नाशिक | तरुणाईसाठी नवाविष्कार : अविष्कार भुसे (राजकारण)

1

युवा सेनेचे काम करताना पक्ष अथवा राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. या वाटेवर चालताना युवा पिढीच्या क्षेमासाठी झटणे, हा केंद्रबिंदू मानलाच, शिवाय वडीलांनी जपलेला सामाजिक ठेवा नेहमी समोर असतो. सत्ता अथवा पदे तत्कालीक भाग असले तरी समाजाप्रती असलेला बांधिलकीचा ठेवा अव्याहत जपण्याचा मनोमन प्रयत्न केला जाईल.

माझे वडील दादाजी भुसे यांच्या राजकारणाचा पाया खरे तर समाजकारणावर उभा राहिला. ‘जाणता राजा’ मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याची केलेली पेरणी आज त्यांच्या मंत्रीपदाला आलेले फळ मानता येईल. अर्थात तीन वेळा आमदारकी आणि राज्यमंत्रीपदाचा मुकुट असा देदिप्यमान प्रवास असला तरी भुसे साहेबांची जनमाणसासोबत असलेली बांधिलकी आजही कायम आहे. मला आठवते तो काळ 2004 च्या विधानसभा निवडणूकीचा होता. तेव्हा मी चक्क ‘हाफ पॅन्ट’वर वावरायचो. तेव्हा जे काही अनुभवले ते खरेतर माझ्यासाठी बाळकडू होते.

त्यानंतर 2009 च्या निवडणूकीत मी महाविद्यालयात होतो. तोपर्यंत मोठा मित्रपरिवार मीदेखील जोडला होता. पुढे अभियांत्रिकी पदविका घेतल्यानंतर कौटुंबिक व्यवसायात पदार्पण केले. आमचा मूळ बांधकामाचा व्यवसाय. पण जनसंपर्क अटळ राहिला. कधी वडीलांसोबत तर कधी स्वतंत्रपणे केलेल्या दौर्‍यात लोकांचे प्रेम अनुभवले. समाजकारण प्रधानस्थानी ठेऊन राजकारणाला दुय्यमस्थान देण्याची शिवसेनेची परंपरा ध्यानी ठेऊन माझा प्रवास सुरू झाला. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी बडा नेता या नात्याने प्रथम भेटले. तद्नंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत भेट व चर्चा झाली. त्यांच्या झपाटल्यागत कार्याने प्रभावित झालो.

पुढे आदित्य साहेबांच्या सूचनेवरून युवा सेनेत कार्यरत होण्याचा मी निर्णय घेतला. त्यांनी युवा सेना विस्तारक हे पद देऊन माझ्यावर धुळे व नंदुरबार लोकसभा क्षेत्रांत युवा सेनेच्या बांधणीचे काम सोपवले. त्यादृष्टीने गेल्या सहा महिन्यांपासून ते कार्य सुरू आहे. विद्यार्थी व युवा वर्ग केंद्रीभूत मानून त्यांच्यासाठी रचनात्मक कार्य करण्याकडे माझा भर राहिला आहे. राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणार्‍या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी चाचणी परीक्षांचे आयोजन, विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन, मार्गदर्शन शिबिरे, गुणगौरव समारंभ, दहीहंडी उपक्रम अशा उपक्रमांची मालिका राबवून आम्ही तरूणाईला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

मालेगावची मोसम नदी खरेतर शहराचे वैभव. तथापि, पाण्याअभावी तिची दयनीय अवस्था झालीच, शिवाय वेगवेगळ्या प्रकारची घाण तिच्या पात्रात टाकण्यात येत असल्याने परिसरात कमालीची दुर्गंधी पसरते. आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून स्वच्छता मोहिम राबवली. स्वत: भुसे साहेबही त्यामध्ये सहभागी झाले. नदीपात्राचा अवघा नक्षाच बदलला. संपूर्ण नदीपात्र साफ केले. मालेगावकरांनी आमच्या उपक्रमाचे कौतुक केले. आज नदीकाठाला चौपाटीचे स्वरूप प्राप्त झाले आहे, याचे आम्हाला पुरेपूर समाधान आहे. मालेगाव शहराची ओळख प्रारंभीपासूनच संवेदनशील अशी राहिली आहे.

विशेषत: रात्रीच्या वेळी पोलीसांना अधिक दक्षता घ्यावी लागते. त्यासाठीच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र बनून त्यांच्यासोबत रात्रीची गस्त घालण्यासाठी हातात हात घालून कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे. युवा सेनेचे काम करत असताना पक्ष अथवा राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मार्गदर्शनासोबतच तरूणाईमधील वाढती व्यसनाधीनता, बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणार्‍या व्याधी, रिकाम्या हातांकडून होणारी गुन्हेगारी कृत्ये, त्यामुळे आलेले वैफल्य या बाबी समाजासाठी चिंतनीय आहेत. त्यादृष्टीने काय करता येऊ शकते, यावर विचार सुरू आहे.

आमच्या वाटचालीला राजकीय किनार असली तरी समाज व्यापक अर्थाने केंद्रस्थानी आहे. वडीलांच्या शिकवणीनुसार राजकारणात केवळ फायदे न पाहता समाजासाठी अहर्निश झटणेच शिवसेनेच्या संस्कृतीचे लक्षण आहे. तसे केल्यास निवडणूकांतील यश आपोआप मिळते. शिवाय, सहेतूक समाजकारण तकलादू असते, या तत्वज्ञानावर आमचा गाढा विश्वास आहे. माझे वडील मंत्रीपदावर असूनही लोकांना ते आपला माणूस वाटतात. यामध्येच त्यांच्या चढ्या राजकीय आलेखाचे मर्म आहे. त्यांच्या प्रेरणेनेच माझे वैचारिक मनोबल प्रबल झाले.

आज हजारो युवकांची मला साथ आहे. अर्थात, त्यामुळे डोक्यात हवा न जाऊ देता युवाशक्तीच्या उर्जेचा वापर सकारात्मक कार्यासाठी करण्याचा आमचा निर्धार आहे. आगामी काळात मालेगावसह शक्य तिथे आरोग्य, पाणी, विद्यार्थीभिमुख उपक्रम आदी मुद्द्यांवर भर देऊन तरूणाईला दिशा देण्यासाठी कटिबध्द राहू. सत्ता अथवा पदे असणे तत्कालीक भाग असले तरी समाजाप्रती असलेला बांधिलकीचा ठेवा अव्याहत जपण्याचा मनोमन प्रयत्न केला जाईल, याबाबतची वचनबध्दता यानिमित्त अधोरेखित करतो.

(शब्दांकन : मिलिंद सजगुरे )

पुढील अंकात – देवांग जानी ( समाजकारण )

1 COMMENT

LEAVE A REPLY

*