पर्यावरणपूरक शेतीचे ‘गोकुळ’

0

शेती म्हणजे केवळ बीज पेरून अन्नधान्याची निर्मिती एवढीच बाब नाही, तर त्यामध्ये सृजनाचा आनंद आहे, गणित, भूगोल, विज्ञान, हवामानशास्त्र आणि अर्थशास्त्रही आहे. म्हणूनच शिकलेला शेतकरी अधिक सजगपणे शेती या व्यवसायाकडे पाहू शकतो. कोणत्याही घटकाचे चांगले-वाईट परिणाम तो विज्ञानाच्या आधारावर ओळखू शकल्याने तो हिंमत हरत नाहीच; उलट स्वतःबरोबर इतरांचीही प्रगती करतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इगतपुरी तालुक्यातील शेणित गावातले प्रगतिशील शेतकरी गोकुळ जाधव. गोकुळ हे सेंद्रिय नव्हे; तर पर्यावरणपूरक शेती करत आहेत.

मुखी असावा घास निर्मळतेचा, विषाची परीक्षा का घ्यावी?’
हरितक्रांती ही एकेकाळी देशाची वाढत्या अन्नधान्याची गरज भागवण्याची आवश्यक होती, त्या माध्यमातून रासायनिक खते, कीटकनाशकांचा शिरकाव झाला. पण कालांतरानें त्याची गरज राहिली का? त्याचे आपल्या मातीवर, जलस्त्रोतांवर, नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम न लक्षात घेता हा पायंडा चालूच राहिला. ‘शिक्षण न घेतलेला शेतकर्‍याचीं पोरं शेती करतात’ हे चित्र असल्यानें शेतातल्या रसायनांची मात्रा, त्याचे दुष्परिणाम याचा फारसा विचार झाला नाही. त्यामुळे पिकावर औषधे फवारताना शेतकर्‍यालाच विषबाधा झाल्याच्या किंवा विशिष्ट मालामुळे पीक हातचे गेल्याच्या अनेक घटना घडल्या.

मला वाटले, त्याचवेळी शेतकर्‍याचा पोर शिकला असता तर? त्याने शेती-मातीचं शास्त्रशुद्ध तंत्र जाणून घेतले असते तर… कदाचित काही वर्षांपूर्वीच हे प्रमाण कमी झालें असतें. म्हणूनच मी आणि भावाने खूप शिकून कृषितज्ज्ञ व्हायचे आणि विषमुक्त निर्मळ पर्यावरणपूरक शेती करायचे ठरवले.

आमची शेणित या गावी 20 एकर शेती आहे. आई-वडील, भाऊ अतिशय प्रगतिशील विचारांचे आहेत. शिक्षणाला त्यांनी अधिक प्राधान्य दिले. शेती करता करताच आम्ही दोघं भावंडं शिकलो. गावाकडे शालेय शिक्षण झाल्यावर कृषी क्षेत्रातला डिप्लोमा व डिग्री घेतली. त्यावेळी तुषार उगले आणि ‘केव्हीके’मधील प्रा. राजपूत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यानंतर पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात बी. ए. केले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे उद्यानविद्या विषय घेऊन बीएस्सी केले. वडील भात, गहू, सोयाबीन, द्राक्ष अशी पारंपरिक पिके घेत.

सन 2015 पासून मी तिथे शेडनेट आणि पॉलिहाऊसमधील शेतीला सुरुवात केली. पारंपरिक शेतीमध्ये कमी उत्पादन मिळत असल्याने हा एक ‘व्यवसाय’ आहे हे डोळ्यांसमोर ठेवून नवीन प्रयोग करू लागलो. त्यासाठी बाजारपेठेत मागणी काय आहे, रासायनिक कीडनाशके, खतांचे परिणाम मातीपासून माणसाच्या आरोग्यापर्यंत कसे होत आहेत, याचीही माहिती शिक्षणातूऩ मिळाली. 2007 या वर्षी वडिलांना द्राक्षबाग संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केल्याचे पाहिलें होतें. त्यांच्या प्रयोगांना शेती क्षेत्रातल्या रीतसर शिक्षणाची जोड दिली.

एक एकरमध्ये पॉलिहाऊस आणि एक एकरमध्ये शेडनेट लावून त्यात सेंद्रिय पद्धतीनं भाजीपाला पिकवायला सुरुवात केली. काकडी, ब्रोकोली, कारले अशा भाज्या घेतो. ठिबक सिंचनाच्या सहाय्यानें शेतीला पाणी देतो. शेण, गोमूत्र, डाळीचे पीठ, गूळ यांपासून तयार केलेलं जीवामृत रासायनिक खते आणि फवारणीऐवजी वापरतो. तसेच करंजतेल, नीमतेल, ताक, दही याचाही वापर करतो. 15 दिवसांच्या अंतरावर 200 लिटर जीवामृताची मात्रा द्यावी लागते.

पावसाळ्यात शेडनेटपेक्षा पॉलिहाऊसचा अधिक चांगला वापर होतो. पावसापासून बचाव होऊन उत्पादन अधिक चांगले येण्यास मदत होते. माझ्या कृषि अधिकारी असलेल्या भावानेही कृषी क्षेत्रात पीएच.डी. केल्याने त्याचं मार्गदर्शन मिळत आहे. हा भाजीपाला इंदूर, दिल्ली, पुणे येथे जातो. सन 2017 या वर्षी 20 गुंठे ऊस रोपवाटिका लावली. यांत्रिकीकरणाने मशागत करण्याची पद्धत अवलंबली. बाजारपेठेतील रासायनिक औषधांच्या किमती शेतकर्‍याला परवडण्यासारख्या नाहीत आणि त्यामुळे उत्पादनही वाढत नाही. शिवाय आपण ग्राहकाला खायला विषयुक्त अन्न देतो. हे थांबवण्यासाठी उसासाठीही गेली दोन वर्षं जीवामृताचा यशस्वी प्रयोग करत आहे. नियंत्रित फुटवे घेऊन सहा बाय दोनवर रोपांची लागवड केली. हा ऊस कारखान्याला जातो.

भविष्यात सेंद्रिय उसापासून सेंद्रिय पद्धतीनं गूळ तयार करण्याचा प्रयत्न आहे. सिंचनासाठी शेततळं, विहीर आहे. शेततळ्याचा उपयोग शेतीला पाणीपुरवठा करण्याबरोबरच मत्स्यपालनासाठीही होतो आहे. शंभर बाय दहा फूट खोलीच्या शेततळ्यात कोंबडा आणि कटला जातीचे मासे आहेत. त्यांना व्यवस्थित प्राणवायू मिळेल याची व्यवस्था केली आहे. मका, भाताचा कोंडा, शिल्लक अन्न हे खाद्य दिल्यानंतर 9 महिन्यांत हे मासे तयार होतात व स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी जातात. शेती करताना निसर्गाचा, जैवविविधतेचा अभ्यास हवाच. त्यामुळें गावात आम्ही वड, पिंपळ, फळझाडे, औषधी वनस्पतींची लागवड केली.

घरातल्या सदस्याच्या वाढदिवसादिवशी आम्ही वृक्षलागवड करतो. माझ्या सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असलेल्या गूळवेल, सीताफळ, कडुनिंब, पपई, कणेर, वड या वृक्षांची लागवड मळ्याच्या बांधावर केलीय. वड या वृक्षामुळे गांडुळं अधिक प्रमाणात तयार होतात. गांडुळखतासाठी त्यांचा वापर होतो. पर्यावरणपूरक शेती करत असताना प्लास्टिक मल्चिंगच्या वापराऐवजी उसाच्या पाचटाचा आच्छादनासाठी अनोखा वापर केला. तसेच पॉलिहाऊसधील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बॅक्टेरियांचा वापर केला आहे.

प्रत्येक शेतकर्‍याने सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, यासाठी सरकारचे सहकार्य हवे. शेतकर्‍यांंना व्यवस्थित प्रशिक्षण देण्याची गरज आहे. नाबार्ड, अपेडा यांसारख्या शासकीय संस्थांचा विस्तार वाढायला हवा. रासायनिक खतांवर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे आता शेती करण्यासाठी प्रत्येक तरुणानें त्याचे शिक्षण घेण्याची गरज आहे. घरची शेती असल्यामुळे मी त्याच क्षेत्रातले उच्च शिक्षण घेतलं, अर्थशास्त्रही शिकलो, याचा अधिक फायदा होतो आहे. मृदसंधारणापासून खत व्यवस्थापनापर्यंत आणि लागवडीपासून बाजारपेठेपर्यंत सर्वच बाबतीत सजग राहतो.

भविष्यात शेतकर्‍यांना एकत्र आणून त्यांना शिक्षण, मार्केटिंग, सेंद्रिय शेतीचे गणित या बाबी शास्त्रशुद्ध पद्धतीनें शिकवण्याचा मानस आहे. 2016 या वर्षी ‘फार्मर प्रोड्युसर’ कंपनी सुरू केली असून, या माध्यमातून शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा, त्यांना चांगला बाजारभाव मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. सध्या पंचक्रोशीतले हजार शेतकरी यात सहभागी झाले आहेत.

(शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी )

पुढील अंकात – निलेश तासकर

LEAVE A REPLY

*