नाशिक । पालकांसाठी ऑनलाईन ऍक्टिव्हिटी :शिल्पा धामणे ( स्टार्ट अप्स )

0

मुलीला छंदवर्ग शोधण्याच्या गरजेतून निर्माण झालेल्या सोयीला व्यावसायिक रूप देऊन ती यशस्वी करणे सोपे काम नाही. आर्किटेक्ट शिल्पा धामणे यांनी पालकांची गरज ओळखून नाशिकमध्ये पालकांना छंदवर्ग, शाळा, महाविद्यालये यांची इंत्यभूत माहिती देणारे ऍप सुरु केले. त्यांच्या बुक माय ऍक्टिव्हिटी डॉटकॉम या संकेतस्थळाचा लाभ अनेक संस्थाचालक आणि ग्राहक यांना जोडणारा दुवा म्हणून होतोय.

मी नाशिकची. 2005 साली इथेच आर्किटेक्ट झाले. त्यानंतर जीआरई आणि टोफेल शिकण्यासाठी पुण्याला गेले. त्यानंतर अमेरिकेतील व्हर्जिनिया इथे टेक्निकल कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटला प्रवेश घेतला. तिथे दोन वर्षांचा कोर्स दीड वर्षांतच संपवून गिल्बेन बिल्डिंग कंपनीमध्ये साडेतीन वर्षें प्रकल्प अधिकारी म्हणून काम केले. कौटुंबिक समस्यांमुळे 2011 मध्ये भारतात परतले.


माझे सासरे आणि पती आर्किटेक्ट आहेत. त्यांच्याच देवरे-धामणे आर्किटेकमध्ये मी प्रकल्प अधिकारी म्हणून काम सुरू केले. मोठी मुलगी अडीच वर्षांची असताना तिच्यासाठी क्लासेस शोधणे मला दिव्य वाटले. कारण अमेरिकेहून आल्यावर इथल्या शैक्षणिक संस्था, शिक्षणपद्धती यांच्याशी माझा मेळच बसेना. शैक्षणिक वातावरण मागासलेले वाटले. विद्यार्थी, शिक्षक आणि शिकवणार्‍या संस्था यांच्यात बरीच दरी जाणवली. लक्षात आले, पालक पैसे खर्च करायला तयार आहेत; पण तेवढे त्यांना समाधान मिळतेय, असे नाही. तसेच इथे व्यावसायिकतेची कमतरता आहे. म्हणजे एखादा मार्शल आर्टस् किंवा चित्रकलेचा क्लास आठवड्यातून तीन वेळा असणे अपेक्षित असेल तर तो प्रत्यक्षात दोनदाच असतो. अशावेळी चांगले क्लासेस कोणते, शिक्षणसंस्था, शाळा, महाविद्यालये, विश्वविद्यालये कोणती आणि कुठे आहेत, याविषयी पालकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. त्यावेळी हा गॅप भरून काढण्यासाठी इंटरनेटवर पालक आणि संस्थाचालक यांच्यात तंत्रशुद्ध सेतू तयार करायचा, असे मी ठरवले.

घरच्यांनी यात मला उत्तम साथ दिली. मीही त्याबाबत सखोल अभ्यास करू लागले. एक एक्सेलशिट तयार केली. त्यानंतर वीस विविध छंदवर्गांत गेले. तिथले अनुभव मांडले. एक चांगला डाटाबेस तयार झाला. यानंतरही बरीच माहिती मिळवली. मिळालेली मोठी माहिती इतरांच्या उपयोगी पडू शकेल, असे जाणवले. कारण माझा अहवाल तयार झाल्यावर मैत्रिणी क्लासबाबत चौकशी करत आणि दिलेली माहिती त्यांना शंभर टक्के मदत करत असे. आपण असे हजारो पालकांना मदत करू शकतो, हे जाणवले. मग तयारी सुरू झाली, मोठ्या पातळीवर काम नेण्याची. मूळ संज्ञेवरच काम सुरू केले. त्यासाठी 2015 मध्ये पहिली सेवक नेमली. तिने केवळ फोनद्वारे जवळपास 700 लोकांची माहिती मिळवून त्यांचे रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर ‘बुक माय शो डॉट कॉम’ हे संकेतस्थळ 2015 साली सादर केले. हे सगळे करत असताना एकेक गोष्ट शिकत गेले.

आम्ही आर्किटेक्चरला असताना ‘आर्किटेक्चर झोनिंग’ करायचो, त्याचा उपयोग एक्सेलमधील कामासाठी झाला. ऑनलाईन मार्गदर्शन केंद्राबाबत तांत्रिकदृष्ट्या काय करावे, समजत नव्हते, त्यासाठी संगणक सॉफ्टवेअर विकासकांची मदत घेतली. हे करत असताना समजत नसलेल्या शब्दांची, प्रोग्रामची माहिती गुगल सर्चवरून घेतली. त्यातील काही गोष्टींसाठी आऊटसोर्सिंग केले. जून 2016 मध्ये हे संकेतस्थळ हॅक झाले. त्यानंतर पूर्ण कोडिंग यूएस बेस्ड केले. एप्रिल 2017 ला संकेतस्थळाचे नवीन व्हर्जन सादर केले. आतापर्यंत त्यावर 8 हजार सेवा पुरवणार्‍या संस्था, लोकांनी त्यावर रजिस्ट्रेशन केले आहे. त्यावेळी मुंबई इथे स्टार्ट अप लीडरशिप कार्यक्रम होता, त्यासाठी 3 हजार लोकांमधून 67 लोकांची शॉर्टलिस्ट केली होती, त्यात मी होते. त्यावेळी कमीत कमी साधन संपत्तीचा जास्तीत जास्त वापर करून आपल्याला अपेक्षित यश कसे मिळवायचे, याबाबत शिकायला मिळाले. यावेळी मला आर्किटेक्चरच्या वेळी अभ्यासक्रमात शिकलेल्या ‘डिझायनिंग थिंकिंग’चा उपयोग झाला.

मी हा प्रकल्प कसा पुढे नेणार, बाजारपेठेतील त्याचे महत्त्व, त्याला मिळणारा वाव इथपासून ग्राहक, भांडवल, इथपर्यंत व्यावसायिक धडे घेतले. मला मिस्टरांनी आर्थिक सहकार्य केले. आता आमचे उत्पादन आणि बाजारपेठ दोन्ही तयार आहे. इंटरनेट सुरू केल्यावर अ‍ॅप उघडल्यावर तुमच्या घरापासून पाच किलोमीटर परिसरात कोणकोणत्या शिक्षणसंस्था, छंदवर्ग आहेत, हे सहज समजते. यामध्ये 220 प्रकारे वर्गवारी केली आहे. त्यात कला, नृत्य, संगीत, क्रीडा, साहसवर्ग, आरोग्य, कोचिंग क्लासेस, बालवाड्या, शाळा, महाविद्यालये अशा घटकांचा समावेश आहे.

निसर्ग आणि शेती या अतिशय भन्नाट शाखाही आम्ही यावर सुरू केल्या आहेत. तसेच यावर तुम्ही परिसंवाद, प्रशिक्षणे, कार्यशाळा, अ‍ॅक्टिव्हिटीज् या गोष्टी शोधू शकता. ऑनलाईन पाहू शकता. त्याची एक इको सिस्टिम तयार होतेय. या सिस्टिममधून रेटिंग म्हणजेच दर्जानुसार विभागणीही होत असल्याने पालकांना सोपे जाते. त्यामुळे शिक्षणसंस्थेची निवड सोपी व पटकन होते. यामध्ये ई-कॉमर्सच्या सोयी आहेत. या अ‍ॅपमधून एखाद्या क्लास किंवा महाविद्यालयाची निवड केल्यास ग्राहकांना ते ऑनलाईन बुक करण्याची सोय आहे. त्यावेळी ग्राहकांना आमची फी द्यावी लागते. तसेच एखाद्याला बुकिंग रद्द करायचे असले तर तो तसेही करू शकतो.

आमच्या अ‍ॅॅपवर माहिती देणारे क्लास, संस्थाचालक यांच्याकडून ठराविक मूल्य घेतले जाते. यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातल्या व्यक्तींना अधिक लाभ मिळतात, अशीही सोय आहे. या पलीकडे जाऊन आम्ही ऑनलाईन सपोर्ट सिस्टिम सुरू केली आहे. त्यासाठी बावीस तज्ञांची टीम निवडली आहे. एखाद्या विद्यार्थ्याला कोणती शाखा निवडावी, कोणती कला शिकायची, याबाबत मानसिक गोंधळ असेल तर त्याचा प्रश्न इथे सोडवला जातो. तसेच ग्राहकांना जे क्लासेस अधिकाधिक आवडतात, त्यांच्याविषयीही महत्त्वाच्या बातम्या सतत देत असतो.

वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त असल्याचे ग्राहकांचे मत आहे. आजपर्यंत 50 जणांनी थेट बुकिंग केली आहे. वय वर्षे 4 ते 40 पर्यंतच्या लोकांसाठी हे अ‍ॅप उपयोगी ठरतेय. आता हे मॉडेल आम्हाला जगभरात न्यायचे आहे. आठ जणांचा सेवकवर्ग त्यासाठी खूप मेहनत घेतोय. लवकरच हे उद्दिष्टही आम्ही साध्य करू.

(शब्दांकन – शिल्पा दातार-जोशी)

पुढील अंकात – ओंकार वाळिंबे

LEAVE A REPLY

*