नाशिक । संघर्षातून उद्योगाची पुनर्बांधणी : पंकज घाडगे (मार्केटिंग अँड फायनान्स)

0

सन 2019 पर्यंत एक लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे माझे ध्येय आहे. लोकांकडून प्रश्न मागवून व्हिडीओ तयार करतोय. यूट्यूब स्टुडिओची स्थापन करून त्यावरून लवकरच कार्यक्रम सुरू करतोय. कम्युनिटी बिल्डिंग आणि बिझनेस मॉडल विकसित करण्याचे लक्ष्य आहे. ध्येयवेडेपणा माझा स्थायीभाव. लोकांना शिक्षित करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे, सबलीकरण करण्याचे काम मी करणार आहे. 

शिक्षणात मी अत्यंत सामान्य विद्यार्थी होतो. इंजिनिअरिंगचे स्वप्न भंगल्यानंतर बीएस्सीला प्रवेश घेतला. ‘एटीकेटी’चा सहारा घेऊन बीएस्सी कशीबशी पूर्ण केली. पैशाची निकड होती. म्हणून वृत्तपत्र टाकणे, इव्हेंट मॅनेजमेंटची कामेही केली. शिक्षणातूनही करिअरचा शोध थांबला नव्हता. मात्र उद्योग, मार्केटिंग, व्यवसायाची उर्मी स्वस्थ बसू देईना.

चार भिंतीतील अनुभवापेक्षा प्रत्यक्ष मार्केटिंग शिकण्यासाठी पुण्यात मार्केटिंंग एक्झिकेटिव्हची नोकरी पत्करली. थोडी प्रगल्भता येत होती. बाजार कळू लागला मात्र ‘बिझनेसचे फॅड’ अस्वस्थ करत. स्वप्ने मोठी होती. त्याला शिक्षणाची जोड दिली तर स्वप्न जलद पूर्ण होतील ही खूणगाठ मनाशी बांधली. नाशिकमधून एमबीए केले. मात्र तिथल्या चार भिंतींच्या शिक्षणापेक्षा प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षणाची निकड पहिल्यांदा जाणवली. म्हणून कॉलेज करून उर्वरित वेळेत बिझनेस, मार्केटिंगचे प्रात्यक्षिक अनुभव घेत गेलो.

शिक्षण घेत असताना गल्ली ते दिल्ली सर्व स्तरावरील ट्रेनिंग क्षेत्रातील ट्रेनसर्र्कडून मार्गदर्शन, धडे घेऊन पहिल्यांदाच 400 लोकांना गोळा करून राज्य स्तरावर नेटवकिर्ंंग स्वतंत्र वितरकांची ‘डिस्ट्रिब्युटरशिप’ उभी केली. असे अनुभव घेत एमबीए पूर्ण केले. माझा पहिला बिझनेस म्हणाल तर दिवाळीच्या काळात मी पुण्यात आकाशकंदिल, पणत्या विक्रीचा ‘उद्योग’ केला, परंतु पुण्यात या वस्तू विकल्या गेल्या नाहीत. म्हणून नाशिकला येऊन त्यांची विक्री केली आणि नफा कमवला. बिझनेस, मार्केटिंग हे स्वप्न स्वस्थ बसू देईना. उद्योगवर्धिनीचे सुनील चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजकतेचा कोर्स पूर्ण केला. त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वादाने दहा हजार रुपयांचे भांडवल घेऊन ‘बीफ्लाय’ सोशल मीडिया मार्केटिंगची मुहूर्तमेढ रोवली. बिझनेसमध्ये उतरल्यानंतर माझे वय कमी दिसत. त्यामुळे अशी आव्हाने पेलून या क्षेत्रात उतरलो. दिसण्यामुळे ग्राहक चटकन विश्वास ठेवत नसत. ‘उद्योगवर्धिनी’च्या माध्यमातून पहिल्यांदा वेबसाईट निर्मितीचे काम मिळाले. पहिल्याच ‘कॉन्ट्रॅक्ट’मध्ये एक चूक केली आणि आर्थिक नुकसानाला सामोरे गेलो. त्यातून खूप शिकलो. नंतर उद्योगासंबंधी व्याख्याने देऊ लागलो. 15 महाविद्यालयांत उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून व्याख्याने दिली.

‘बीफ्लाय’ या माझ्या स्वत:च्या फर्मच्या माध्यमातून सेवा उद्योगातून मी 2016-17 या पहिल्याच वर्षी साडेसात लाखांचा ‘बिझनेस’ केला. ‘बीफ्लाय’चा विस्तार करण्यासाठी वेबसाईट डेव्हलपर, डिझायनर, काही क्रिएटिव्ह व्यक्ती हाताशी घेऊन एक ‘टीम’ तयार केली. पहिल्यांदा प्रियंका फार्मा, नाशिकमधील मोठे एक्स्पोर्ट उद्योग समूहांसाठी वेबसाईट तयार करून दिल्या. प्रारंभी एका वेबसाईटचे केवळ 18 हजार रुपये घेऊ लागलो. आज माझा दर्जा पाहून माझा क्लएंट 75 ते 80 हजार एक साईट तयार करण्यासाठी देतो. एकीकडे हे सुरू असताना उद्योजकतेची व्याख्याने देणे, इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण सुरूच ठेवले. ‘मीडिया मार्केटिंंग’मध्ये उतरलो. एकेक टप्पे ओलांडून चुकत-शिकत वाटचाल
सुरू ठेवली.

बिझनेसमध्ये चढती वाटचाल सुरू होत असताना माझ्या आयुष्यात अत्यंत वाईट घटना घडली. आई-वडील एकदा कराडला जाताना त्याच्या बसला अपघात झाला. आईचे जागीच निधन झाले आणि वडील अत्यवस्थ होते. हा माझ्यासाठी मोठा आघात होता. तो पचवून पुन्हा बिझनेसकडे येणे गरजेचे होते. परंतु वडिलांची अवस्था अपघातानंतर अत्यवस्थ झालेली. प्रचंड पैसा उपचारात गेला. माझी आर्थिक परिस्थिती बिकट झाली. वडिलांचे आजारपण आणि बिझनेसकडे झालेले दुर्लक्ष यामुळे बिझनेसचा उंचीवर नेलेला आलेख पुन्हा शून्यावर आला. ‘क्लाएंट’ दूर निघून गेले. हातातील सर्व ऑर्डर गेल्या. तो काळ अत्यंत संघर्षाचा आणि परीक्षा पाहणारा होता. त्या काळात माणसांची किंमत कळाली. पैशाची गरजही उमजली. नाती कळाली. मित्रांची दोस्तीही दिसली. त्याही परिस्थितीतून उभे राहून पुन्हा बिझनेसमध्ये प्राण आणला.

वडिलांना आजारपणातून उभे केले आणि नव्याने स्वत:सह ‘बिझनेस’ची पुनर्बांधणी केली. आई अपघातात गेली, मात्र आईच्या माघारी वडिलांना मृत्यूच्या दारातून ओढून आणल्याचे समाधान मोठे आहे. वडील पायावर उभे राहिल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच महात्मानगरला स्वकष्टातून सुंदर ऑफिस साकारले. मला ‘बिझनेसमन’ झालेला, स्वत:च्या ऑफिसमध्ये बसलेला पंकज माझ्या आईला पाहायचा होता. ते स्वप्न साकार झाले पण ते पाहायला आई नव्हती ही खंत आजही छळते.

दरम्यान, बहिणीलाही मदतीचा हात दिला. यापेक्षा अधिक संघर्ष काय असेल? परंतु हरेल तो पंकज कसला. त्यातूनही मी उभा राहिलो. या सर्व संकटांतून तणावाचे नियोजन करण्यासाठी मला ‘प्राणिक हिलिंग’ ध्यान काम आले.
आज जगण्यात जरा स्थिरता आली आहे. डिजिटल, सोशल मीडिया मार्केटिंगसह तरुणाईला उद्योजकता, जीवनकौशल्य देणारे प्रेरणादायी व्याख्यानेही देत आहे. आजवर 130 व्याख्यानांतून 15 हजार विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे दिले आहेत. कधीकाळी प्रतिकूल परिस्थिती आणि थोडाशा भांडवलावर सुरू केलेल्या बीफ्लायची वार्षिक उलाढाल 10 लाखांहून अधिक झाली आहे.

समाजसेवेचे गुण रक्तातच आहेत. तरुणाईला जागे करून त्यांच्यात उद्योजकतेचे बीज मला रोवायचे आहे. त्यांना मार्केटिंग स्ट्रॅटर्जीचे मार्गदर्शन करत आहे. अनेकांना अ‍ॅप, वेबसाईट, स्टार्टअप्स तयार करून उद्योजकतेसाठी तंत्रज्ञानाचे पंख देत आहे. ग्राहकांनी निवडलेल्या क्षेत्रात मार्गदर्शनपर सेवा देत आहे. त्याच्या वस्तू आणि सेवांचे ब्रॅण्डिंग, विपणन, जाहिरात आदी स्तरावर ग्राहक मिळावेत म्हणून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा देत आहे. सन 2019 पर्यंत एक लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे माझे ध्येय आहे. लोकांकडून प्रश्न मागवून व्हिडीओ तयार करतोय.

यूट्यूब स्टुडिओची स्थापन करून त्यावरून लवकरच कार्यक्रम सुरू करतोय. कम्युनिटी बिल्डिंग आणि बिझनेस मॉडल विकसित करण्याचे लक्ष्य आहे. अत्यंत स्वस्तात उपचार मिळतील असे हॉस्पिटल तयार करणे, रोड अपघात कमी व्हावे किंवा होऊच नये यासाठी मला तंत्रज्ञान विकसित करणयाचे आहे. पैसा कमवण्याचे तंत्र ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवायचे आहे. लोकांना मदत करण्यासाठी प्रचंड पैसा कमवायचा आहे. मी ध्येयवेडा आहे. लोकांना शिक्षित करून, स्वत:च्या पायावर उभे करणे, समाजाचे ऋण फेडणे हेच माझे अंतिम ध्येय आहे.

( शब्दांकन : नील कुलकर्णी )

पुढील अंकात – विवेक मिशाळ  (मार्केटिंग अँड फायनान्स)

LEAVE A REPLY

*