नाशिक । सई नांदुरकर : बॅडमिंटन हीच ‘पॅशन’ (बॅडमिंटनपटू )

1

आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्यासाठी त्याच दर्जाच्या अत्याधुनिक क्रीडा अकॅडमी व्हाव्यात. बॅडमिंटनसाठी आपल्याकडे स्वतंत्र अकॅडमी नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांची वानवा आहे. एखाद्या खेळामुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर जगाच्या शहर,राष्ट्र नकाशावर अधोरेखित होते. उदयोन्मुख खेळाडूंना सहकार्याचा हात मिळावा. खेळाला पुढे नेण्यासाठी व्यक्ती, संस्था, कॉर्पोेरेट कंपन्यांनी ‘स्पॉन्सरशीप’ द्यावी.

वजन कमी करण्यासाठी वयाच्या सातव्या वर्षी खेळाकडे वळाले. त्यावेळी मी अत्यंत खोडकर, चंचल ‘हायपर अ‍ॅक्टिव्ह’ होते. कधी मस्ती, तर वर्ग मैत्रिणींना मारणे असे सुरू असायचे. अवखळ मुलीतील उत्स्फूर्त ऊर्जा, ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ला योग्य वाट द्यायची, तर खेळाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे माझ्या डॉक्टर आईने ओळखले. ही ऊर्जा-ऊर्मी सावकाश खेळाकडे वळली. प्रारंभी जलतरण, जिम्नॅस्टिक असे खेळ केवळ वजन कमी करण्यासाठी खेळत होते. मात्र, त्यामध्येही पळणे, भरपूूर कसरती यामुळे मला फारसा रस आला नाही. तुलनेने बॅडमिंटन अधिकच भावले. साहजिकच इतर खेळ मागे पडले आणि माझी प्रगती याच खेळात होत गेली. आई-बाबांचा उद्देश साध्य झाला आणि माझेही वजन कमी होत असताना बॅडमिंटन खेळातील गंमत वाढतच गेली.

तिसरी असताना पहिल्यांदा आंतरशालेय स्पर्धेत भाग घेतला. त्यावेळी पदक मिळाले नाही. मात्र, जसजसे यामध्ये सराव वाढला त्यानंतर या खेळाकडे अधिक अभ्यासपूर्णपणे, गांभीर्याने पाहू लागले. नंतर आंतरशालेय, जिल्हा आणि राज्यपातळीवरील क्रीडा स्पर्धेत भाग घेऊ लागले. बॅडमिंंटनसाठी सरावासह ‘फिटनेस’ व्यायाम, धावणे, कसरती कराव्या लागत. पहाटे पाचला उठून ‘फिटनेस’वर लक्ष केंद्रित करू लागले. तिसरीत असताना दहा वर्षाखालील जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले. माझ्यापेक्षा मोठ्या वयोगटातील स्पर्धक खेळाडूला पराभूत करून सुवर्णपद मिळवल्याने छोटेपणीचा तो आनंद मला अधिक मोठा वाटला. पुढे 13 वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्यांदा सुवर्णपदक मिळवले होते. त्यावेळी मी विजयाचा जल्लोष साजरा केला. वृत्रपत्रांनी दखल घेत मुलाखत, बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यावेळी खर्‍या अर्थाने जेता खेळाडू झाल्याच्या आनंदाने सुखावले.

रत्नागिरी येथे 13 वर्षांखालील गटात खेळत असताना मला जेतेपद मिळाले होते, त्यावेळी माझी आई सोबत होती. पदक घेण्यासाठी जाताना आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू मला आजही आठवतात. माझ्या विजयानंतरचा आई-बाबांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांच्ंयाकडे पाहून मलाही धन्यता वाटली. आई-वडिलांना माझ्यामुळे असा आनंद देऊ शकते याचे समाधान वाटते.

माझे प्रशिक्षक-गुरू मकरंद देव यांचे या खेळातील ‘स्ट्रोक्स’ खूप चांगले आहेत. त्याच्यातील हेच नैपुण्य त्यांंनी माझ्यातही ओतले त्यामुळे मी खेळताना या वैविध्यामुळे अनेकदा जेतेपद मिळवले आहे. त्यांची मी आवडती शिष्य आहे, याचा अभिमान आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पात्र होण्यासाठी मी सराव आणि फिटनेसवर भर देत अधिक भर देत गेले. शाळा आणि खेळ यांचे संतुलन साधत, मी राष्ट्रीय पातळीवर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मेहनत घेत होते, प्रथम 9 वर्षांची असताना 13 वर्षांखालील वयोगटासाठी मी राष्ट्रीय पातळीवर खेळले. राष्ट्रीय पातळीवर खेळताना क्लॉलिफाय झालेले बॅडमिंटनपटूच ‘मेनड्र्रॉ’मध्ये खेळू शकतात. मेनड्रॉमध्ये अवघे 64 खेळाडू पात्र होतात.

बंगळुरूला असताना, क्लालिफायमधून मी मेनड्रॉमध्ये धडक मारली आणि तिथे थर्ड राऊंडपर्यंत बाजी मारली. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील स्पर्धेमध्ये प्रत्येकी याप्रमाणे 6 सुवर्ण, तीन रजत पदक आणि काही कांस्य असे 15 हून अधिक पदके आजवर मला मिळाली आहेत. बॅडमिंटन खेळात माझे ‘रॅकिंग’ पहिल्या वीस उत्कृष्ट खेळाडूंमध्ये होते. दरम्यान, दहावीनंतर बॅडमिंटनचा सराव मागे पडला होता. अकरावीत विज्ञान शाखा घेतल्याने कॉलेज करून मला सराव करणे, जरा अवघड झाले. मग काही काळ विश्रांती घेतली. मात्र, या खेळाशिवाय मला सारे ‘सुनेसुने’ वाटते. त्यामुळे छोट्याशा ‘ब्रेक’नंतर आता पुन्हा खेळाकडे वळाले आहे. सराव जोमाने सुरू आहे.

सायना नेहवलसारखे देशासाठी देशाचे नाव जगात उंच करायचे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल सुरू आहे. दरम्यान, अर्पणा पोपट यांच्या प्रशिक्षक अनिल प्रधान, प्रकाश पदुकोन अकॅडमी, पुण्याचे निखिल कानिटकर, नागपूरचे अजय दयाळ अशा राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांकडेही प्रशिक्षणही घेतले. सध्या इंडोनेशिया येथील प्रशिक्षक उसान डी यांच्या मार्गदर्शनात बॅडमिंटनचे धडे गिरवत आहे. मला विश्वास आहे, या खेळातून देशाचे नाव नक्कीच मोठे करेल. दरम्यान विज्ञान शाखेतील शिक्षणही सुरू आहे. आई डॉक्टर तर वडील इंजिनिअर असल्याने त्यांचे मोलाचे मागर्र्दर्शन मिळत आहे. सर्व क्षेत्र करिअरसाठी खुले असले तरी बॅडमिंटन कधीही सोडायचे नाही, हा निर्धार पक्का आहे.

खेळामुळे मला शिक्षणातही खूप मदत झाली आहे. अभ्यासात एकाग्रता, निरोगी शरीर, खिलाडूवृत्ती विकसित झाली आहे. क्रीडा प्रवासात आई-वडील आणि माझे क्रीडा प्रशिक्षक मकरंद सरांचे योगदान मोठे आहे.
नाशिकचे खेळाडू देश-विदेशात उत्तम कामगिरी करताना बॅडमिंटनबद्दल बोलायचे; तर आपले बॅडमिंटनपटू फिटनेसमध्ये कमी पडतात असे मला जाणवले. त्यावर मात केली, तर नाशिककर क्रीडापटू कुठल्याही बाबतीत मागे नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवायचे; तर त्याच धर्तीवरील अत्याधुनिक क्रीडा अकॅडमी नाशिकमध्ये तयार व्हाव्यात, आजही बॅडमिंटनसाठी स्वतंंत्र अकॅडमी नाही. यासह आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांचा वानवा जाणवते.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवण्यासाठी म्हणाव्या, त्या मूलभूत सोयी सुविधाची गरज पदोपदी जाणवते. उदयोन्मुख खेळाडूंना पुढे आणण्यासाठी व्यक्ती, संस्था, कॉर्पोेरेट कंपन्यांनी ‘स्पॉन्सरशीप’ दिली, तर खेळाडूंसाठी यश, आकांक्षांचे गगन ठेंगणेच.

( शब्दांकन : नील कुलकर्णी )

पुढील अंकात – स्नेहल विधाते -जाधव ( फेन्सिंग )

1 COMMENT

LEAVE A REPLY

*