नाशिक । ‘शिक्षण उद्योजकते’चा ध्यास : हर्षवर्धन देवधर ( स्टार्ट अप्स )

0

कमी वयात अनेक प्रकारची सर्जनशील कामे करणारी व्हर्सटाईल माणसे असतात. ऊर्जा , कल्पकता,बुद्धी यांचा सकारात्मक वापर करणाऱ्यांत हर्ष देवधर यांचे नाव घ्यावे लागेल. मीडिया स्ट्रॅटेजी तयार करतानाच शिक्षणसंस्थांना उपयुक्त असे अँप तयार करायचे ठरवले आणि गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून नाशिकमध्ये व्यवसाय करायचा ठरवला. ‘एज्युनेट आयटी सोल्युशन्स’आधुनिक यंत्रणेद्वारे नाशिक शिक्षणक्षेत्रात या अँपने मोठी झेप घेतलीय.

माझे शिक्षण ‘फ्रावशी’मध्ये झाले. आई आणि वडील शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. बहीण सीए असून, कुटुंब उच्चशिक्षित आहे. मी 2005 मध्ये कॉमर्स क्षेत्रातली पदवी घेतली. तिसर्‍या वर्षाला असतानाच एमबीएची तयारी सुरू केली आणि पुणे येथील इंदिरा स्कूल ऑफ बिझिनेस स्टडीज्साठी 2006 मध्ये प्रवेश घेतला. तिथेच कँपस् मुलाखतीमध्ये निवड होऊन मुंबई येथील जाहिरात आणि माध्यमाशी संबंधित चौपाटी ब्रँचसाठी निवड झाली. त्यानंतर 2009 मध्ये मॅडिसन मीडिया एजन्सीमध्ये काम केले. माध्यम नियोजन आणि धोरणे हे ठरवण्याची तिथे संधी मिळाली.

कॅडबरी, हॉल्ससारख्या जाहिरातींवर एक्सेल आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काम केले. कोणतीही जाहिरात तयार झाल्यावर क्लायंट एजन्सीकडे येतो, त्यावेळी त्याचे अ‍ॅनालिसिस करावे लागते. एखादी जाहिरात कोणत्या वाहिनीवर कधी टाकायची, याचे नियोजन द्यावे लागते. त्याचा अभ्यास करावा लागतो. कोणताही नवीन ब्रँड बाजारात आणताना कंपनी भरपूर पैसा खर्च करायला तयार असते. त्यामुळे मुलांसाठी तयार होणार्‍या वस्तूंच्या जाहिराती संध्याकाळी मालिकांच्या वेळेत दाखवल्या तर अधिक परिणामकारक ठरतात, तसेच पुरुषांसाठीच्या उत्पादनांच्या जाहिराती बातम्या, क्रिकेट यांच्यामध्ये दाखवल्या तर उपयोग होतो. अशी अनेक गणिते करावी लागतात.

प्रत्येक जाहिरातीचे कँपेन, वेळा ठरलेल्या असतात. अशावेळी चार आठवड्यांत चाळीस लाख लोक जाहिरात पाहतील, याची खात्रीही नियोजन करताना द्यावी लागायची. उदा. सचिन निवृत्त होतोय अशी बातमी आल्यावर त्यावेळी किती लोक जाहिरात बघतील, मालिकांच्या टीआरपीनुसार कोणती जाहिरात कधी दाखवायची, हे खूप ताणतणावाचे गणित असते. सोनी टीव्हीने ‘कौन बनेगा करोडपती’साठी अमिताभ बच्चन यांची निवड केली, तेव्हा जाहिरात तंत्राची आर्थिक समीकरणेच बदलली होती. तीन-साडेतीन वर्षे सकाळी साडेदहा ते रात्री अडीचपर्यंत माझे काम चालायचे. वाहिनी आणि मालिका, चित्रपट यानुसार सेकंदासेकंदाचे दर ठरतात. इथे भरपूर शिकायला मिळालं.

दुसरी संधी स्टार टीव्हीच्या इंग्रजी भाषेच्या 7 वाहिन्यांच्या टीममध्ये मिळाली. इथे माझा रोल एजन्सीवरून ग्राहक असा झाला होता. तिथे स्ट्रॅटेजी तयार करायचो. मी आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमासाठी प्लॅन तयार केला होता, तेव्हा डॅशबोर्ड वापरायचो. कमीत कमी मुद्यांत अधिक आशय मांडून झटपट निर्णय घेणे त्यामुळे शक्य होते. त्यावेळी पुण्यात एमबीए करण्यासाठी भारतभरातून विद्यार्थी येतात, त्यांच्या सोयीसाठीची एक कल्पना डोक्यात घोळत होती. ती प्रत्यक्षात आणायचे ठरवले. या मुलांना महाविद्यालये, मेस, लॉण्ड्री, होस्टेल किंवा घरे याबाबत माहिती मिळवण्याकरता खूप कष्ट घ्यावे लागतात, वेळ घालवावा लागतो, असे लक्षात आल्यावर घरबसल्या त्यांना ही सर्व माहिती मोबाईलवरून मिळेल, असे माहिती तंत्रज्ञानाधारित अ‍ॅप तयार करायचे ठरवले. मी आणि मित्राने त्याबाबत आराखडाही मांडला; पण ते काही कारणाने प्रत्यक्षात येऊ शकले नाही.

त्यानंतर श्रीलंकेतूनही ऑफर आली होती, पण तिथली माध्यमे अजून खूपच मागास असल्याने ती संधी नाकारली. नोकरी सुरूच होती; पण मुंबईला कंटाळलो होतो. दिवसांतून तीन तास प्रवासालाच जात असत. मुंबईत पाच वर्षांत चौदा घरे बदलली. त्यानंतर नाशिकला येऊन स्वतःचे काहीतरी सर्जनशील काम करण्याचा निर्णय वडिलांना सांगितला. त्यांनी ‘काहीतरी कर, मगच ये’ असा सल्ला दिल्यावर माझा प्रोजेक्ट पुन्हा काढला आणि नाशिक, पुणे, मुंबई येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मित्रांना भेटलो. सुरुवातीला उत्साह वाटला; पण एवढ्या मोठ्या पातळीवर एकदम झेप घेता येणार नाही, हे लक्षात आल्यावर मुंबईला जाऊन परत नोकरीला जाऊ लागलो. परत एका मोठ्या कंपनीच्या नोकरीची ऑफर आली, तेव्हा, मात्र गंभीरपणे स्वतंत्र व्यवसायाचा निर्णय घेतला. महिना दीड लाखांचे पॅकेज सोडून 2004 मध्ये नाशिकला परतलो.

पुण्यासाठी जो प्रकल्प राबवणार होतो, तो स्थानिक पातळीवरील शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवायचा ठरवला. कोठारी आणि अशोका या दोन वेगळ्या पातळीवरच्या शाळा निवडल्या. बस्तान बसायला 3 ते 8 महिने लागणार हे अपेक्षितच होते. त्यामुळे होमशेफ या नावाने सीकेपी फूडचा समांतर व्यवसाय करायचा ठरवला. मित्राची आई सीकेपी पद्धतीचा उत्तम स्वयंपाक करायची. एक दिवस आधी ऑनलाईन ऑर्डर घेऊन आम्ही पार्टी किंवा स्नेहसंमेलनासाठी जेवण द्यायचो. मित्र गौरवचा कारखाना व माझ्याकडे वेळ होता. भाजी, मासे आणायचो. महिन्याला पंचवीसेक ऑर्डर मिळायच्या. फूड इंडस्ट्रीमध्ये वैयक्तिक लक्ष द्यावे लागते, एखादे गणित जरी चुकले तरी परिणाम होतो. कालांतराने व्याप वाढल्यावर फक्त मूळ व्यवसायाकडेे लक्ष द्यायचे ठरवले. तोपर्यंत अशोकाच्या चार शाळा मिळाल्या होत्या. 2014-15 मध्ये एकूण 30 शाळा मिळाल्या. नाशिक, नंदुरबार, धुळे, अगदी झिंबाब्वेपर्यंत आम्ही पोहोचलो.

विस्तार वाढत गेला, 16 जणांची टीम तयार झाली. डायडॅक या युरोपस्थित संघटनेकडून तांत्रिक शिक्षणासाठी व्यासपीठ मिळाले. जगभरातल्या कंपन्या तिथे होत्या.स्टार्टअपसाठी इंदूरच्या कंपनीत प्रशिक्षण घेऊन तिथूनच भांडवल मिळते. अनेक कंपन्यांमधून आम्ही शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचलो. इस्रायलस्थित स्टार्टअपसाठीही निवड झाली होती. नाशिक क्लासेस, बालवाड्या, शाळा यांना आम्ही सेवा देतो. मी 280 शाळांना भेटलोय. आता परिसर विस्तारायचाय. मोबाईल अ‍ॅप तयार केले असून, पाल्याची हजेरी, उत्तरपत्रिका, गृहपाठ हे सर्व मोबाईलवरून समजते. ही यंत्रणा शाळांना तयार करून देतो.

अनेक शाळांमध्ये ही यंत्रणा रुजवण्यासाठी आमचा माणूसही सहकार्य करतोय. शाळेची बस-व्हॅन ट्रॅकिंग युनिटही आहे. मूल गाडीत कधी चढलेय, गाडी कुठे थांबते, शाळेत कितीला पोहोचते, याची इत्थंभूत माहिती घरबसल्या मिळते. हे अ‍ॅप 60 बससाठी सुरू केले होते, सप्टेंबरनंतर त्यात बदल करणार आहोत. त्यात पाल्याचा फोटो, व्हिडिओ आणि हजेरी या बाबीही जोडणार आहोत.याचबरोबर पतंजलीचे मेगा स्टोअरही सुरू केलेय. दीड-दोन महिन्यांत उभे केले. याचे बहुतांश व्यवस्थापन पत्नी पाहते. ही वाटचाल अत्यल्प कालावधीत झाली.

पहिल्या नोकरीपासून आतापर्यंत खूप शिकत आलोय. सुरुवातीला 24 जणांना पगार द्यायचा ताण यायचा, आता आपण हे करतोय, याचा अभिमान वाटतोय.जबाबदारीची जाणीव झालीय. बर्‍याच ठिकाणी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही जातो. शिवाय टेड एक्स आणि सीएसआर अंतर्गत सामाजिक कामेही करतोय. त्यातून मिळणारे समाधान वेगळेच.

( शब्दांकन – शिल्पा दातार-जोशी )

पुढील अंकांत – शिल्पा धामणे

LEAVE A REPLY

*