नाशिक । हृदयात स्थान मिळवणारे डॉक्टर : डॉ. अतुल पाटील ( वैद्यकीय )

0

हृदयरोग टाळण्यासाठी रुग्णांचे समुपदेशन करण्यासाठी संदर्भसेवा रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे प्रमुख, हृदयरोगतज्ञ डॉ. अतुल पाटील नेहमीच प्रयत्नशील असतात. हृदयरोग टाळण्यासाठी काय करता येईल याचे मार्गदर्शन करणारे ‘लिव्ह 100 इयर्स’ नावाचे अ‍ॅप ते सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देत आहेत.

वैद्यकीय सेवा करताना आत्मभान यावं, आपल्यातल्या क्षमतांचाज्ञानाचा लाभ रुग्णांना करून द्यावा, महाग उपचार न परवडणाऱ्या आर्थिक गटाला ते अत्यल्प खर्चात उपलब्ध करून द्यावेत, ही शिकवण मी नाशिकमधील संदर्भ सेवा रुग्णालयात अमलात आणतो आहे. रुग्णांच्या हृदयावर उपचार करताना त्यांच्या हृदयात स्थान मिळवण्याचाही प्रयत्न करतो आहे.

आपल्या व्यक्तिमत्त्वावर, विचारांवर भवतालचा परिणाम होतोच. आपल्या संवेदनशीलतेवर तो अवलंबून असतो. एक हृदयरोगतज्ज्ञ म्हणून प्रत्येक रुग्णावर उपचार करताना ही संवेदनशीलता उपयोगी पडते. आपण असे का घडलो, हा विचार करत असताना मन भूतकाळात जातं. वडिलांची शासकीय नोकरी असल्यानं आमची बदली होत असे. पहिली ते आठवीला मी मालेगाव इथं मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो. पुढचं शालेय शिक्षण चाळीसगावला पूर्ण झाल्यानंतर नाशिकला अकरावीबारावी आणि नंतर एमबीबीएसची पदवी घेतली. त्यानंतर पुण्याला डीएनबी करून पुढची चार वर्षं बंगळुरु इथं हृदयरोगतज्ज्ञ ही पदवी घेण्यासाठी गेलो.

याचं कारण, मला फक्त एमबीबीएस करून थांबायचं नव्हतं; तर भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवायची होती. त्यावेळी बंगळुरुचं हृदयरोग सत्यसाई रुग्णालय आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान, सोयी असलेलं भारतातलं एकमेव होतं. आणि तिथल्या शिक्षणाचा फायदा मला माझ्या परिसराला करून द्यायचा होता. या रुग्णालयाचं वैशिष्ट्य असं, की हृदयरोगाच्या अभ्यासक्रमाबरोबरच ‘आपापल्या भागात जाऊन तिथल्या रुग्णांना सेवा द्या’ हेही विचार तिथं रुजवले गेले. याच उद्देशानं शिक्षण पूर्ण करून मेट्रोसिटीमध्ये जाऊन खोऱ्यानं पैसा ओढण्यापेक्षा नाशिकला येऊन संदर्भ सेवा रुग्णालयात २०१३ साली रुजू झालो.

त्यावेळी नाशिकमध्ये ॲजिओग्राफी आणि ॲजिओप्लास्टीच्या सुविधा होत्या; पण झडपांवरील बलून सर्जरी व लहान मुलांवरील पिन होल सर्जरीसाठी नाशिकहून मुंबईपुण्याला जावं लागत असे. मी संदर्भमध्ये आल्यावर इथं या सेवा सुरू केल्यानं हृदयरोगाच्या रुग्णांना या शस्त्रक्रियांसाठी दुसरीकडं जाण्याची गरज नव्हती. आठ जिल्ह्यांमध्ये मिळून एकमेव संदर्भसेवा रुग्णालय आहे, आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार रुग्णांना दिले जातात. तसंच अत्यल्प पैशांत वैद्यकीय सुविधा मिळते. गरीब रुग्णांना खिशाला ताण न देता जीवनदान देणारं हे रुग्णालय आहे. २०१३ ते २०१८ या कालावधीत इथं ८ हजारहून अधिक अँजिओग्राफी आणि ३ हजारहून अधिक अँजिओप्लास्टी झाल्या. उपचार तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुलभ होत चालले आहेत, ते त्याधुनिक तंत्रज्ञान आम्ही संदर्भमध्ये आणलं.

मागील एक वर्षापासून विशेषतः तरुण पिढीला हृदयरोगानं ग्रासू नये म्हणून प्रयत्नशील आहे. त्यासाठी ‘सोशल मिडिया’चा वापर करायचा असं ठरवलं. या व्यवस्थेकडं उदासीनतेनं पाहण्याऐवजी त्यावरून चांगली व्यवस्था उभी केली तरया विचारांनी मनात कल्लोळ उठला.

कारण मधुमेह, उच्च रक्तदाब आणि नंतर हृदयरोग यांना बळी पडणारी तरूणाईही माझ्यासमोर रुग्णाच्या रुपानं येत होती, आहे. मधुमेह व उच्च रक्तदाब असणाऱ्यांना भविष्यात हृदयरोगच होऊ नये यासाठी काय करावं, विचारचक्र सुरू झालं. त्यातून ‘live100years’ या ॲपची कल्पना सुचली. पूर्वीच्या काळी वयाची शंभरी गाठण्याची कल्पना होती, ही शंभर वर्षं निरोगी मिळण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? त्यासाठी डिजिटल माध्यमावर तुम्ही तुमची वैद्यकीय डायरी विकसित करा, ही त्यामागची कल्पना आहे.

आपण आपलं पासबुक, बँकेतील खातं इतर गोष्टींची नोंद ठेवतो, तसंच हे. हे ॲप मोफत असल्याने रुग्ण त्यावर त्यांचे रिपोट्‌र्स, औषधोपचार, व्यायाम, त्यांच्या डॉक्टरांचे सल्लेत्यांनी सांगितलेली पथ्यं या सगळ्याची नोंद ठेवू शकतो. जगाच्या पाठीवर कुठूनही ही नोंद करता येते. हा अहवाल एकाच जागी एकत्रित मिळत असल्यानं काही तपासण्या सतत करण्याची, प्रिस्क्रिप्शनचे जुने कागद जपून ठेवण्याचीही गरज नाही.

बरेचदा आजार झाल्यावर रुग्णालयाची पायरी चढली जाते; पण आजार होऊच नये म्हणूनतसा ॲक्शन प्लॅनच तयार नाही. तोच मी या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देतोय. या ॲपचं काम आता अंतिम टप्प्यात असून काही दिवसांतच उपलब्ध होईल. ‘युवर रेकॉर्ड इज युवर प्रॉपर्टी’. आपलं वैद्यकीय अद्ययावत रेकॉर्ड पाहून आपल्या डॉक्टरांचाही वेळ वाचेल. अचूक व नेमकी माहिती चटकन मिळेल. माझे वडील सत्तर वर्षांचे असून सोशल मिडियाचा उत्तम वापर करतात. त्यांच्या वयाचे हातात वेळ भरपूर आणि आरोग्याच्या कुरबुरी असणारे अनेक ज्येष्ठ सोशल मिडियावर असतात. त्यामुळं ते या ॲपवर सुलभतेनं काम करू शकतात.

जीवनशैलीतील बदल, मानसिकशारीरिक ताण, खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी यांमुळे मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांचे वाढते आकडे, हेच ॲपच्या संकल्पनेमागचं कारण आहे. फास्ट फूड, जंक फूड, वाढता स्थूलपणा ही कारणं आहेत. शरीरातील सर्व बदल टिपण्यासाठी यंत्रं आहेत; पण ताण मोजण्याचं मापक नाही.

त्यामुळे तणावमुक्त जीवन जगण्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. याच कारणानं माझ्या शालेय शिक्षणाच्या गावी, चाळीसगावमध्ये बापजी रुग्णालय स्वखर्चानं सुरू केलंय. तिथं आयसीयू, टूडी इको, कलर डॉपलर अशा सर्व चाचण्या होतात. खान्देशातल्या लोकांना त्याचा लाभ मिळतोय. रुग्ण वाढले तर डॉक्टरांचा आर्थिक लाभ होतो, असं गमतीनं म्हणतात; पण मी भारताच्या सुदृढ व निरोगी पिढी घडवण्याचा विचार करतोय.

त्यासाठी दिल्ली, मुंबई, केईएम, कोची इथं अनेक कार्यशाळा व परिसंवादांमध्ये भाग घेतला आहे. तणावमुक्त जीवनशैलीसाठी जनजागृती करतो आहे. नाशिकमधल्या पहिल्या पिनहोल शस्त्रक्रियेचा, २२० मिमी स्टेंट ॲजिओप्लास्टी करण्याचं काम माझ्या हातून घडलं, रुग्ण बरा होणं हेच माझं समाधान. कारण डॉक्टरांमध्ये संवेदनशील माणूस दडलेला असतो. तो चोवीस तास आपलं कार्यक्षेत्र, रुग्ण आणि संशोधनं यावर विचार करत असतो.

( शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी )

LEAVE A REPLY

*