवल्या. त्यात अ‍ॅल्युमिनिअम ऑक्साईड ठेवले तर त्या झिजतात. खालची काच बहिर्वक्र होते. वरून हाताने फिरवल्यावर तिला अंतर्वक्र आकार येतो. सरफेस अंतर्वक्र करणे हे आव्हान होते. कारण त्यावर दुर्बिणीची अचूकता अवलंबून असते. थोडी चूक झाली तरी परत पहिल्यापासून काम करावे लागते. अ‍ॅल्युमिनिअम रिफ्लेक्टिव्ह कोटिंग परावर्तन वाढवण्यासाठी केले जाते.

अंतर्वक्र आरसा तयार झाल्यावर कोटिंग पुण्याहून करून घेतले तर छोटे भिंग मुंबईहून आणले. हा संपूर्ण प्रकल्प उभा करायला सहा महिने लागले. अवघ्या वीस हजार रुपयांत आम्ही बाजारात दीड ते दोन लाख रुपयांना मिळणारी दुर्बिण तयार केली. या ताकदीची दुर्बिण ऑर्डर देऊन मागवावी लागते. 11 इंच डायमीटर असलेल्या या दुर्बिणीतून शनिची कडी, चंद्रावरचे खड्डेही दिसू शकतात. कर्मवीर एक्स्पोमध्ये आम्ही तयार केलेली दुर्बिण ठेवली होती. तिला राष्ट्रीय पातळवरील दुसर्‍या क्रमांकाचे रोख 50 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. आपल्याकडे ज्ञान आहे, ते मुलांना शिकवावे, त्यांच्यामध्ये खगोलशास्त्राविषयी गोडी निर्माण करावी, असे वाटले. मग आम्ही अवकाश निरीक्षण, दुर्बिण तयार करण्याचे प्रशिक्षण, दुर्बिणीची ओळख, ग्रहतार्‍यांचे विश्व याबद्दल नाशिक जिल्ह्यातल्या शाळा व अनाथाश्रमांमध्ये जाऊन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व व्याख्याने द्यायला सुरुवात केली. सामान्यांना परवडेल आणि घरच्या घरी कुणीही तयार करून शकेल, अशा दुर्बिणीचे तंत्र समजावून सांगितले. भारतात कल्पना चावलाच्या तोडीचे आणखी विद्यार्थी निर्माण व्हावेत, त्यांनी नासापर्यंत झेप घ्यावी, हा उद्देश आहे.

5 ते 12 ऑक्टोबर हा ‘जागतिक अंतराळ दिन’ असतो, त्याचे औचित्य राखून खगोलतज्ञ जयदीप सरांनी ‘कल्पना युथ फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. यानिमित्ताने आम्ही दरवर्षी नाशिकमध्ये अवकाशविषयक पोस्टर स्पर्धा, निबंध, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आयोजित करतो. त्यासाठी 2007 सालापासून नाशिक महानगरपालिका यशवंतराव चव्हाण तारांगण वापरण्यासाठी देते. अवकाश संशोधक अपूर्वा जाखडी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळते. हौशी आकाश निरीक्षक, पालक, शिक्षक, विद्यार्थी, शाळा, आश्रमशाळा यात भाग घेतात. आनंद याचा वाटतो की, इथे आकाश निरीक्षणाची गोडी लागलेले अनेकजण पुढील शिक्षणासाठी चेन्नईमध्ये गेले आहेत.

आमच्या स्वयंसेवी संस्थेमध्ये आम्ही सातजण काम करतो आणि 200 सभासद आहेत. याव्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही काम करतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे व्याख्यान झाले होते, ते ऐकल्यावर विचार पटले आणि मी अंनिसचा कधी भाग झालो ते कळलेच नाही.

हे करत असतानाच एचएएलमध्येही गुणवत्तावाढीसाठी काम करतो. सल्ले देतो. भविष्यात नाशिकची ओळख ठरेल अशी मोठी दुर्बिण तयार करायची आहे. या सर्व कार्यासाठी माझी ‘पंतप्रधान श्रमपुरस्कारा’साठी निवड झाली आहे, ही मला आनंदाची बाब वाटते.

( शब्दांकनः शिल्पा दातार-जोशी )

LEAVE A REPLY

*