नाशिक । तंत्रज्ञानाशी मैत्री अनिवार्य : निखिल कुलकर्णी ( तंत्रज्ञान )

0

ग्रामीण भागात तंत्रज्ञानात्मक प्रगतीसाठी मुबलक प्रचार व प्रसार होणे आत्यंतिक गरजेचे आहे. आज आपण आयसीटी पर्वात आहोत. सर्व काही बोटांच्या हालचालीवर उपलब्ध होते. खरे तर आपण त्यामुळेच भाग्यवान आहोत. आज तंत्रज्ञानात्मक क्रांतीमुळे विश्वाला एका खेड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मी मूळ धुळ्याचा. लहानपणापासून संगणकाचे आकर्षण असल्याने पुढे घट्ट मैत्री बनली. या धाग्यातूनच संगणक विज्ञान अभ्यासक्रमात प्राविण्य मिळवण्याची खूणगाठ बांधली गेली. 2004 मध्ये प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. चार वर्षांत अभ्यासक्रम पूर्ततेसोबत बरेच ज्ञान आत्मसात केले. या काळात विद्यापीठ प्रणित प्रकल्प पूर्णत्वास नेला. अभ्यासक्रमाचा टप्पा पार केल्यानंतर स्वाभाविकच नोकरी शोधमोहीम सुरू झाली. सुदैवाने एचसीएल इन्फोसीसमुळे ही मोहीम थांबली. अर्थात ज्ञानाची भूक थांबता थांबेना. अनेक गोष्टी एक्स्प्लोअर करत गेलो.

 

पुढे नाशिकच्या सपट महाविद्यालयात तांत्रिक सहायक पदावर रूजू झालो. नंतर मातोश्री महाविद्यालयात व्याख्याता पद स्वीकारले. मित्राच्या कंपनीला हातभार म्हणून विक्री तथा व्यवस्थापक म्हणून सूत्र हाती घेतली. जून 2014 मध्ये संदीप फाऊंडेशनमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून दाखल झालो. शिक्षण क्षेत्रातील कॉर्पोरेट संस्कृतीचे दर्शन झाले. या दरम्यान केरळमील महाविद्यालयांना भेटी दिल्या. तिकडे शासकीय स्तरावर कौशल्य विकसन उपक्रम राबवले जातात. केंद्राच्या इनोव्हेटिव्ह आंत्रप्रिनरशीप डेव्हलपमेंट योजनेत प्राचार्य संजय गंधे यांच्यासोबत काम केले. आम्हाला 46 लाखांचा निधी प्राप्त झाला. या काळात संदीप फाऊंडेशनने सहा गावे दत्तक घेतली. त्यामध्ये महिरावणी, वासळी, बेळगाव ढगा, तळेगाव, अंजनेरी, जातेगाव आणि शिरसगाव यांचा त्यामध्ये समावेश आहे. या गावांमध्ये सर्वेक्षण, परिसर व कुटुंबियांची साद्यंत माहितीसह विविध उपक्रम राबवण्यावर भर देण्यात येतो. केंद्र व राज्य सरकारच्या लोकोपयोगी श्रेणीत एकूण 294 योजना आहेत. तथापि, त्याची किती माहिती लोकांपर्यंत पोहोचते, हा प्रश्न आहे. आम्ही या गावांत त्याबाबत लोकांना अवगत करतो.

या सहा गावांत आम्ही सहा थीम्सवर काम करतो. त्यामध्ये ऑरगॅनिक फार्मिंग, जलव्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, कारागीर, उद्योग व जीवनमान, मूलभूत सुविधा आणि विविध योजनांबाबत जनजागृती यांचा समावेश आहे. लोकांना ऑरगॅनिक फार्मिंगचे फायदे सांगण्यासोबतच जलव्यवस्थापन कसे करावे, सौर व पवन ऊर्जेचा वापर कसा करावा, तरुणांना कौशल्य विकसनाने कसे प्रशिक्षित करणे वगैरे उपक्रमांतून या सहाही गावांत सकारात्मक बदल झाल्याचे आमच्या निदर्शनास आले. युवा पिढीची तंत्रज्ञानाशी ओळख करून देण्याचा आमचा बव्हंशी प्रयत्न असतो.

आज सर्वत्र 120 पेक्षा अधिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस उपलब्ध आहेत. त्यापैकी काहींची तोंडओळख त्यांना होणे गरजेचे आहे. अर्थात, त्याशिवाय इतर गोष्टी कळण्यासाठी शैक्षणिक संस्था निर्णायक ठरतात, हे सांगणे नको. म्हणूनच निर्णयाभिमुख शिक्षणाची पायाभरणी होणे काळाची गरज असल्याचे मला वाटते. आज सुदैवाने शिक्षण क्षेत्रात वैविध्य आले आहे. विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही विलक्षण जागृती झाली आहे. त्यामध्ये समन्वय व वृद्धीचा संगम कसा साधला जाईल, यावर मंथन होणे गरजेचे आहे. विविध संस्था, व्यवसाय, उद्योग ही त्यासाठीची सशक्त माध्यमे आहेत. आजच्या विद्यार्थ्याने अथवा तरुणाईने अल्पावधीत समाधानी होणे योग्य नाही. आजचा चमत्कार उद्याचा इतिहास बनतो, हे प्रमेय विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही अभ्यासायला हवे. या प्रक्रियेत शैक्षणिक संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ग्रामीण भागात तंत्रज्ञानात्मक प्रगतीसाठी मुबलक प्रचार व प्रसार होणे आत्यंतिक गरजेचे आहे.

आज आपण आयसीटी पर्वात आहोत. सर्व काही बोटांच्या हालचालींवर उपलब्ध होते. खरे तर आपण त्यामुळेच भाग्यवान आहोत. आज तंत्रज्ञानात्मक क्रांतीमुळे विश्वाला एका खेड्याचे स्वरूप प्राप्त झाले असले तरी त्याच्याशी निगडीत अनेक गोष्टींबाबत आपण अनभिज्ञ आहोत. आज नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात स्टार्ट अपचे इन्क्युबेशन सेंटर केवळ संदीप फाऊंडेशनमध्ये अस्तित्वात आहे. अशा सेंटरच्या स्थापनेसाठी उद्योग मंत्रालयाची परवानगी लागते. संदीप फाऊंडेशनचे अध्वर्यू संदीप झा सर आणि प्राचार्य संजय गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा चमू या सेंटरच्या माध्यमातून तरुणांना तंत्रज्ञानात्मक बदलाचे साक्षीदार करण्याची प्रक्रिया राबवत आहोत.

तंत्रज्ञान ही विकासात्मक शिखर सर करण्याची शिडी आहे. तिच्यामुळे विद्यार्थी, समाज व देश यांच्या प्रगतीचे द्वार खुले होते, हे शाश्वत सत्य उद्याच्या पिढीसाठी मूलमंत्र राहणार असल्याचेही माझे मत आहे. उपलब्ध ज्ञान व तंत्रज्ञानाचा स्त्रोत प्रगतीचे व्यासपीठ मानून त्याचा अंगीकार करण्यात तरुणाईचे भले आहे. चुकीच्या गोष्टींसाठी त्याचा वापर एकूण करियरसाठी घातक ठरतो, हा संदेशही यानिमित्त द्यावासा वाटतो, एवढेच!

(शब्दांकन – मिलिंद सजगुरे )

LEAVE A REPLY

*