नाशिक । शिक्षणातील ‘डिजिटलगुरू’ : डॉ. महेश संघवी ( तंत्रज्ञान )

2

तंत्रज्ञानाच्या जोरावर चांदवड महाविद्यालयातील प्रशासकीय, कार्यालयीन कामे डिजिटल झाल्याने शैक्षणिक गतिमानता वाढीस लागली आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील युवकांना अनेक उपक्रमांमधून शिकवणे, तसेच त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करण्यासाठी अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड दिली आणि यातून अंधारमय भिंती प्रकाशित होत आहेत. तंत्रज्ञानाची गुढी उभारून समाजपयोगी शिक्षित पिढी घडवण्याचे काम करतो आहे.

ळगाव जिल्ह्यातील पाचोरा हे माझे गाव. गोविंदराव सेसरीया हायस्कूल येथे माझे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. शिक्षणाची गोडी असल्यामुळे मी बाहेर पडलो. प्रथम खूप अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर चांदवडच्या एसएनजेबी महाविद्यालयात पॉलिटेक्निक डिप्लोमाला प्रवेश घेतला. आवड असल्याने संगणक अभियांत्रिकी या विषयात पदवी ग्रहण केली. याच दरम्यान महाविद्यालयीन कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून माझी निवड झाली. प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर आजोबांच्या निधनामुळे अवघ्या 3 दिवसांत परतावेे लागले.


घरची परिस्थिती तशी बेताचीच. घरी किराणा दुकान होते आणि त्यामुळे व्यवसाय करताना किती मेहनत घ्यावी लागते, याची मला कल्पना होती. त्यामुळे आता काय करायचे, असा यक्षप्रश्न माझ्यापुढे आ वासून उभा होता. मात्र जिद्द सोडली नाही. अध्ययनाच्या आवडीबरोबर मला अध्यापनाची गोडी लागली आणि मित्रांच्या सांगण्यावरून मी अध्यापन करण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी अभियांत्रिकी शिकलो, त्याच ठिकाणी मला अध्यापनाची संधी चालून आली. मग कुटुंबासहित मी चांदवडला स्थायिक झालो.

अध्यापनाची आवड असल्यामुळे मी चांगल्या पद्धतीने अध्यापन करत गेलो. 2002 ते 2007 या दरम्यान अध्यापनाबरोबरच किराणा व्यवसाय तसेच चांदवडमधील मोबाईल व संगणक दुरुस्तीचे दुकान चालू केले. यासाठी माझे मेहुणे यांच्याकडे मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण एक महिनाभर घेतले. नांदेड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर जोधपूर विद्यापीठातून पीएच.डी पूर्ण केली. महाविद्यालयांत जम बसल्यानंतर संगणक आणि आयटी विभागप्रमुख म्हणून काम बघू लागलो. या दरम्यान वेगवेगळ्या महाविद्यालयांत, कंपन्यांत जाऊन चर्चासत्र, कार्यशाळा या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने देण्याचे काम केले.

अनुभवामुळे पेठ, सुरगाणा, ननाशीसारख्या ग्रामीण भागात जाऊन तेथील युवकांना अभियांत्रिकीबद्दल माहिती, महत्त्व पटवून या क्षेत्रात येण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यामुळे येथील अनेक युवक अभियांत्रिकीला येऊन आता चांगल्या कंपनीत नोकरीलादेखील लागले. तसेच अनाथाश्रमात जाऊन विद्यार्थ्यांना संगणक शिकवणे, विविध सण साजरे करणे, मोबाईलऐवजी जुन्या खेळांचे महत्त्व पटवून देणे, अशा पद्धतीचे उपक्रम आम्ही त्याठिकाणी राबवले आहेत. नोटबंदीच्या काळात आम्ही ग्रामीण भागात खाते कसे उघडावे, आधारकार्ड बँकेशी संलग्न करणे, पैसे जमा करणे अथवा काढणे तसेच इतर बँकिंग संदर्भात माहिती देणे, सोशल मीडियाबाबत जनजागृती करणे, अशा प्रकारचे उपक्रम राबवले आहेत.

तसेच  या देशपातळीवरील आयटी कंपन्यांतर्गत अनेक उपक्रम राबवत आहोत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यशाळा, चर्चासत्र भरवून त्याद्वारे अनेक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमावर संशोधन करण्याचे काम चालू आहे.
आज तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून महाविद्यालय डिजिटल केले असून येथील प्रत्येक फाईल ही आपल्याला ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यामध्ये शिक्षकांच्या वेबसाईट्स आहेत. त्याद्वारे नोट्स, विद्यार्थ्यांची हजेरी, विषयासंदर्भात असलेले ब्लॉग्स, प्रात्यक्षिके या गोष्टी विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राप्त होतात. तसेच महाविद्यालयातील शिपाई ‘स्मार्ट शिपाई’ म्हणून ओळखले जातात. कोणतेही कागद हे लिखित नसून डिजिटल असल्याने फक्त व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पुरवण्याचे काम शिपाई करत असतो.

कालांतराने अध्यापन शैली विकसित झाल्याने लेखणीतून Recent trends in engineering and technology नावाचे पुस्तकही साकार झाले. तसेच इतर दोन पुस्तके प्रकाशित केली. स्वच्छ भारत अभियानाचा दृष्टिकोन समोर ठेऊन ‘स्मार्ट डस्टबिन’ नावाचे पेटंट तयार केले असून त्याचा वापर महाविद्यालयात करत आहोत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

अनेक महाविद्यालयांत पन्नासपेक्षा अधिक संशोधन पेपर सादर केले आहेत. बॅडमिंटन, क्रिकेट या खेळाबरोबरच संगीतही आवडते. त्यामुळे महाविद्यालयांतील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतो. लग्न झाल्यानंतर पत्नीही माझ्यासोबत अध्यापन करीत आहे. यापुढेही तंत्राधारित शिक्षणरुपी वसा असाच पुढे चालू ठेवणार असून येणार्‍या काळात नवनवीन उपक्रम राबवून ग्रामीण भागातील युवकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचा मानस आहे.

(शब्दांकन : गोकुळ पवार )

2 प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

*