नाशिक । जलतरणाने जगण्याला नव ‘संजीवनी’ : प्रसाद खैरनार ( जलतरणपटू )

0

आजारावरील उपचार म्हणून सुरू झालेल्या जलतरणाने मला नवा जन्म दिला. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण 210 पदके मिळवली. पाणी, पोहणे, सूर मारणे, जिद्दीने सर्वोत्तम कामगिरीचा ध्यास घेणे ही जीवनपद्धती झाली आहे. पोहण्याने मला आजारमुक्त केले नाही तर स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ आणि जगण्याची संजीवनी दिली. जिद्दीमुळे मला जेतेपणाची प्रेरणा मिळाली. ज्या पोहण्याने मला नवसंजीवनी दिली. त्यातच आता करिअर करणार आहे.

लाखातून एखाद्यालाच होणारा जीबीएस (ग्युलियन बॅरी सिंड्रम) नावाचा आजार साडेचार वर्षांचा असताना झाला. या आजाराने शरीर खालून वर टप्प्याटप्प्याने ‘पॅरलाईज्ड’ होत जाते. त्यासाठी नियमित व्यायाम, फिजिओथेरपी आणि प्रोटिन पावडरनेच आजारावर मात शक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. आजार बरा करण्यासाठी म्हणून जलतरण या क्रीडा प्रकार सुुरू केला आणि त्यानेच मला आजाराचे औषध आणि जगण्यासाठी श्वासही दिला.

बालपणी ‘जीबीएस’ आजारावर पराकोटीचे प्रयत्न सुरू झाले. वडिलांनी त्यासाठी ‘फिजियोथेरपी’चे सेंटरच घरात उभे केले. तीन वेळा व्यायाम, फिजियोथेरपी असे माझे रुटीन असे. न्यू ईरा स्कूलमध्ये शिकत असताना पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. आमंत्रितीसाठी पोहण्याच्या स्पर्धेत पहिल्यांदा खेळलो.

पुढे नाशिकमध्येच 2003 मध्ये पहिल्यांदा रौप्य पदक मिळवले. नंतर जिल्हा, राज्यस्तरावर यशस्वी होत मी सहावीत असताना पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवरील पोहण्याच्या स्पर्धेमध्ये उतरलो. त्यानंतर पदकांची कमाई करत गेलो. ‘नेव्ही’तर्फे घेण्यात आलेल्या ऑल इंडिया सी स्वीमिंग स्पर्धेत मी खाडी पोहून जाण्याच्या स्पर्धेतही मी रौप्य पदक मिळवले. त्यावेळची आठवण गंमतशीर आहे. पोहताना माझा गॉगल पाण्यात पडला वेळ कमी होती. स्पर्धेत जिंकण्याचे लक्ष अशा आपत्तीत जुनेद खान यांने स्वत:चा गॉगल काढून देत मला जिंकण्याची उमेद दिली. त्या प्रसंगाने ‘मला स्पोर्टमन स्पिरीट’चे मूर्तीमंत रुप दिसले.

शाळेत आणि महाविद्यालयीन जीवनात मी अभ्यास करून माझा खेळ सांभाळला. शैक्षणिक प्रगतीत कधीही माझा खेळ येऊ दिला नाही. त्यामुळे अभ्यास आणि खेळ या दोन्ही पातळ्यावर चमकण्याची जिद्द तरुणाईने ठेवावी. खेळामुळे अभ्यासात मागे पडलो किंवा अभ्यासामुळे खेळ सोडला अशी स्थिती येऊ देऊ नका, असा संदेश मी तरुणांना देईल.
राजेंद्र निंबाळते सरांनी मला पोहण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांचे आणि माझे वडील राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अविनाश खैरनार यांचे माझ्या आयुष्यातील योगदान शब्दात मांडण्याइतके माझे शब्द प्रगल्भ नाहीत. त्यांच्यामुळे मी एका असाध्य आजाराशी यशस्वी लढा देऊन आज इथवरची यशस्वी वाटचाल करू शकलो.

आज मी पूर्ण बरा झालो आहे. मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला असा काही आजार होता, हे पूर्णपणे विसरलो आहे. पहिल्यांदा स्वीमिंग या खेळात माझी राष्ट्रीय पातळीवर क्रीडापटू म्हणून निवड झाल्याचे कळाले त्या दिवशी वडिलांच्या डोळ्यात आकाशात मावणार नाही, असा आनंद मी पाहिला. त्यावेळी त्यांनी मला प्रेमाने मारलेली मिठी मला आजही जशीच्या तशी आठवते. एक वडील मुलांच्या आनंदासाठी काय करू शकतात, याचे मूर्तीमंत उदाहरण माझ्या वडिलांनी जगासमोर ठेवले. माझ्या प्रत्येक स्पर्धेत ते माझ्यासोबत राहिले आहेत. आपण कुठल्याही गोष्टींचे भांडवल न करता जिद्दीने उभे राहू शकतो, व्यायामातून सर्व काही क्रीडाप्रकार साध्य आहेत, हा संदेश देण्यासाठी वडिलांनी माझ्या क्रीडा प्रवासाच्या यशस्वी वाटचालीवर ‘जिद्द’ हे मराठी आणि ‘ग्रीट’ हे इंग्रजी पुस्तकही लिहिले आहे.

बालपणापासून आजवर केवळ आजारावरील उपचार म्हणून सुरू झालेले माझे पोहण्याने मला नवी ओळख दिली. आजवर मी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण 210 पदके मिळवली आहेत. त्यात 110 सुवर्ण, 60 रजत आणि 40 ब्राँझ पदके आहेत. याशिवाय अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कारही माझ्या नावावर आहेत. पाणी, पोहणे, सूर मारणे, जिद्दीने सर्वोत्तम कामगिरीचा ध्यास घेणे ही माझी जीवनपद्धती झाली आहे. खेळाने मला काय दिले असे विचाराल तर या खेळाने मला काही नाही दिले असाच प्रश्न मी विचारेल. पोहण्याने मला आजारतून मुक्त केले. स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले. जगण्याची संजीवनी दिली आणि जिद्दीने जेतेपणाचे बळ पेरले. खेळालाच पूर्ण करिअर करण्याचे मी ठरवले आहे. सध्याला मी गुजरात येथे बीपीएड करत असून पुढे मला एमपीएड आणि एनआयएस (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्पोर्टस्) येथून शिक्षण घेऊन ‘स्वीमिंग कोच’ किंवा किंवा नेट-सेट करून खेळाचा प्राध्यापक होण्याचा विचार आहे.

नाशिकची क्रीडा संस्कृती चांगलीच बहरली आहे. खेळातच पूर्ण करिअर होऊ शकते, हे अनेक नाशिककर खेळाडूंनी सिद्ध केले आहे. तरुणाईने आपल्याला आवडणार्‍या क्षेत्रात करिअर करावे. परंतु, किमान अर्धा ते एक तास तरी व्यायामासाठी काढला पाहिजे, असे मला वाटते. काही ‘टिपिकल’ खेळातच नव्हे तर इतरही अनेक खेळात पूर्ण वेळ करिअर होऊ शकते, हे अनेकांनी आज सिद्ध केले आहे. क्रीडा साक्षरता वाढत असल्याची ही पावतीच आहे. ईश्वराने आपल्याला दिलेल्या शक्ती, ऊर्जाला विधायक वळण देऊन आजच्या पिढीने स्वत:च्या जीवनाला आकार द्यावा.

कुठल्याचा गोष्टीचे भांडवल न करता प्रतिकूल परिस्थिती काळावर आरुढ होेत, आव्हाने स्वीकारुन वार्‍याचे वेगाने यशाचा प्रवास करते तीच तरुणाई. उत्तमाचा ध्यास हवा. जगण्यासाठी ‘जिद्द’ हवी. मग असाध्य, जीवघेणा आजारावरही तुम्ही मात करू शकता, हेच मी आणि माझ्या वडिलांनी एकत्रितरित्या जगाला दाखवून दिले आहे. इच्छाशक्ती हवी. मार्ग आपोओपच खुले होेतात.. ‘व्हेअर इज वील देअर इज वे’ हेच सत्य.

(शब्दांकन : नील कुलकर्णी )

पुढील अंकात – सई नांदुरकर ( बॅडमिंटन )

LEAVE A REPLY

*