नाशिक । स्त्रीआरोग्याचा वसा : डॉ. कविता गाडेकर ( वैद्यकीय )

0

लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्राबाबत ओढा असलेल्या डॉ. कविता गाडेकर वैद्यकीय सेवेच्या पुढं जाऊन स्त्रियांच्या सबलीकरणासाठी काम करतात. स्त्रिया आजार अंगावर का काढतात, त्याची कारणं शोधून त्यावर उपाय सांगू लागतात. कधी मनात बरंच मळभ साचलेली गर्भवती सखी त्यांच्यापाशी मनमुक्त बोलते तर कधी एखाद्या आजी आपल्या शरीरवेदनांबरोबरच मनाच्या वेदनाही सांगतात, तेव्हा त्यांच्यातली डॉक्टर या संज्ञेच्या पलिकडचीही माणुसकीची, संवेदनांची विचारचक्र सुरू होतात आणि त्यावर शोधली जातात, वेगवेगळी उत्तरं!

 

मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या राजधानीत मी लहानाची मोठी झाले. शिक्षणही तिथंच झालं. माझ्या वडिलांना मधुमेह होता. त्यांना रोज इन्शुलिनचं इंजक्शन द्यावं लागायचं. हात मऊ असल्यानं तिसरीत असल्यापासूनच मी वडिलांना इन्शुलिन द्यायला शिकले. लहान मुलांना इंजक्शनची भीती वाटते; पण आमच्या घरात ते नित्यनेमानं दिलं जात असल्यानं इंजेक्शनला कधीच घाबरले नाही.

उलट तेव्हापासूनच वैद्यकीय क्षेत्राचं आकर्षण वाटलं. आईवडील मध्यमवर्गीय. त्यांची सामाजिक कार्याची आवड माझ्यात उतरली. राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये डीजीओ म्हणजेच स्त्रीरोग प्रसूतितज्ज्ञ झाले. लग्नानंतर नाशिकला आले. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून मुंबई व नाशिकमध्ये मला मोठा सांस्कृतिक फरक दिसला. स्त्रीसबलीकरण हा माझ्यासाठी महत्वाचा विषय आहे.

नाशिकमध्ये आल्यानंतर इथल्या स्त्रियांचा एक वर्गच वेगळ्या विचारसरणीचा दिसला. कुटुंब जेवल्यानंतर उरलेलं खाणं, शिळंपाकं खाणं, दुखणी अंगावर काढणं, वेळेवर औषधं न घेणं यामध्ये मला त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नसल्याचं कारण दिसलं. बरेचदा आजार टोकाला गेल्यावर डॉक्टरकडं जायचा कल दिसतो; पण तेव्हा खूप वेदना सहन करून आजारही बळावलेला असतो. समतोल आहाराचा अभाव, स्वतःच्या आरोग्याविषयी उदासीन असणं, स्त्रियांच्या सर्व गोष्टींचे बरेचदा निर्णय त्यांचे नवरे घेत असतात.

मला बरं वाटतं नाहीये, मी पैसे घेऊन चप्पल घालून डॉक्टरांकडं जाऊन येते’ हा निर्णय बहुसंख्य स्त्रिया अजूनही तातडीनं घेऊन शकत नाहीत. बरेचदा कर्करोगाचं निदान झालेल्या स्त्रियाही उपचारांबाबत अवलंबून आणि लाचार दिसतात, त्या पूर्ण उपचार घेणं नाकारतात. कारण एकच, स्वतःच्या दुखण्यांवर पैसे खर्च करण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करणं हे आव्हान होतं. स्त्रीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध शिबिरं, कार्यशाळांशी जोडले गेले.

कारण अशा कार्यक्रमांतून एकाच वेळी अनेकांचं प्रबोधन होतं. स्त्रीरोगतज्ज्ञ झाले तरी सतत बदलणाऱ्या क्षेत्राशी जुळवून घेत अधूनमधून पुण्यामुंबईला जाऊन माझं ज्ञान अपडेट’ करतच असते. त्याचबरोबर डॉक्टरांच्या वर्तुळाशी संपर्क वाढावा म्हणून विविध ठिकाणी जाऊन काम केलं. सहा वर्षांपूर्वी दवाखाना सुरू केला आणि आता मुलं (मुलगा ७ वर्ष, मुलगी ५ वर्ष) थोडी मोठी झाल्यावर दोन वर्षांपूर्वी सिडकोमध्ये ‘डॉ. गाडेकर मॅटर्निटी होम’ हे रुग्णालय सुरू केलं. वंध्यत्व निवारणतज्ज्ञ म्हणून काम करते. दहा वर्षांचा अनुभव आहे. तसंच आयएमएचीही सदस्य झाले आहे.

सेव्ह गर्ल चाईल्ड’ या उपक्रमाबरोबरच किशोरवयीन मुलींचा वयाचा टप्पा महत्वाचा वाटतो. स्त्री होण्याचा पहिला टप्पा म्हणजे उमलत्या कळ्या. किशोरवयीन मुली. याच वयोगटात त्यांना त्यांचं आरोग्य, आहार यांविषयी जागरुक केलं तर भविष्यात त्या निदान सजगपणे स्वतःबाबत निर्णयतरी घेऊ शकतील, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही अनेक कार्यक्रम राबवत असतो. मुलींना खूप प्रश्न असतात. शारीरिक बदल, मासिक पाळी, मनाला धडका देणारी आंदोलनं, यांविषयी कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर त्यांच्यावर वेगळ्या गोष्टी बिंबवल्या गेल्यानं, काही घरांत मुलगामुलगी भेद असल्यानं माझ्यापाशी त्या मोकळं बोलतात.

वैद्यकीय परिभाषेत स्वतःविषयी सगळं समजावून घेतात. प्राधान्य कशाला द्यायला हवं, शिकणं कसं महत्त्वाचं आहे हे पटवून दिल्यावर त्यांचं मोकळं हसणं म्हणजे मनावरचं मळभ दूर झाल्यागत वाटतं. आयएमए व वुमेन्स विंग यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या कार्यक्रमात मुलींचं हिमोग्लोबिन तपासून रक्तक्षय असेल तर त्यावर निदान, उपचार, आहार, व्यायाम, मासिक पाळी स्वच्छता, अतिस्थूलता याबाबत मार्गदर्शन केलं जातं. याचा एक अहवाल मी राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमात सादर केला सादर केला आहे.

शिकल्यासवरलेल्या मुली करिअर करताना अडथळा नको म्हणून मातृत्व पुढे ढकलताना दिसतात. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे त्यांच्या मूल होण्याच्या प्रक्रियेची नैसर्गिक सायकलच बिघडते. त्यानंतर मात्र त्यांना हवी असलेली प्रेग्नंसी टिकत नाही. गर्भपातांना सामोरं जावं लागतं.. त्यातून आयव्हीएफसारख्या खर्चिक बाबींना सामोरं जावं लागतं. मातामृत्यूंचं प्रमाण घटलं असलं तरीही अजूनही हाय रिस्क प्रेग्नंसीज्‌चं प्रमाण लक्षणीय आहे या सामाजिक पण स्त्रीच्या वैयक्तिक समस्यांना समोर ठेवून प्रसूती शिबिरंही घेते.

मानसिक ताण कमी करणारी ध्यानधारणा, आहार, ऊर्जा यांचं महत्त्व पटवून देते. फास्टफूड, प्रदूषण, बदललेली जीवनशैली अशा अनेक कारणांमुळं स्त्रियांधल्या कर्करोगाचं प्रमाण वाढलंय. खेडोपाड्यांमध्ये स्मार्टफोन आणि रेंजही पोहोचलीय; पण वैद्यकीय ज्ञान नाही पोहोचलेलं, याची खंत वाटते. कर्करोगाच्या अगदी प्राथमिक टप्प्यात निदान झालं तर तो पूर्ण बरा होऊ शकतो.पण त्यासाठी अनुवांशिकता असणाऱ्या, चाळिशी ओलांडलेल्या स्त्रियांनी या चाचण्या आवश्यकतेनुसार अवश्य कराव्यात. स्तनाच्या कर्करोगासाठी मॅमोग्राफी, गर्भाशयाशी संबंधित कर्करोगाच्या चाचणीसाठी पॅपस्मीअर या त्या चाचण्या. उदा. मेनॉपॉजनंतरही काही वर्षांनी ब्लिडिंग सुरू झाल्यास तातडीनं पॅपस्मीअर ही चाचणी करावी. किंवा काही आजारांची लक्षणं विशिष्ट कालावधीत औषधं घेऊनही बरी झाली नाहीत तर कर्करोगाच्या चाचण्या कराव्यातच.

आमच्या रुग्णालयात मुलीच्या जन्माचं स्वागत करतो. किटमधून भेटवस्तू दिल्या जातात. तसंच मुलगी झाल्यावर बिलातही सवलत देतो. आईचं समुपदेशन करतो. स्त्रीच्या इच्छा कुटुंबासमोर व्यक्त करून मनोमीलन घडवण्याचा प्रयत्न करतो. मुलगामुलगीपेक्षा बाळ आणि आई सुदृढ असणं महत्त्वाचं असतं. आता मुली शिकतात, कमावतात, आईवडिलांनाही सांभाळतात.

अनेक जणी उत्तम खेळाडू, राजकारणी, शास्त्रज्ञ आहेत. म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करायला हवं. गर्भवती महिलेच्या शारीरिक आणि मानसिक समस्या समजावून घेतल्यानं त्या माझ्या मैत्रिणीच होतात. मोकळ्या होतात. रडतात. इच्छा व्यक्त करतात. एका स्त्रीला फोडणीचा वास आला की उलटी होत असे. मी तिच्या नवऱ्याला समजावलं, ‘ती सगळी तयारी करून देईल, फक्त भाजीला तडका तुम्ही द्या, म्हणजे तिचा पुढचा दिवस चांगला जाईल.’ त्यानं ते मनावर घेतलं. रोज भाज्यांना तडका देऊ लागला. यामुळे बाळाच्या आगमनाचं स्वागत त्या दोघांच्या आनंदी मनानं झालं. अशी वैद्यकीय नसलेली अनेक गणितं आम्ही डॉक्टरकीच्या पलिकडं जाऊन सामाजिक दृष्टीनं सोडवतो.

माझ्या रुग्णालयात ज्येष्ठ महिलांना फीमध्ये सवलत दिली जाते. वृद्ध महिलांचे निराळे प्रश्न समोर येतात. हातातून सगळं निसटून गेलेले असतात. सांधे कुरकुरत असतात. अशाच काळात अनेक वेगळ्या व्याधी जन्म घेतात. त्याचा संपूर्ण विचार केला जातो. माझ्या दृष्टीनं स्त्रियांच्या उपचारांबरोबरच मानसिक आधारही महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच एक स्त्रीरोगतज्ज्ञ असलयाचं समाधान वाटतं.

शब्दांकनः शिल्पा दातारजोशी

LEAVE A REPLY

*