नाशिक । ‘विशेष’ रुग्णांसाठी जादूची कांडी : डॉ. अभिजित मुकादम ( वैद्यकीय )

0

दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना औषधांबरोबरच ऑक्युपेशल थेरपीची गरज असते. हि थेरपी स्वमग्न, मेंदूचा पक्षाघात, अतिचंचल असलेल्या मुलांबरोबरच पार्किसन्ससारख्या आजारांनी पीडित रुग्णांना स्वावलंबी करण्यासाठी महत्वाची ठरतेय. रुग्णांना अत्यल्प पैशात सेवा देणाऱ्या श्रीगुरुजी रुग्णालयाचे ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. अभिजित मुकादम आज अनेकांच्या मनात आशावाद रुजवत आहेत.  

‘सेवेचा अंकुर मनात रुजावा, रुग्णांसाठी तो आधारू ठरावा, 

परावलंबनाचं मळभ, मनातून दूर व्हावं, 

ज्याच्या त्याच्या मुखी मोकळं हास्य फुलावं’

हे व्रत घेऊन मी गेली आठ वर्षे श्रीगुरुजी रुग्णालयाच्या साथीने ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. ‘विशेष’ मुलांना स्वावलंबी करण्याचे सेवाव्रत घेतलेय. उपचार म्हणजे औषधे एवढेच डोळ्यांसमोर येते; पण काही आजारात केवळ औषधे घेऊनही पूर्ण बरे होता येत नाही, तिथे ऑक्युपेशनल थेरपी जादुई कांडी ठरते.

मी मूळचा रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातला. लहानपणापासून प्रत्येक गोष्टीतले बारकावे, शास्त्रीय कारणं शोधायचो. वर्तमानपत्रात आलेल्या ‘आरोग्याची बारा सूत्रे’सारख्या आरोग्यविषयक लिखाणाचं कात्रण काढून वह्यापुस्तकांच्या खणाला चिकटवण्याचा छंद होता.

आरोग्यविषयक वाचनाचा केवळ छंदच नव्हता, तर ते आचरणात आणण्याचाही प्रयत्न करायचो. दहावीला शाळेत पहिला आलो. बारावीपर्यंत शिक्षण तालुका पातळीवर झालं. त्यानंतर एमएचसीईटीची परीक्षा देऊन वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मुंबईमधील केईएममध्ये गुणवत्तेच्या आधारे प्रवेश घेतला. वैद्यकीयमधलं ‘ऑक्युपेशनल थेरपी’ हे चाकोरीबाहेरचं क्षेत्र निवडलं.

यात एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाबरोबरच मेंदूविकार, मनोविकृतीशास्त्र व शरीरविज्ञान या विषयांवर अधिक भर असतो. त्याला अलाईड हेल्थ सायन्सेस म्हणतात. प्रत्येक स्नायूचं कार्य, स्नायू आणि मज्जातंतूंचा संबंध, त्यामुळे होणाऱ्या मानसिक उलाढाली, यातील बारकावे शिकवणारं हे कार्यक्षेत्र.

न्यूरो फिजिओलॉजी म्हणजेच मेंदूतील रसायनांचा आपल्या जीवनात, आवडीनिवडीत किंवा कार्यक्षेत्रात महत्त्वाचा वाटा असतो. मेंदूमधील डोकोमिन या रसायनाच्या असमतोलामुळं अनेक मनोकायिक आजार होतात. पार्किन्सन्स, मायस्थेनिया ग्रेव्हिससारख्या आजारांच्या रुग्णांसाठी तसंच मुलांमध्ये जन्मजात असलेल्या सेरेब्रल पाल्सी (मेंदूचा पक्षाघात), ऑटिझम (स्वमग्नता), एडीएचडी (हायपर ॲक्टिव्ह), स्लो लर्नर (गतिमंदता), डाऊन सिंड्रोम, हेमिप्लेजिया, अर्धांगवायू अशा अनेक आजारांसाठी ही थेरपी परिणामकारक आहे. रुग्णाच्या उपलब्ध ऊर्जेमध्ये त्याला स्वावलंबी करता येईल, अशा प्रकारचे व्यायाम उपचार आहेत.

मुंबईला शिकत असतानाच औरंगाबादमधल्या हेडगेवार रुग्णालायातील डॉ. तुपकरी व डॉ. पंढरे यांच्या संपर्कात आलो. सेवेचा अंकूर वैद्यकीय क्षेत्रात रुजवण्याचे धडे त्यांनी दिले. रुग्णांना अलीकडं रुग्णालयाची पायरी चढणं आर्थिकदृष्ट्या त्रासदायक वाटतं.

अशावेळी माफक दरात प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा देण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करणारी आमची टीम तयार झाली.पलोकॉस्ट, जेनेरिक या कमी दरात मिळणाऱ्या औषधांना प्राधान्य देणं, गरीब रुग्णांना मदत करणं, चांगली सेवा देणं, कट प्रॅक्टिस न करणं ही उद्दिष्टं डोळ्यांसमोर ठेवून खेडोपाडी, आदिवासी पाड्यांवर शिबिरं घेतली.

विशिष्ट आजार आणि ऑक्युपेशनल थेरपी याविषयी जाणीवजागृती करण्यासाठी तालुकापातळीवर कार्यकर्त्यांची फळी तयार केली. त्यासाठी भरपूर मेहनत घेतली. आदिवासी, ग्रामीण भाग पिंजून काढला. रुग्णालयासाठी आदिवासी क्षेत्र जवळ असलेली जागा, नाशिक निवडलं. ‘रुग्णकेंद्रित’ विचारसरणीनं २००८ साली श्री गुरुजी रुग्णालय सुरू झालं. त्यावेळी मी पीजी करत होतो. शिक्षण पूर्ण करून एक वर्ष मुंबईतच प्रॅक्टिस केली. त्यानंतर २०११ ला मी ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून ‘गुरूजी’मध्ये रुजू झालो. लहान मुलांच्या समस्यांवर विशेषत्वानं काम करतो.

त्याकाळात नाशिकमध्ये या थेरपीची सोय नव्हती. पालक मुलांना घेऊन मुंबईला जात. तिकडं थेरपी घेऊन परत आल्यावर त्यात सातत्य राहत नसे. मेंदूमध्ये समस्येचं केंद्र असल्यानं नियमितता व सातत्य लागतं. मुंबईत दोनशेहून अधिक मुलांवर उपचार केले होते. नाशिकमध्ये फिट्‌सच्या रुग्णापासून सुरुवात केली.

स्वभावदोष, चालणं, बोलणं, शिकण्यावरही फिट्‌सचा परिणाम होतो. त्यानंतर हिमोफिलियाच्या रुग्णाला बरं केलं. यामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नसल्यानं सांध्यांमध्ये रक्त जमा होतं. बारावीतल्या मुलाचा गुडघा सुजला होता आणि पाय काडीसारखा बारीक झाला होता. कारण त्याच्या गुडघ्यात रक्त साठून रक्तस्त्राव होत होता. त्याला वाटलं, बारावीची परीक्षाच देता येणार नाही. कारण एका जागेवर सलग बसल्यावर रक्तस्त्राव होत होता. त्यानं तीन महिने सलग थेरपी घेतल्यावर व्यायाम आणि योग्य प्रकारे काठीचा वापर करून चालल्यामुळे त्याला बारावीची परीक्षा देता आली.

एक मुलगा नुसताच पळायचा, स्थिर बुद्धी नव्हती, बोलायचा काहीच नाही. तो दोन वर्षांचा झाल्यावर त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आलं. त्याला स्पीच थेरपी दिल्यानंतर छान गप्पा मारतो. अभ्यासातही प्रगती आहे. मन आणि मेंदूमध्ये नवचेतना निर्माण करणाऱ्या ऑक्युपेशनल थेरपीला वैद्यकीय चमत्कार म्हणतात.

सर्व शिक्षण अभियानांतर्गत सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार कायद्यानं दिला आहे. पण शिक्षणाच्या बाजारात मेंदूशी संबंधित मनोशारीरिक त्रुटींमुळं एखादं मूल लक्ष देत नसेल तर त्याला शाळेतून काढण्याचे मार्ग शोधले जातात. याउलट या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतलं तर त्यांच्यात फरक पडेल, असं संशोधनातून सिद्ध झालंय. या मुलांना इतर मुलांमध्ये सामावून घ्या, असं आवाहन मी शाळांना करेन.

विशेष मुलांना, मोठ्यांना उपचार देताना वर्तणूक आणि काही प्रमाणात शारीरिक व्यंगांचा विचार करावा लागतो. स्वमग्न आणि मेंदूचा पक्षाघात झालेल्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीनं उपचार करावे लागतात. डाऊन सिंड्रोमच्या बाळाची वेगळी काळजी घ्यावी लागते.

मेंदू, स्नायू आणि मज्जातंतूंविषयक उणिवा निर्माण झालेल्या व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी माझी धडपड सुरू असते. म्हणूनच न चालता येणारे लोक चोवीस तास चाकांच्या खुर्चीवरच असल्यानं त्यांना बेडसोर्ससारख्या गंभीर आजारांना बळी पडावं लागतं. त्याचा विचार करून व्हील चेअरच्या कूशनवर प्रबंध लिहिलाय. महाराष्ट्र स्टेट काऊन्सिल ऑफ फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी या संस्थेचा मी नामनिर्देशित सदस्य आहे. ही थेरपिस्टची नोंदणी करणारी संस्था असून या थेरपीमधील शिक्षण, प्रॅक्टिसचे नियमन करते. माझी पत्नी उच्चशिक्षित असून ती मला या चाकोरीबाहेरच्या कामात पाठबळ देते.

शब्दांकनः शिल्पा दातारजोशी

LEAVE A REPLY

*