नाशिक । माणूस घडवणारे शिक्षण : विजयालक्ष्मी मणेरीकर ( शिक्षण )

2

शिक्षणाचा उपयोग समाज, समूहासाठी किती होतोय, आपण समाजासाठी काय योगदान देतोय, याचाही विचार करावा. सर्वत्र हिंसाचार, असहिष्णूता बोकाळली असताना या काळात माणूस म्हणून घडवणारे मूल्याधारित शिक्षण महत्त्वाचे आहे. मानवता आणि प्रेम, बंधुभावाचे शिक्षण काळाची गरज आहे.

निफाडमध्ये के. के. वाघ विद्यानिकेतन शाळेत असताना ‘तू मोठी झाल्यावर काय होणार’ हा प्रश्न एकदा आमचे मुख्याध्यापक करंडे सरांनी जाहीरपणे वेळी विचारला होेता. तेव्हा मला शिक्षक व्हायचे आहे, असे मी अभिमानाने सांगितले. शिक्षणप्रवासात माझे वडील माझ्यासाठी मोठे प्रेरणास्थान आहे. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी अपार कष्ट घेऊन त्यांनी आम्हाला मोठे केले. पैशांसाठी काही कर, असे आम्हाला वडिलांनी कधीच सांगितले नाही. तू इतरांना शिकवशील तेव्हा स्वत: समृद्ध होशील, हा संस्कार वडिलांनी मला दिला. पैशांसाठीच काम, अध्यापन करावे, असे वडिलांना कधीच मान्य नव्हते. तोच संस्कार त्यांनी मला दिला. त्यामुळे मी आज शिक्षणात काम करत आहे.

शिक्षण क्षेत्रातही खूप चांगले कार्य करता येते, हे मला समज आल्यावर प्रकर्षाने जाणवू लागले. त्यामुळे पुढे अध्यायन करतानाही मी शिकणे आणि शिकवणे ही प्रक्रिया सुरू ठेवली. कधी संगीत तर कधी नवीन गोष्टी मी वर्गातील मैत्रिणींना शिकवत गेले. प्राध्यापक होऊन इंग्रजी विषयाचे अध्यापन करावे, अशी माझी इच्छा होती. दरम्यान, छत्रपती विद्यालयात मला प्रथम संगीत शिक्षकाची संधी चालून आली. ती मी स्वीकारली आणि त्याचवेळी के. के. वाघ इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्येही अध्यापनाची संधी मिळाली. तिथेही मी उपक्रमशीलता जोपासली. जे. कृष्णमूर्तींचे व्हिडीओ मी पाहिले.

शिक्षण क्षेत्रात रवींद्रनाथ टागोर आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहेे. या विभूतींचे विचार मला भावले. आपल्या शिक्षण क्षेत्रातील त्रुटी, उणीवांचा अभ्यास करून त्याच्यावर प्रभावी आणि परिणामकारक समाधान देता यावे, यासाठी परंपरागत शिक्षणासह नवे काहीतरी देऊन पिढ्या घडवल्या पाहिजे, ही जाणीव मला होत गेली. पारंपरिक शिक्षणाला जोड म्हणून उपक्रमशील आणि ‘प्रॅक्टिकल’ अनुभूतीतून शिक्षण देण्यासाठीच माझे वडील, करंडे सर, डॉ. व्ही. बालसुब्रम्ह्यण्यम आणि पती शशांक मणेरीकर यांच्या प्रेरणेतून 2011 ला नवीन नाशिकमधील अंबड येथे ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलची मुहूर्तमेढ रोवली आणि शिक्षणाचा यज्ञाला प्रारंभ झाला.

समाजासह जगण्याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. म्हणूनच मी शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यासह समाज शिक्षणात अंतर्भूत करून विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षणाचे मॉडेल तयार केले. नोटबंदीच्या काळात आम्ही मुलांना बँकामध्ये घेऊन गेलो. तिथे वयस्कांना फॉर्म भरून देण्यासह त्यांना इतर कशी मदत करता येईल, याचे शिक्षण दिलेे. त्यातून मुलांना नोटबंदी, बँकचे काम, नोटबंदीनंतरची परिस्थिती अनुवभली. कुंभमेळा म्हणजे नेमके काय, हे मुलांना कळावे, या उज्ज्वल परंपरेचे ज्ञान व्हावे म्हणून साधू, भाविकांच्या मुलाखती घेण्यास पाठवले. त्याचे सामाजिक, धार्मिक, पर्यावरणीय पैलुंचा अभ्यास करता यावा म्हणून कुंभमेळ्यात पाठवले. तिथे जाऊन मुलांनी साधू, पोलीस यांच्यासह, भाविकांच्या मुलाखती घेत सुंदर माहितीपट तयार केला.

अशा उपक्रमांनी मुले जगासोबत ‘डिल’ करायचे शिकतात. यासह आम्ही नाशिकच्या 30 वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, माध्यमकर्मी, वकील, पोलीस अधिकारी, आरजे, यासह इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांची वेळ घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन त्या त्या विभागाचे ऑफीस, हॉस्पिटल्स, रेडिओ स्टुडिओ, प्रेस येथे नेऊन तेथील प्रत्यक्ष कार्य दाखवले. भविष्यात आपल्याला काय व्हायचे आहे, याची किमान ओळख झाली आणि आपल्या कारकिर्दीची स्वप्ने त्यांच्यात रुजली. विविध परिस्थितीत मुलांचा इमोशनल कॉशंट विकसित करण्याचा आमचा प्रयत्न असतो. यासाठी आम्ही विविध उपक्रम घेतो. ‘व्हच्यूअर्र्ल थिकिंग’ची पेरणी आम्ही सदैव मुलांना देत आहोत. जी शाळा मुलांना आत्मविश्वास देऊ शकते, तो विद्यार्थी स्पर्धेच्या जगात मागे राहूच शकणार नाही. तेच आम्ही मुलांना देत आहोत.

रवींद्रनाथ टागोरांना अपेक्षित असलेले निसर्गाच्या सानिध्यातील शिक्षण आम्ही मुलांना देतो. निसर्ग हा चैतन्यशील आहे, ती चेतना मुलांमध्ये येतेच. म्हणून उद्योग, व्यवसाय, निसर्ग, उपक्रमशीलता, निसर्ग, पर्यावरण आणि माणूसपण हे सर्व पैलू आम्ही मुलांना पुस्तकी शिक्षणासह देत आहोत. मुलांची नवी पिढी शिक्षक घडवू शकतो म्हणतो. अशा प्रशिक्षित शिक्षकांमुळे शिक्षणात परिवर्तन घडू शकते. त्यासाठी त्यांनाच प्रशिक्षक देण्यासाठी मी पुढाकार घेतला आणि त्यादृष्टीने एक ‘टीचर्स ट्रेनिक प्रोग्राम’ची आखणी शिक्षणतज्ञ, जाणकरांच्या मदतीने केली असून या ट्रेनिंगचा श्रीगणेशा आम्ही नुकताच केला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम नजीकच्या भविष्यात आपण पाहू शकाल.

मी खो-खो, धावपटू अशा खेळात क्रीडापटू आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे मी खूप शांत, स्थिर आणि खेळकर वृत्तीची आहे. ट्रेकिंग खूप आवडते. एनसीसीची छात्रा असताना दिल्लीत राजपथावर मी संचलनही केले आहे. क्रियाशील राहणे माझा स्थायीभाव आहे. आध्यात्मिकता मला आवडते. मी ओंकारसाधना करते. आध्यात्म जातीधर्माच्या पुढे नेऊन माणूस म्हणून जगायला शिकवते.

तरुणाईने विशिष्ट क्षेत्रात चमकण्यासाठी प्रचंड मेहनतीने वाचन, अभ्यास आणि अनुभूती घ्यावी. जनसमूहात मिसळून ज्ञान अर्जित करत स्वत:ची ‘वर्थ व्हॅल्यू’ निर्माण करावी. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाज, समूहासाठी किती होतोय, आपण समाजासाठी काय योगदान देतोय, याचाही विचार करावा. शांतीची सर्वत्र पुरस्कार होत असताना बोकाळत जाणारा कट्टरतावाद, टोकाची हिंसा अशा काळात माणूस म्हणून घडवणारे मानवता आणि प्रेम, बंधुभावाचे शिक्षण काळाची गरज झाली आहे.

(शब्दांकन : नील कुलकर्णी )

पुढील अंकात- स्वाती थोरात

2 प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

*