नाशिक । ‘व्यसनमुक्ती’साठी व्रतस्थ : डॉ. राजन पाटील ( वैद्यकीय )

1

23 पेटंट माझ्या नावावर आहेत. आयसीयूमध्ये आयुर्वेदिक औषधे वापरली जाऊन ती परिणामकारक ठरू शकतात हे मला सिद्ध करयाचे आहे.

युर्वेदात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्याला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सेवा देताना आतड्याचा कॅन्सरचे निदान झाले. देशातील मोठ्या शहरात उपचार केल्यानंतरही वजन झपाट्याने कमी झाले आणि त्यानंतर अत्यवस्थ परिस्थितीत ऑस्टे्रलियामध्ये नेण्यात आले. तिथे शस्त्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही केवळ 48 तास जगणार, असे डॉक्टरांनी सांगितले. अंतर्बाह्य हादरून गेलो. मात्र नाशिकला परतलो. आजारपणामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली. शहर सोडून गावी जाण्याची वेळ आली.

झालेला ‘पुनर्जन्म’ आणि वडिलांची प्रेरणा घेऊन उर्वरित ‘बोनस लाईफ’ समाजसेवेच्या कारणी लावू असे ठरवले. त्याचदरम्यान व्यसनाधिनतमुळे माझ्या एका मित्राला ‘इस्त्रो’मधून जॉब गमवला लागला. आपल्याला काहीही व्यसन नसताना जर कॅन्सर होऊ शकतो मग व्यसनाधिनतेून किती लोकांना कॅन्सर होऊ शकतो याचा अंदाज बांधला. व्यसनाधिनतेतून मुक्त करण्यासाठी अ‍ॅण्टी अ‍ॅडिक्शन औषध काढण्यासाठी संशोधन सुरू केले. पावणेदोन वर्षे संशोधन सुरू होते. माझ्या संशोधनाच्या काळात आई-वडील, पत्नी, भाऊ दुसर्‍याच्या शेतात मजूर म्हणून श्रमिक म्हणून काम केले. पत्नीने गळ्यातील सौभाग्याची पोत विकली आणि सर्वस्व गमावल्यानंतर तीन वेळा अपयशी होऊन व्यसनावर रामबाम उपाय ठरणारे ‘अ‍ॅण्टी अ‍ॅडिक्शन’ औषध शोधण्यात मला यश आले. आज माझ्या नावावर संशोधनातील 23 पेटंट आहेत.


हा प्रवास अत्यंत खडतर होता. माझ्या औषधींची वार्षिक उलाढाल तीन कोटी रुपयांपर्यंत झाली आहे. माझ्याजवळ 4 हजार स्वेअर फुटांचा बंगला आहे. मर्सिबेन्झ बेन्झ इ-क्लास घेऊन फिरतोय. अर्थात पैसा कमवणे हे ध्येय कधीच नव्हते. नशामुक्तच्या माझ्या औषधांनी आज 35 हजार कुटुंबांच्या घरात आनंद परत आलाय. हजारो कुटुंब तुटण्यापासून
वाचवले, हे समाधान मला अधिक ‘श्रीमंत’ करत आहे.

दहा रुपये खिशात घेऊन बाहेर पडतो. मैलोन्मैल पायी फिरलो. शहरात कित्येक वेळा अर्धपोटी राहिलो. त्यामुळे घरातूनच पहाटे सूर्यादयाच्या आधी जेवण घेऊन बाहेर पडे. डॉक्टर पदवी घेऊन संशोधन करताना गावकरी उपरोधिकपणे टोमणे मारत. ते सर्व शांतपणे सहन करून मी वाटचाल केली आणि आज माझी औषधी सातासमुद्रापार गेली
आहेत. तंबाखूमध्ये निकोटीन असतेच, मात्र त्याच्यावर प्रक्रिया केलेल्या गुटखा आणि तत्सम पदार्थांचे व्यसन तरुणाईला पोखरत आहे. भारतात तंबाखावर प्रक्रिया करून तयार केलेला गुटखा आदी पदार्थांच्या उत्पादक कंपन्या सरकारने बंद केल्या तर देशातील कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण अर्ध्याहून अधिक खाली येईल.

व्यसनाधिनता ‘मानसिक’ आजारच, मात्र अशा व्यक्तीच्या शरीरात होणारे बदल व्यसनाची अंतप्रेरणा देतात. त्यामुळे याच्यामागे ‘फिजाऑलॉजी’ही आहे. अल्कोहोल, निकोटीनमुळे यकृताला सूज येते. तिथे माझे रंग-गंधविरहित ‘अ‍ॅण्टी अ‍ॅडिक्शन’ काम करते. व्यसनाधिनतेपासून मुक्ती देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे कामही मी केले.व्यसनमुक्तीवरील दीड हजाराहून अधिक व्याख्याने मी दिली आहेत. व्यसनांचे कारण काय आहे असे विचारल तर मानसिक ताण-तणाव, श्रीमंती यामुळे कुणीही व्यसनी होत नाही तर व्यक्तीची ‘संगत’ हे व्यसनाधिनतेकडे पहिले पाऊल आहे. तंबाखू, गुटखा, मद्य यांची मोठी ‘इंडस्ट्री’ जोवर बंद होत नाही तोपर्यंत भारतात व्यसनी लोकांचे प्रमाण वाढतच जाणार. नशा यात्रेच्या या अंधारातून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या प्रत्येक कथा हृदयस्पर्शी होत्या. एक डॉक्टर असलेल्या ‘हायप्रोफाईल’ कुटुंबात एक आई आल्यानंतर सिगारेट ओढत. तिची 14 वर्षाची मुलगीही आईमुळे व्यसनाधिन झालेली. त्या माय-लेकीला मी व्यसनमुक्तीची वाट दाखवली आणि त्या आज निरोगी जीवन जगात आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

व्यसनमुक्तीसाठी जालीम औषधाच्या निर्मितीनंतर ‘रिक्यूअर’ नावाच्या ब्रँड अंतर्गत वजन वाढवणे-कमी करणे, मूळव्याध, हाडांशी संबंधित आजार यासह 13 संशोधित औेषधी बाजारात आणल्या. आज वैद्यकीय उत्पादनांची उलाढाल 3 कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. 38 हजार लोकांना व्यसनमुक्त करू शकलो हे समाधान आहे. एक प्रसंग अत्यंत अविस्मरणीय होता. एकदा माझ्या कारला एका व्यक्तीने हात दाखवला आणि एका ठिकाणी नेले. त्यांना मी ओळखत नव्हतो. त्याच्या गावात गेल्यानंतर सुमारे 200 लोक हातात हार घेऊन तयार होते. हे कशासाठी अशी विचारणा करताच इतक्यात एकजण म्हणाला, डॉक्टर साहेब, तुमचे व्यसनमुक्तीचे औषध घेऊन आज आमच्या गावातील शेकडो लोक व्यसनमुक्त झाले म्हणून हा सामूहिक सत्कार आहे. याहून मोठा पुरस्कार कुठला असू शकेल.

तरुणाईने मनाच्या शक्तीला जागृत केल्या तर व्यसनापासून दूर राहणे या अवघड नाही. ध्यान हा त्यातील सर्वात प्रभावी उपचार ठरतो, असे मी मानतो. आजवर 90 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच राष्ट्रपती पुरस्कारही जाहीर झाला आहे. परंतु व्यसन सोडून ज्या व्यक्ती आनंदाने जगत आहेत त्यांच्या चेहर्‍यावरील हास्य माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. मला मिळणार्‍या कमाईतून अर्धी कमाई मोफत औेषधी वाटण्यात देतो. स्वत:सह समाजाचेही भले होईल असे काम केले तर त्यातून मिळणार्‍या आनंदाचे व्यसन सर्वांनी करावे. असे व्यसन आणि त्यातून मिळणारी झिंग जगातील सर्वात अनमोल गोष्ट आहे.

(शब्दांकनः नील कुलकर्णी )

1 COMMENT

LEAVE A REPLY

*